मृत माणूस टपरीवर चहा पिताना दिसला; कुटुंबासह शेजाऱ्यांना धक्का बसला By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 8:50 AM
1 / 10 सोडून गेलेली, मृत पावलेली व्यक्ती पुन्हा कधीही येत नाही असं म्हणतात. व्यक्ती एकदा जग सोडून गेली की तिच्या आठवणीच सोबत राहतात. मात्र उत्तर प्रदेशातल्या देवरियामधील सलेमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेनं सगळेच चक्रावले आहेत. 2 / 10 आपल्या घरातील व्यक्ती सोडून गेली. आता ती कधीही आपल्याला दिसणार नाही, अशी मनाची समजूत घातलेल्या एका कुटुंबाला आश्चर्याचा धक्का बसला. त्यांना सोडून गेलेली व्यक्ती दुचाकीवरून घरात परतली. त्यामुळे कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. 3 / 10 एका अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचा ओळख पटवण्यात चूक झाल्यानं हा संपूर्ण प्रकार घडला. पोलिसांनी घाई गडबडीत मृताची ओळख पटवली आणि गोंधळ झाला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनास पाठवला. कुटुंबावर शोककळा पसरली. 4 / 10 जीवाभावाचा माणूस गमावल्यानं कुटुंब शोकसागरात बुडालं असताना मृत व्यक्ती जिवंत असून ती एका टपरीवर चहा पित असल्याची माहिती कुटुंबाला मिळाली. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर एकच खळबळ माजली. 5 / 10 सलेमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवलपूर-भागलपूर मार्गावर धनौतीजवळ शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास अपघात झाला. त्यात ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. आसपास असलेल्या लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 6 / 10 पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्या दरम्यान मईल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या श्रीनगर गावातील एका कुटुंबातील सदस्यांनी रुग्णालय गाठलं. पोलिसांनी त्यांना मृत व्यक्तीचे कपडे दाखवले. 7 / 10 मृत व्यक्ती आपले वडील असून त्यांचं नाव फुलेसर राजभर असल्याचं कुटुंबातील एका व्यक्तीनं पोलिसांना सांगितलं. याची माहिती त्यानं घरीदेखील दिली. संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. थोड्याच वेळात घरातील इतर सदस्य आणि ग्रामस्थ पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. 8 / 10 संपूर्ण गावात शोककळा पसरली असताना श्रीनगर गावातल्या एका तरुणाला फुलेसर टपरीवर चहा पिताना दिसले. त्यानं याची माहिती त्यांच्या कुटुंबाला दिली आणि फुलेसर यांना दुचाकीवरून घरी आणलं. 9 / 10 फुलेसर यांच्या घरी कुटुंबीयांचा आक्रोश सुरू होता. पण फुलेसर यांना पाहताच सगळ्यांना प्रचंड आनंद झाला. मुलाकडून मृतदेहाची ओळख पटवण्यात चूक झाल्यानं हा संपूर्ण प्रकार घडला. 10 / 10 ग्रामस्थांनी या घटनेची माहिती मईल पोलीस ठाण्याला दिली. त्यामुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ माजली. त्यांनी तत्काळ डॉक्टरांनी संपर्क साधला आणि शवविच्छेदन रोखण्याच्या सूचना दिल्या. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आता तो शवागारात ठेवण्यात आला आहे. आणखी वाचा