Omicron : ओमायक्रॉनमुळे भारतात येणार तिसरी लाट; तज्ज्ञ म्हणाले, 'दररोज 1.8 लाखापर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळण्याची शक्यता' By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 12:40 PM
1 / 8 नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणे वाढत आहे. त्यामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. ओमायक्रॉनचे पहिले प्रकरण दक्षिण आफ्रिकेत आढळून आले. यानंतर, हा व्हेरिएंट जगातील जवळपास 100 देशांमध्ये पसरला आहे. तसेच, अनेक युरोपियन देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे आणि यापैकी बहुतेक प्रकरणे ओमायक्रॉनची आहेत. 2 / 8 भारतात आतापर्यंत ओमायक्रॉनची 236 प्रकरणे समोर आली आहेत. केंद्र सरकारने सर्व राज्यांना सावध केले आहे की, ओमायक्रॉन डेल्टा पेक्षा जवळजवळ तिप्पट वेगाने पसरतो. त्याचा प्रादुर्भाव पाहता सरकार सतर्क झाले आहे. काही राज्यांमध्ये नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनपूर्वी निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. 3 / 8 तसेच, ओमायक्रॉनची वाढती प्रकरणे पाहता देशात तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञ वर्तवत आहेत. राष्ट्रीय कोविड-19 सुपरमॉडेल समितीचे सदस्य विद्यासागर यांनी एएनआयला सांगितले की, 'पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. मात्र, लोकांच्या मोठ्या प्रमाणावरील प्रतिकारशक्तीमुळे, ती दुसऱ्या लाटेपेक्षा हलकी असेल, परंतु तिसरी लाट नक्कीच येईल.' 4 / 8 एप्रिल-मेमधील दुसऱ्या लाटेतील प्रकरणांच्या तुलनेत ओमॉयक्रान रुग्णांची संख्या कमी असेल. सरकारने 1 मार्चपासून भारतात लसीकरण सुरू केले होते, डेल्टा व्हेरिएंट येण्याची ही वेळ होती. त्यावेळी फ्रंटलाइन वर्कसशिवाय कोणालाही लस मिळाली नव्हती. त्यामुळेच डेल्टा व्हेरिएंटमुळे अनेकांना संसर्ग झाल्याचे दिसून आले, असे विद्यासागर यांनी सांगितले. 5 / 8 याचबरोबर,'आता देशात 75 ते 80 टक्के सीरो-प्रेवलेंस आहे. जवळपास 85 टक्के लोकांना पहिला डोस मिळाला आहे आणि 55 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत, जे 95 टक्के महामारीपासून संरक्षण करते. त्यामुळे तिसऱ्या लाटेतील प्रकरणे दुसऱ्या लाटेत दिसल्यासारखी समोर येणार नाहीत. दुसऱ्या लाटेच्या अनुभवातूनही आम्ही आमची क्षमता निर्माण केली आहे, त्यामुळे आम्ही कोणत्याही अडचणीशिवाय त्याचा सामना करू शकतो', असे विद्यासागर म्हणाले. 6 / 8 ओमायक्रॉन प्रकरणांची संख्या दोन गोष्टींवर अवलंबून असेल. पहिली गोष्ट म्हणजे डेल्टामधून मिळालेल्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीला ओमायक्रॉन किती बायपास करते आणि दुसरे म्हणजे लसीपासून मिळालेल्या प्रतिकारशक्तीला ओमायक्रॉन किती प्रमाणात चकमा देऊ शकतो. सध्या या दोन गोष्टींची संपूर्ण माहिती उपलब्ध नाही, असे हैदराबादमधील आयआयटीचे प्राध्यापक विद्यासागर यांनी सांगितले. 7 / 8 विद्यासागर यांच्या म्हणण्यानुसार, जर देशात तिसरी लाट आली तर सर्वात वाईट परिस्थितीत भारतात दररोज दोन लाखांपेक्षा जास्त प्रकरणे नसतील. दरम्यान, विद्यासागर यांनी 'हा केवळ अंदाज आहे, भविष्यवाणी नाही' असे स्पष्टपणे सांगितले. भारतातील लोकांमध्ये हा व्हायरस कसा व्यवहार करत आहे, हे समजल्यानंतर ओमायक्रॉनबाबत आम्ही अनुमान काढू शकतो. सर्वात वाईट परिस्थितीत, नैसर्गिक किंवा लसीपासून कमी प्रतिकारशक्तीमुळे रुग्णांची संख्या दररोज 1.7 ते 1.8 लाखांपर्यंत राहील. हे दुसऱ्या लाटेच्या पीकच्या निम्म्यापेक्षा कमी आहे, असेही विद्यासागर म्हणाले. 8 / 8 दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच लोकांना सतर्क करत धोक्याचा इशारा दिला आहे. जगभरातील सरकारांनी आता कोरोना या महाभयंकर संकटाचा अंत करण्यासाठी काम केले पाहिजे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. आणखी वाचा