Omicron variant If given Covid 19 booster must be different vaccine view in top expert body
Omicron Varient : बूस्टर डोस वेगळ्या लसीचा हवा; तज्ज्ञांच्या समितीचे मत By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 9:23 AM1 / 12काेराेनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्राॅनचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे देशात काेराेना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डाेस देण्याबाबत लसीकरणाबाबतच्या तज्ज्ञांच्या समितीमध्ये प्राथमिकदृष्ट्या एकमत झाले आहे. मात्र, बूस्टर डाेस आधी देण्यात आलेल्या लसीपेक्षा वेगळा आणि भिन्न पद्धतीने विकसित केलेला असावा, याबाबत तज्ज्ञांची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 2 / 12नॅशनल टेक्निकल ॲडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (एनटीएजीआय) ही तज्ज्ञांची समिती केंद्र सरकारला लसीकरणाबाबत सल्ला देते. या समितीकडून बूस्टर डाेस देण्याची गरज आहे की नाही, याचा अभ्यास करत आहे. मात्र, बूस्टर डाेस हा वेगळ्या पद्धतीने विकसित केलेल्या लसीचा असावा, याबाबत सहमती झाली आहे. 3 / 12निष्क्रिय केलेल्या विषाणूपासून विकसित केलेली किंवा एडीनाेव्हायरल व्हेक्टर लस, या दाेन पद्धतीने विकसित केलेल्या लसींचे दाेन डाेस घेतले असल्यास बूस्टर डाेस हा वेगळ्या लसीचा द्यायला हवा, असे समितीचे मत आहे. 4 / 12भारत बायाेटेकने विकसित केलेली काेव्हॅक्सिन ही लस निष्क्रिय विषाणूपासून विकसित केलेली आहे, तर सीरम इन्स्टिट्यूटतर्फे उत्पादन करण्यात येणारी काेविशिल्ड आणि रशियाने विकसित केलेली स्पुतनिक-व्ही या लसी व्हेक्टर लसी आहेत. त्यामुळे यापैकी काेणत्याही लसीचे दाेन डाेस देण्यात आलेले असल्यास तिसरा डाेस हा त्याच लसीचा नकाे, असे समितीचे म्हणणे आहे. 5 / 12हैदराबाद येथील बायाेलाॅजिकल ई या कंपनीने विकसित केलेली काेर्बेवॅक्स ही लस प्राेटिन सब-युनिट पद्धतीवर आधारित आहे. यासाठी केंद्र सरकारने कंपनीला १५०० काेटी रुपये दिले असून ३० काेटी डाेस राखून ठेवण्यात आलेले आहेत. लवकरच या लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळण्याची शक्यता आहे.6 / 12अमेरिकेच्या नाेवावॅक्स या कंपनीने नाॅनाेपार्टिकल प्राेटिन पद्धतीवर आधारित काेवाेवॅक्स ही लस विकसित केली आहे. याचे उत्पादन सीरमतर्फे करण्यात येत आहे.7 / 12पुण्यातील जेनाेव्हा बायाेफार्मातर्फे एमआरएनए पद्धतीवर आधारित देशातील पहिलीच लस विकसित केली आहे. या लसीचे ६ काेटी डाेस केंद्राला मिळण्याची अपेक्षा आहे. महत्त्वाचे म्हणजे, फायझर किंवा माॅडर्ना यांनी विकसित केलेल्या लसीप्रमाणे या लसीला उणे ७० अंश सेल्सिअस तापमानात ठेवण्याची गरज राहणार नाही.8 / 12ओमायक्राॅन या नव्या विषाणूची संसर्गशक्ती डेल्टा विषाणूपेक्षा अधिक आहे. मात्र, नवा विषाणू डेल्टापेक्षा कमी घातक आहे, असे प्राथमिक अभ्यासातून दिसून आले आहे. मात्र, भारतासह सर्वच देशांनी कोणताही हलगर्जीपणा न करता प्रतिबंधक उपायांचे काटेकोर पालन करत राहिले पाहिजे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण आशिया विभागाच्या संचालक डॉ. पूनम खेत्रपाल यांनी सांगितले.9 / 12त्या म्हणाल्या की, कोरोनाची साथ अजून संपलेली नाही हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. जगभरातील ५९ देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. भविष्यात कोरोनाच्या नव्या विषाणूंचा उद्भव होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रतिबंधक उपाय पाळण्याबाबत सर्वांनी ठाम राहिले पाहिजे. 10 / 12दक्षिण आशियातील देशांनी कोरोना साथीच्या स्थितीवर बारीक लक्ष ठेवावे, तसेच सार्वजनिक आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. ओमायक्राॅनच्या प्रसारामुळे जगभरातील देशांनी पुन्हा निर्बंध लादले आहेत. आफ्रिकेतील काही देशांतील प्रवाशांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ओमायक्रॉनमध्ये अधिक परिवर्तने आढळून आली असल्याचेही त्यांनी सांगितले. 11 / 12डॉ. पूनम खेत्रपाल म्हणाल्या की, ओमायक्रॉनमुळे कोरोनाचा पुन्हा संसर्ग होण्याचा धोका आहे, असे दक्षिण आशियातील देशांतील अभ्यासावरून दिसून आले. आरटी-पीसीआर व अँटिजन या चाचण्या कोरोनाच्या सर्व प्रकारच्या विषाणूंचा संसर्ग शोधण्यास उपयुक्त ठरत आहेत. 12 / 12ओमायक्रॉनचे नवे रुग्ण शोधण्याकरिता चाचण्या व जिनोम सिक्वेन्सिंगवर भर दिला पाहिजे. जिथे मोठ्या प्रमाणावर संसर्ग आढळेल तिथे कडक निर्बंध लागू करण्यात यावेत, असेही त्यांनी सांगितले. आणखी वाचा Subscribe to Notifications