शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अखेर ठरलं! प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये मिळाली नवी जबाबदारी?; २ मुख्यमंत्र्यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 5:07 PM

1 / 11
सहा महिन्यांच्या बैठका आणि भेटीनंतर आता प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल बुधवारी दिल्लीत पोहोचले. ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन पीकेच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत.
2 / 11
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही प्रशांत किशोर यांच्यासारख्या रणनीतीकाराचा अनुभव काँग्रेससाठी फायदेशीर ठरेल, असं म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीके यांना पक्षाच्या सरचिटणीसपदाची भूमिका दिली जाऊ शकते.
3 / 11
प्रशांत किशोर पक्षाच्या रणनीती आणि निवडणूक आघाडीवर काम करतील. तसे झाल्यास काँग्रेसमध्ये प्रथमच असं पद निर्माण केले जाणार आहे. म्हणजेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रशांत काँग्रेसची निवडणूक रणनीती आणि इतर पक्षांशी युती करण्याबाबत जबाबदारी असेल.
4 / 11
२२ पेक्षा जास्त विधानसभा आणि २ लोकसभा निवडणुका हरलेल्या काँग्रेससाठी पीके कितपत फायदेशीर ठरेल? हे येणाऱ्या काळात ठरेल. ऑक्टोबर २०२१ मध्ये राहुल-प्रियांका यांच्या भेटीत प्रशांत किशोर यांनी पक्षातील त्यांच्या भूमिकेचा उल्लेख केला होता.
5 / 11
त्यावेळी काँग्रेस कार्यकारिणी (CWC) या पक्षाची सर्वात मोठी निर्णय घेणाऱ्या कार्यकारणीतील सदस्यांच्या विरोधामुळे पीके यांचा प्रवेश पुढे ढकलण्यात आला होता, मात्र आता प्रशांत यांच्या काँग्रेसमध्ये येण्यास हायकमांडची मान्यता आणि त्यांची भूमिका जवळपास निश्चित झाली आहे.
6 / 11
स्ट्रॅटेजी आणि अलायन्सच्या भूमिकेत येताच प्रशांत किशोर यांच्याकडे दोन मोठी कामे असतील. प्रशांत किशोर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाची रणनीती तयार करणार आहेत. राज्याच्या प्रभारींशी थेट संपर्क साधून रणनीती राबविली जाईल.
7 / 11
पीके काँग्रेसमध्ये आघाडीच्या भागीदारांसोबत चर्चा आणि जागावाटपाचे काम पाहतील. ते थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कळवतील. प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला एक मजबूत आणि विश्वासार्ह मित्र बनण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून भाजपला कडवी झुंज देता येईल.
8 / 11
पीकेचे पहिले लक्ष लोकसभेत मजबूत धर्मनिरपेक्ष पक्षांना जोडणे असेल. प्रशांत किशोर यांनी आपल्या सादरीकरणात काँग्रेसला संजीवनी देण्यासाठी अनेक सूचना केल्या आहेत. यामध्ये देशभरातील लोकसभेच्या ३७० जागांवर लक्ष केंद्रित करणे, बिहार-यूपी आणि ओडिशातील एकला चलो आणि तामिळनाडू आणि महाराष्ट्रात युती करण्याची रणनीती यांचा समावेश आहे.
9 / 11
गेल्या १० वर्षांत प्रशांत किशोर यांनी वेगवेगळ्या नेत्यांसाठी निवडणुकीची रणनीती तयार करण्याचे काम केले आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा समावेश आहे.
10 / 11
प्रशांत किशोर यांनी भाजपासोबतही काम केले आहे. अशा स्थितीत काँग्रेसला भाजपाची कमजोरी आणि ताकद अधिक चांगल्या पद्धतीने कळू शकेल. निवडणुकीच्या रणनीतीसाठी याचा फायदा होणार आहे. पीके काँग्रेसमध्ये जाऊन काय मिळणार? असा प्रश्न आता पडला असेल.
11 / 11
या प्रश्नावर राजकीय तज्ज्ञ म्हणतात, प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्षात काम करणे यात फरक आहे. पीके येथे राष्ट्रीय स्तरावर काम करू शकतील आणि आपली राजकीय महत्त्वाकांक्षाही पूर्ण करू शकतील. प्रशांत किशोर यांच्यासमोर पक्षांतर्गत तयार झालेल्या G-23 नेत्यांना सोबत घेण्याचे आव्हान असेल.
टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरcongressकाँग्रेस