शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Cabinet Reshuffle: फक्त एकच! ...अन् मोदींनी त्यांचीही केली शिवसेनेसारखी अवस्था; भाजपला नवा छोटा भाऊ सापडला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2021 11:57 PM

1 / 10
केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित, बहुचर्चित विस्तार अखेर आज संपन्न झाला. राष्ट्रपती भवनात एकूण ४३ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये माजी मुख्यमंत्र्यांपासून अनेक तरुण नेत्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून ४ जणांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली.
2 / 10
महाराष्ट्राच्या वाट्याला एक कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रिपदं आली आहेत. नारायण राणेंनी कॅबिनेट मंत्रिपदाची, तर डॉ. भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटील यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
3 / 10
२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे १८ उमेदवार विजयी झाले. मात्र दोन्हीही वेळा त्यांच्या वाट्याला एक-एक मंत्रिपदच आलं. २०१४ मध्ये अनंत गीते, तर २०१९ मध्ये अरविंद सावंत मंत्री झाले. त्यामुळे शिवसेनेची स्थिती सहन होईना आणि सांगताही येईना अशी झाली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तशीच अवस्था संयुक्त जनता दलाची (जेडीयू) केली आहे.
4 / 10
आम्हाला एकापेक्षा अधिक मंत्रिपदं हवीत अशी भूमिका २०१९ मध्ये जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतली होती. मात्र त्यांची मागणी पूर्ण झाली. पंतप्रधान मोदींसमोर त्यांची डाळ शिजली नाही. त्यामुळे जेडीयू केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली.
5 / 10
शिवसेनेनंदेखील एकापेक्षा अधिक मंत्रिपदांची मागणी केली होती. मात्र मोदींनी त्यांची केवळ एका मंत्रिपदावर बोळवण केली. शिवसेनेकडे १८ खासदार होते. जेडीयूकडे १७ खासदार आहेत. त्यांचीही अवस्था शिवसेनेसारखीच झाली आहे.
6 / 10
२०१९ मध्ये एक मंत्रिपद नाकारणाऱ्या जेडीयूनं आता २ वर्षानंतर तेच एक मंत्रिपद गोड मानून घेतलं आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे मित्रपक्षांना केवळ एकच मंत्रिपद देण्याची परंपरा मोदींनी कायम राखली आहे.
7 / 10
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वेळोवेळी सरकारमध्ये योग्य वाटा द्या, अशी मागणी केली. मात्र ठाकरेंप्रमाणेच कुमार यांच्या हाती केवळ एकच मंत्रिपद आलं.
8 / 10
बिहारमध्ये भाजपचे १८ खासदार आहेत. त्यातील ५ केंद्रात मंत्री आहेत. याच न्यायानं १७ खासदार असलेल्या ४ मंत्रिपदं मिळायला हवीत, असा प्रस्ताव जेडीयूकडून ठेवण्यात आला होता. मात्र मोदींनी या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली.
9 / 10
एक मंत्रिपद मिळत असेल तर आम्हाला केंद्रीय सत्तेतीला वाटा नको, अशी ठाम भूमिका नितीश कुमार यांनी घेतली होती. मात्र २ वर्षांत मोदींनी त्यांना कोणतीही भाव दिलेला नाही. त्यामुळे २ वर्षानंतर जेडीयूनं एक मंत्रिपद स्वीकारलं आहे.
10 / 10
विधानसभा निवडणुकीत पिछेहाट झाल्यानं जेडीयूवर भाजपचा दबाव आहे. निवडणुकीआधी राज्यात दुसरा असलेला जेडीयू आता थेट तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. भाजपनं अधिक जागा जिंकल्यानं मोठा भाऊ असलेल्या जेडीयूला आता छोटा भाऊ व्हावं लागलं आहे. त्यामुळे कुमार यांची स्थिती उद्धव ठाकरेंसारखी झाली आहे.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBJPभाजपा