Makar Sankranti 2020: Makkar Sankranti is celebrated in various parts of India?
Makar Sankranti 2020 : भारतातील विविध भागात अशी साजरी केली जाते मकरसंक्रांत By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 10:50 AM1 / 6मकरसंक्रांत हा हिंदूंचा महत्त्वाचा सण असून, दरवर्षी 14 जानेवारीला भारतीय लोक या सणानिमित्त मोठ्या थाटामाटात जल्लोष करतात. सूर्य ज्या दिवशी धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, त्या तिथीला मकरसंक्रांत साजरा केला जातो.उत्तर प्रदेशमध्ये मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवरच कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. तर महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. मकरसंक्रांत हा सण भोगी ( 13 जानेवारी), संक्रांत ( 14 जानेवारी) आणि किंक्रांत (15 जानेवारी) अशा तीन टप्प्यात साजरा केला जातो. 2 / 6तामिळनाडूमधील पोंगल- मकरसंक्रांत हा सण तामिळनाडूमध्ये पोंगल म्हणून साजरा केला जातो. त्यालाच भोगी पोंगल असंही संबोधलं जातं. या दिवशी घरातल्या पुरातन वस्तू काढून घरात साफसफाई केली जाते. त्याप्रमाणेच नव्या वस्तूही घेतल्या जातात. तामिळनाडूमध्ये पोंगल हा सण तीन दिवस साजरा केला जातो.3 / 6पंजाबमधील माघी- पंजाबमध्ये मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला 'लोहारी' हा सण जल्लोषात साजरा केला जातो. पंजाब या भागात 13 जानेवारी या दिवशी लोहारी सण साजरा केला जातो. रब्बी पिकांच्या कापणीशी हा सण संबंधित असतो. संध्याकाळच्या शेकोटीसाठी छोटी मुले घरोघरी जाऊन गाणी म्हणतात, शेकोटीसाठी लाकडे वा पैसे गोळा करतात.4 / 6बिहार आणि झारखंडमधला संक्रांत- बिहार आणि झारखंडमध्येही 14 ते 15 जानेवारी हे दोन दिवस संक्रांत हा सण साजरा केला जातो. ब-याच ठिकाणी पतंग उडवली जातात. तसेच लोक पहाटे नदीत अभ्यंगस्नान करतात. 15 जानेवारीला संक्रांतीनिमित्त एक विशिष्ट पद्धतीची खिचडीही बनवली जाते.5 / 6गुजरातमधलं उत्तरायण- गुजरातमध्ये उत्तरायण म्हणजे मकरसंक्रांत धूमधडाक्यात साजरा केला जातो. मकरसंक्रांतीच्या दिवशी गुजरातमध्ये विविधरंगी आणि मोठंमोठी पतंग उडवली जातात. या पतंगबाजीत अनेकांच्या पतंग उडवण्याच्या कौशल्याचा कस लागतो. उत्तरायणाच्या दिवशी रंगीबेरंगी पतंगांनी आकाश झळाळून निघते. 6 / 6पश्चिम बंगालमधला पौष पर्व- पश्चिम बंगालमध्येही मकरसंक्रांत हा मोठ्या थाटात साजरा केला जातो. पश्चिम बंगालमध्ये पौष पर्व या नावानं तो साजरा होतो. रब्बी पिकांची कापणी केल्यानंतर पौष पर्वाला सुरुवात होते. पश्चिम बंगालमध्ये गोडधोड खाऊन बंगाली लोक पौष पर्वाचा आनंद एकमेकांसोबत द्विगुणित करतात. आणखी वाचा Subscribe to Notifications