शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष... आठ पक्षांसोबत केलंय काम!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 2:13 PM

1 / 8
बिहारमधील राजकारणात सध्या प्रशांत किशोर म्हणजेच पीके यांच्या जन सुराज पक्षाने एन्ट्री केली आहे. त्यामुळे प्रशांत किशोर यांची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांनी मोठी तयारी केली आहे. दरम्यान, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन (UNO) फंडेड स्कीममध्ये नोकरी ते निवडणूक रणनीतीकार आणि राजकीय पक्ष बनवण्यापर्यंतचा प्रशांत किशोर यांच्या प्रवासाबद्दल जाणून घ्या...
2 / 8
प्रशांत किशोर यांचा जन्म बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील कोनार गावात झाला. २० मार्च १९७७ रोजी जन्मलेले प्रशांत किशोर यांचे वडील श्रीकांत पांडे हे सरकारी डॉक्टर होते. प्रशांत किशोर यांच्या जन्मानंतर कुटुंब बक्सरला स्थलांतरित झाले आणि प्रशांत किशोर यांचे शालेय शिक्षण येथेच झाले. बक्सरमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशांत किशोर अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी हैदराबादला गेले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर प्रशांत किशोर हे युनायटेड नेशन्सच्या आरोग्य कार्यक्रमात सामील झाले होते.
3 / 8
प्रशांत किशोर यांनी सुमारे आठ वर्षे युनायटेड नेशन्समध्ये काम केले. त्यांची पहिली पोस्टिंग आरोग्यावरील एका युनायटेड नेशन्स फंडेड स्कीमसाठी हैद्राबादमध्ये झाली. त्यानंतर त्यांची पोलिओ निर्मूलन कार्यक्रमासाठी बिहारमध्ये पोस्टिंग करण्यात आली. तेव्हा बिहारमध्ये राबडी देवी यांच्या नेतृत्वाखाली आरजेडीचे सरकार होते. यानंतर प्रशांत किशोर अमेरिकेतील युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयात गेले. मात्र, याठिकाणी ते जास्तकाळ रमले नाहीत. त्यानंतर त्यांना चाड येथे विभाग प्रमुख म्हणून पाठवण्यात आले. याठिकाणी त्यांनी जवळपास चार वर्षे काम केले.
4 / 8
अशाप्रकारे युनायटेड नेशन्समध्ये आरोग्य तज्ज्ञ म्हणून जवळपास आठ वर्षे काम केल्यानंतर प्रशांत किशोर यांनी २०११ मध्ये निवडणूक रणनीतीकार म्हणून नवीन प्रवास सुरू केला. प्रशांत किशोर हे २०११ मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये सामील झाले. त्यावेळी मोदींच्या मुख्यमंत्री ते पंतप्रधान या प्रवासात प्रशांत किशोर यांच्या रणनीतीलाही श्रेय देण्यात आले. भारतीय राजकारणातील ब्रँडिंगच्या युगाची ही सुरुवात मानली जाते. प्रशांत किशोर यांनी २०१३ मध्ये भारतीय राजकीय कृती समिती म्हणजेच I-PAC ची स्थापना केली आणि २०१४ मध्ये सिटिझन्स फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्सची (CAG) स्थापना केली.
5 / 8
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मोठ्या विजयामुळे प्रशांत किशोर यांना ओळख मिळाली. तेव्हा प्रशांत किशोर यांनी भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी निवडणूक रणनीती तयार केली होती. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर प्रशांत किशोर यांच्या नावाचीही खूप चर्चा झाली. प्रशांत किशोर यांनी भाजप व्यतिरिक्त जेडीयू-आरजेडी युतीपासून ते काँग्रेसपर्यंत वेगवेगळ्या राजकीय पक्षांसोबत काम केले.
6 / 8
२०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी आरजेडी-जेडीयू-काँग्रेसच्या महाआघाडीसाठी निवडणूक रणनीतीकाराची भूमिका बजावली. प्रशांत किशोर यांनी २०१७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासाठी काम केले आणि काँग्रेस विजयासह सरकार स्थापन करण्यात यशस्वी ठरली. प्रशांत किशोर यांना २०१९ च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेस पक्षासाठी रणनीती तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली होती आणि जगन मोहन रेड्डी राज्यात सत्ता काबीज करण्यात यशस्वी ठरले होते.
7 / 8
याचबरोबर, प्रशांत किशोर यांना २०२१ च्या पश्चिम बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार देखील मानले जाते. तसेच, प्रशांत किशोर यांनी २०२० च्या दिल्ली निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षासाठी आणि २०२१ च्या तामिळनाडू निवडणुकीत एमके स्टॅलिन यांच्या डीएमकेसाठी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम केले आहे. एकूणच, प्रशांत किशोर यांनी भाजप आणि जेडीयू तसेच काँग्रेस, आरजेडी, वायएसआर काँग्रेस, डीएमके, टीएमसी आणि आम आदमी पार्टी या आठ पक्षांसोबत काम केले आहे.
8 / 8
प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्या जेडीयूसोबत सक्रिय राजकारणात पदार्पण केले होते. प्रशांत किशोर हे १६ सप्टेंबर २०१८ रोजी जेडीयूमध्ये सामील झाले होते आणि ऑक्टोबर महिन्यात पक्षाने त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवले होते. एकेकाळी नितीश कुमार यांचे उत्तराधिकारी म्हणूनही त्यांच्या नावाची चर्चा होती, पण २०२० च्या सुरुवातीला चित्र बदलले. २९ जानेवारी २०२० रोजी जेडीयूने प्रशांत किशोर यांची पक्षातून हकालपट्टी केली. जेडीयूमधून हकालपट्टी झाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी लोकांच्या राजकीय जनजागृतीसाठी २०२० मध्ये जन सुराज अभियान सुरू केले होते. प्रशांत किशोर यांनी २ ऑक्टोबर २०२२ रोजी गांधी आश्रम भिटारिहवा येथून जन सुराज पदयात्रा सुरू केली होती.
टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहारPoliticsराजकारण