शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 19:45 IST

1 / 6
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध एकामागून एक कठोर निर्णय घेणे सुरू केले आहे. यात सिंधू पाणी करार स्थगित करणे, पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा न देणे, वाघा बॉर्डर बंद करणे आणि दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांना देश सोडून जाण्याचे निर्देश देणे...अशाप्रकारचे मोठे निर्णय सरकारने घेतले आहेत. या पावलांमुळे पाकिस्तानच्या शाहबाज सरकारवरील दबाव वाढला आहे.
2 / 6
आज पाकिस्तानी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली, ज्यामध्ये भारताच्या कारवाईला प्रत्युत्तर देण्यावर एकमत झाले. भारताच्या या निर्णयांना प्रत्युत्तर म्हणून आता पाकिस्तानने भारताला शिमला करार रद्द करण्याची धमकी दिली आहे. अनेकांना प्रश्न पडला असेल की, हा शिमला करार नेमका आहे तरी काय ?
3 / 6
काय आहे शिमला करार ? 1971 च्या भारत आणि पाकिस्तानमधील युद्धानंतर शिमला कराराचा पाया घातला गेला. या युद्धात भारताने पाकिस्तानचा पूर्व भाग (आता बांगलादेश) मुक्त केला आणि पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करली. सुमारे 90 हजार पाकिस्तानी सैनिक भारताने पकडले होते. भारताने पश्चिम पाकिस्तानच्या सुमारे 5 हजार चौरस मैल क्षेत्राचा ताबाही घेतला होता. या युद्धाच्या सुमारे 16 महिन्यांनंतर, 2 जुलै 1972 रोजी हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्यात हा ऐतिहासिक करार झाला होता.
4 / 6
शिमला करार का झाला? शिमला करार हा प्रत्यक्षात भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सामान्य करण्यासाठी आणि भविष्यातील कोणताही वाद शांतता आणि संवादाद्वारे सोडवण्याची वचनबद्धता आहे. या करारात असे ठरवण्यात आले की, भारत आणि पाकिस्तान त्यांचे सर्व प्रश्न परस्पर चर्चेद्वारे सोडवतील. यामध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाला किंवा संघटनेला हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
5 / 6
या करारातील एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की, भारत आणि पाकिस्तान परस्पर संमतीने काश्मीरमधील नियंत्रण रेषा (LoC) ओळखतील आणि कोणताही पक्ष त्यात एकतर्फी बदल करणार नाही. दोन्ही देशांनी असेही ठरवले की, ते एकमेकांविरुद्ध बळाचा वापर, युद्ध किंवा दिशाभूल करणारा प्रचार करणार नाहीत. या कराराअंतर्गत भारताने कोणत्याही अटीशिवाय 90 हजार पाकिस्तानी सैनिकांना सोडले आणि व्यापलेला प्रदेशही पाकिस्तानला परत केला. पाकिस्ताननेही काही भारतीय कैद्यांना सोडले. आता पाकिस्तान याच शिमला कराराचा शस्त्र म्हणून वापर करतोय.
6 / 6
पाकिस्तान फक्त धमकी देतो- शिमला करार रद्द करण्याची पाकिस्तानची धमकी ही केवळ एक राजकीय खेळी आहे. भारताने आधीच स्पष्ट केले आहे की, काश्मीर मुद्दा द्विपक्षीय असून, शिमला करार हा त्याचा आधार आहे. हा करार रद्द करण्याची धमकी देऊन पाकिस्तान केवळ त्यांची आंतरराष्ट्रीय प्रतिमा खराब करत नाही, तर शांततापूर्ण तोडग्यावर विश्वास ठेवत नसल्याचेही सिद्ध करेल. याशिवाय, शिमला करार रद्द केल्यावर पाकिस्तानवर इतर देशांचा दबावही वाढू शकतो.
टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर