ऑनलाइन लोकमत - नवी दिल्ली, दि. 26 - काश्मीरमध्ये हिंसाचार थांबवण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वापरण्यात आलेल्या पेलेट गनचा पाकिस्तानने निषेध केला आहे. पाकिस्तानमधील एका संघटनेने हा निषेध नोंदवला असून त्यांनी कॅम्पेनच सुरु केलं आहे. मात्र निषेध नोंदवताना पाकिस्तानने पुन्हा वाकड्यात जात भारतीय सेलिब्रिटी आणि नेत्यांच्या फोटोंशी छेडछाड केली आहे. फेसबुकवर फोटोशॉप करुन हे फोटो अपलोड करण्यात आले आहेत. मात्र या संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोचाही वापर केल्याने रोष व्यक्त केला जात आहे. (काश्मीरमध्ये पेलेट गनचा वापर केल्याबद्द्ल CRPFने व्यक्त केला खेद) पाकिस्तानमधील नेव्हर फरगेट या संघटनेने भारतीय सेलिब्रिटी आणि नेत्यांचे फोटो मॉर्फ करुन वेबसाईटवर अपलोड केले आहेत. विराट कोहली, अमिताभ बच्चन, शाहरूख खान, काजोल, हृतिक रोशनसोबत यांच्याव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचादेखील फोटो वापरण्यात आला आहे. या फोटोंमध्ये चेहरा आणि डोळे पेलेट्सने जखमी झाल्याचं दाखवण्यात आले आहेत. कारण काश्मीरमध्ये जवानांनी पेलेट गनचा वापर केल्याने अनेक तरुणांच्या चेहरा, डोळ्याला जखम झाली आहे. त्यामुळे सेलिब्रेटींचा चेहरा वापरुन आपला निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आला आहे.