राम मंदिर निधी संकलनात काँग्रेसशासित राज्ये आघाडीवर; 'या' ठिकाणी सर्वाधिक देणगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 14:10 IST
1 / 15अयोध्येत भव्य राम मंदिर (Ram Mandir) उभारणीसाठी देशव्यापी निधी संकलनाची मोहीम हाती घेण्यात आली होती. देशभरातून राम मंदिरासाठी (Ram Mandir Donation) देणगी गोळा करण्याचे काम सुरू होते. आता घरोघरी जाऊन देणगी गोळा करण्याचे काम बंद करण्यात आले आहे. 2 / 15मकर संक्रांतीपासून राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी देशव्यापी मोहीम हाती घेण्यात आली होती. माघ पौर्णिमेला देणगी गोळा करण्याच्या मोहिमेचा समारोप करण्यात आल्याची माहिती राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते चंपत राय यांनी दिली आहे. 3 / 15राम मंदिरासाठी घरोघरी जाऊन देणगी गोळा करण्याची मोहीम आता बंद करण्यात आली आहे. नागरिकांना देणगी द्यायची असेल, तर त्यांनी ती ऑनलाई पद्धतीने द्यावी. त्यासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊ शकतात. आगामी ३ वर्षांमध्ये राम मंदिराची उभारणी पूर्ण होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. 4 / 15आतापर्यंत देशभरात राम मंदिर उभारणीसाठी गोळा करण्यात येणाऱ्या देणगी मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभला. अनेक मंत्री, नेते, लोकप्रतिनिथी यांच्यापासून ते सामान्य जनतेपर्यंत अनेकांनी यथाशक्ती राम मंदिरासाठी देणग्या दिल्या असून, मुस्लिम बांधवांनीही यात उत्स्फुर्त सहभाग नोंदवल्याचे सांगितले जात आहे. 5 / 15राम मंदिराच्या उभारणीसाठी गोळा करण्यात आलेल्या देणगीची रक्कम सुमारे अडीच हजार कोटींपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. विश्व हिंदू परिषदेकडून ही माहिती देण्यात आली. राम मंदिरासाठी करण्यात येणाऱ्या निधी संकलनात काँग्रेसशासित राज्ये आघाडीवर असल्याचेही सांगितले जात आहे. 6 / 15राम मंदिरासाठी देणगी देण्यामध्ये राजस्थान राज्य अव्वल ठरले असून, संपूर्ण राज्यातून ५१५ कोटी रुपयांचा निधी संकलित करण्यात आल्याचे चंपत राय यांनी सांगितले. राजस्थामधील ३६ हजार गावे आणि शहरांमधून देणग्या गोळा करण्यात आल्या. यासाठी ७५ हजार पथकांची नेमणूक करण्यात आली होती. 7 / 15एकूण ४२ दिवस राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्याची मोहीम सुरू होती. राम मंदिरासाठी पंजाबमधून आतापर्यंत ४१ कोटी रुपयांची देणगी जमा झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, हा आकडा वाढेल, असे सांगितले जात आहे. 8 / 15राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी संपूर्ण देशात एकूण तब्बल १.७५ लाख पथकांची नेमणूक करण्यात आली होती. यामध्ये एकूण ९ लाख कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी देशभरातील चार लाख गावांमध्ये जाऊन राम मंदिरासाठी देणगी गोळा केली, असे चंपत राय यांनी सांगितले. 9 / 15हे अभियान पारदर्शकतेने पूर्ण होण्यासाठी ४९ नियंत्रण केंद्र स्थापन करण्यात आले होते. या प्रक्रियेसाठी दोन सनदी लेखापाल यांच्या नेतृत्वाखाली २३ जणांची टीम कार्यरत आहे. तसेच हैदराबाद येथील धनुष इन्फोटेक कंपनीने विकसित केलेल्या अॅपचाही उत्तम उपयोग झाला, मदत झाली, असेही चंपत राय यांनी नमूद केले. 10 / 15तामिळनाडूतून ८५ कोटी, केरळमधून १३ कोटी, अरुणाचल प्रदेशमध्ये साडे चार कोटी आणि मणिपूर येथून दोन कोटी रुपयांची देणगी जमा झाली आहे. पश्चिम बंगाल आणि अन्य काही राज्यांमधून अपेक्षित अंदाजापेक्षा अधिक देणगी जमा झाली, अशी माहिती चंपत राय यांनी दिली. 11 / 15आतापर्यंत ३८ हजार १२५ कार्यकर्त्यांनी गोळा केलेल्या देणग्या राम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासाच्या खात्यात जमा केली आहे. जमा झालेल्या एकूण देणगीचा आकडा अजून वाढू शकतो. कारण सर्व ठिकाणाहून अद्याप खात्यात देणग्या जमा करण्याचे काम सुरू आहे. यानंतर निश्चित आकडा समजू शकेल, असे चंपत राय यांनी सांगितले. 12 / 15अयोध्येतील राम मंदिराचा विस्तार आता ७० एकरवरून १०७ एकरपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यासाठी, राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राने राम जन्मभूमी परिसरात ७,२८५ वर्ग फूट जमीन खरेदी केली आहे. या जमिनीच्या खरेदीसाठी १,३७३ रुपये प्रति वर्ग फूटच्या दराने एक कोटी रुपयेही देण्यात आले आहेत. 13 / 15अयोध्येतील मुख्य राम मंदिराची उभारणी ही ५ एकर जागेतच होणार आहे. इतर जमिनीवर पुस्तकालय आणि संग्रहालय यांसारखे केंद्र बनविण्यात येणार आहेत. सद्यस्थितीनुसार, ट्रस्ट विस्तारीत १०७ एकरमध्ये भव्य राम मंदिराची उभारणी करणार आहे.14 / 15राम मंदिराच्या ४०० फूट लांबी, २५० फूट रुंदी आणि ४० फूट खोलीतून मलबा काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. १६.५ फूट उंचीपर्यंत दगडी बांधकाम करण्यात येणार असून, त्यावर मंदिर उभे राहील, असे सांगितले जात आहे. जमिनीवरून राम मंदिराची उंची १६० फूट असेल. १६१ फूट लांब आणि २३५ फूट रुंद राम मंदिर बांधले जाणार आहे.15 / 15पर्यावरणाला धक्का न लागता राम मंदिर उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ५ हजार महाकाय वृक्षांचे स्थानांतरण करण्यात येणार आहे. सुमारे ६४ एकर भूमीवर आर्किटेक काम करत आहेत.