मुंबई - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्याचे आज मतदान संपले. मोदी की राहुल गांधी, गुजरात कोण जिंकणार? यासंदर्भात लोकमतनंही आपल्या वाचकाचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये 2,881 वाचकानी सहभाग नोंदवला. यातील बहुतांश वाचकांनी राहुल गांधी हे आपली पप्पू प्रतिमा पुसण्यात यशस्वी ठरल्याचा कल दिला आहे. पण गुजरातच्या चाव्या पुन्हा एकदा भाजपाकडे जातील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 56.6 टक्के लोकांच्या मते गुजरातमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलणार आहे. तर 32 टक्के लोकांच्या मते गुजरातमध्ये काँग्रेसची सत्ता येईल. 11.4 टक्कें लोकांच्या मते गुजरातमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपची प्रतिष्ठापणाला लागलेल्या आणि राहुल गांधी यांच्याकडे आलेल्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या जबाबदारीमुळे गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर लोकमतनं घेतलेल्या पोलमध्ये 39.4 टक्के मतदारांनी भाजपाला 92 पेक्षा कमी जागा मिळतील असे म्हटले आहे. तर 30.9 टक्के जणांनी भाजपाला 93 ते 155 जागा मिळतील असे भाकित केलं आहे. 23.8 टक्के जणांच्या मते भाजपा 116-149 जागा जिंकेल. 5.8 टक्के जणांनी भाजपा 149 पेक्षा आधिक जागा जिंकेल असा कौल दिला आहे. म्हणजे 60.6 टक्के वाचकांनी गुजरातमध्ये पुन्हा कमळ फुलणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पाटीदार समाजातील रोष आणि इतर स्थानिक मुद्द्यांचाही काँग्रेसला या निवडणुकीत लाभ होऊ शकतो. असे लोकमतच्या वाचकांनी सांगितलं आहे. मोदी की राहूल गांधी, गुजरात कोण जिंकणार? असा आहे लोकमतच्या वाचकाचा कल - गुजरातमधील 182 जागांमध्ये जनतेचा कौल कोणाला हे 18 डिसेंबरला समजेल. गुजरातमध्ये भाजपा 22 वर्षं सत्तेत आहे. तर काँग्रेसला 22 वर्षांनंतर पुन्हा एकदा सत्ता मिळवण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड लागल्यावर ही पहिलीच निवडणूक असल्याने काँग्रेसनेही कंबर कसली. यामुळे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये 30 पेक्षा जास्त प्रचारसभा घ्याव्या लागल्या.राहुल गांधी यांच्या प्रचारसभांनाही अनपेक्षित प्रतिसाद मिळाला होता. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवाणी या युवा नेत्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या. होम ग्राऊंड टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारामध्ये संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर मोदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी राहुल गांधी झंझावाती प्रचार केला.गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात 89 जागांवर विक्रमी मतदान झाले होते. जवळपास 67 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान होत असून यात अहमदाबाद, बडोदा यासारख्या शहरांचा समावेश आहे. 2012 च्या निवडणुकीत 93 पैकी 52 जागांवर भाजपचा विजय झाला होता. तर काँग्रेसला ३९ जागांवरच समाधान मानावे लागले होते.गेल्या निवडणुकीत अहमदाबाद, बडोदा या शहरांमधील 23 पैकी 20 जागांवर भाजपचे आमदार निवडून आले होते. त्यामुळे या दोन्ही शहरांमधील बालेकिल्ला टिकवणे भाजपला जड जाणार नाही, असे दिसते. दुसरीकडे अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवाणी हे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांचे भवितव्यही मतपेटीत बंद झाले आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि काँग्रेसचे जिवाभाई पटेल यांच्यात मेहसाणात अटीतटीची लढत आहे.एग्झिट पोलमध्ये भाजपाची सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर लोकमतच्या वाचकांनीही भाजपाचीच सत्ता येईल असा अंदाज वर्तवला आहे. अर्थात, खरं चित्र 18 डिसेंबर रोजीच स्पष्ट होणार आहे.