शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तयारीला सुरुवात इंडिया आघाडीने केली, पण एनडीए बाजी मारणार; कसे ते पहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 8:51 AM

1 / 10
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजायला आता दोन महिन्यांचा कालावधी उरला आहे. या निवडणुकीच्या तयारीला सर्वात आधी सुरुवात करणाऱ्या इंडिया आघाडीला धोबीपछाड देण्याची पुरेपूर तयारी भाजपाने केली आहे. निवडणूक दोन महिन्यांवर आली तरी इंडिया आघाडीत जागा वाटपाचे काही ठरत नाहीय.
2 / 10
मग उमेदवार तयारी कशी करणार, भाजपविरोधात वातावरण निर्मिती कशी होणार, कोणत्या जागा मिळणार आदी अनेक प्रश्न आघाडीतील पक्षांना पडू लागले आहेत. अशातच नितीशकुमारांनी वेगळाच खेळ सुरु केल्याने आघाडी होतेय की नाही असा प्रश्न आता पडू लागला आहे.
3 / 10
आघाडीतील पक्षांच्या आपापल्या महत्वाकांक्षा आहेत. यामुळेच त्यांच्यात सीट शेअरिंगवरून बेबनाव आहे. काँग्रेसला आपल्यातले काही इतर पक्षांना द्यायचे नाहीय परंतु त्यांची ताकद वापरून ५० वर आलेले आपले खासदार वाढवायचे आहेत. तर इतर पक्षांना त्यांचे त्यांचे अस्तित्व टिकवायचे आहे. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र या तीन राज्यांत लोकसभेचे १६८ मतदारसंघ आहेत. इथेही आघाडी अद्याप सीट शेअरिंगचा फॉर्म्युला तयार करू शकलेली नाहीय.
4 / 10
इंडिया आघाडीसाठी नितीशकुमारांनीच पुढाकार घेतला होता. परंतु, त्यांच्याच राज्यात, त्यांच्याच पक्षात राजकीय संक्रमण सुरु आहे. जेडीयूमध्ये नितीशकुमारांनी पुन्हा एकदा नाटक करून अध्यक्षपद पटकावले आहे. दुसरीकडे नितीशकुमार लालू प्रसादांची साथ सोडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
5 / 10
त्यात भर म्हणून नितीशकुमारांनी अरुणाचलप्रदेशमध्ये आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रूही तांगुंग यांच्या नावाची अरुणाचल प्रदेश पश्चिम लोकसभा मतदारसंघामधून उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. यामुळे इतर पक्षांना विचारात घेतले नसल्याचे दिसत आहे.
6 / 10
संक्रांतीनंतर हालचाली होण्याचा अंदाज असताना नितीशकुमारांनी आपला उमेदवार जाहीर करत काँग्रेसच्या मुद्दामहून वेळखाऊ धोरणाला एक इशारा दिल्याचे म्हटले जात आहे. नितीशकुमार गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीत नाराज असल्याचे बोलले जात आहे. अशातच त्यांची नाराजी दूर करण्याची व्हर्च्युअल बैठक बोलविण्यात आली होती ती रद्द करण्यात आली आहे.
7 / 10
काँग्रेसने २७५ जागांवर स्वत: एकटे लढणार आणि आघाडीतील मित्रपक्षांच्या ८०-९० जागा मागणार असे ठरविले आहे. म्हणजेच काँग्रेस आघाडीपेक्षा स्वत:चा फायदा कसा होईल, आपले खासदार कसे वाढतील याचा विचार करत आहे. यावरूनही उद्या सीट शेअरिंगच्या बैठकीत मित्र पक्षांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता आहे. यामुळे आघाडी सध्यातरी गॅसवरच दिसत आहे.
8 / 10
याचा थेट फायदा भाजप प्रणित एनडीएला होणार आहे. विरोधकांची जी मोट एकत्र आली तर मतांचा फरक आणि जागा कमी होण्याचा फटका बसणार होता, तो आघाडीतील बिघाडीमुळे बसणार नाहीय. त्यातच भाजपाकडे राम मंदिराचे ब्रम्हास्त्र असणार आहे. यामुळे विरोधकांनी कितीही आदळआपट केली तरी एकच मुद्दा सर्वांवर भारी पडण्याची शक्यता आहे.
9 / 10
राम मंदिराच्या वातावरणात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे याचा फायदा भाजपा करून घेणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यातच इतर पक्षांचे नेते भाजपात जाण्याची शक्यता आहे. याचाही फायदा भाजपाला जिथे ताकद कमी तिथे वाढविण्यासाठी होणार आहे.
10 / 10
इंडिया आघाडीमध्ये १७ जणांची १७ डोकी असे कामकाज आहे. परंतु, एनडीएमध्ये भाजपा म्हणेल ती पूर्वदिशा आहे. कारण भाजपाचे सध्या सुगीचे दिवस असल्याने मित्रपक्षांना भाजपा म्हणेल ते मान्य करण्याशिवाय, त्यांच्यासोबत ओढत जाण्याशिवाय पर्याय नाहीय. त्या उलट आघाडीमध्ये आहे. 'हम तो डूबेंगे सनम, तुमको भी ले डूबेंगे', अशा अविर्भावात आघाडीतील पक्ष असणार आहेत.
टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपा