शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russia Ukraine Conflict: भारत रशियाचे 'ते' उपकार कसे विसरणार; एकेकाळी अमेरिकेच्या मागे लावलेला युद्धनौकांचा ताफा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 7:36 PM

1 / 12
बांग्लादेशला स्वतंत्र करण्यासाठी भारताने पाकिस्तानशी युद्ध छेडले होते. प्रसंग बाका होता. अमेरिकेने जपानमध्ये तैनात असलेल्या युद्धनौका, पाणबुड्यांचा ताफा भारताच्या दिशेने पाठविला होता. भारतावर हल्ला करण्याचा अमेरिकेचा उद्देश होता.
2 / 12
अमेरिकेने पाकिस्तानला दिलेली पीएनएस गाझी ही पाणबुडी भारताची जुनी परंतू भक्कम युद्धनौका आयएनएस विक्रांत बुडविण्यासाठी बंगालच्या उपसागरात आली होती. अशावेळी रशियाने मोठा निर्णय घेतला आणि जग काय म्हणेल याची चिंता न करत बसता भारताच्या मदतीला धावून आला होता.
3 / 12
आज युक्रेनवरून रशियाने युद्धाला जवळपास तोंड फोडले आहे. युक्रेन वादावर रशियाने भारताची साथ मागितली आहे. तर त्याच अमेरिकेने भारताला रशियाविरोधात येण्यास सांगितले आहे. भारत एका विचित्र कोंडीत सापडलेला असला तरी रशियाचे तेव्हाचे उपकार कसे विसरायचे अशा मनस्थितीत अडकला आहे.
4 / 12
पाकिस्तानशी युद्ध अंतिम टप्प्यात आले होते. यावेळी अमेरिकेने पाकिस्तान हरत असल्याचे पाहून भारतावर हल्ला करण्यासाठी मोठा ताफा पाठविला होता. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्या आदेशावरून जपानच्या तळावर तैनात असलेल्या युद्धनौकांचा सातवा ताफा भारताकडे कूच करत होता.
5 / 12
जपानमध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या सातव्या ताफ्यात युएसएस एंटरप्राईस नावाची एक तेव्हाची सर्वात खतरनाक युद्धनौका होती, जिच्यावर अण्वस्त्रवाहू विमाने तैनात होती. याचबरोबर अन्य युद्धनौका होत्या. हा ताफा एवढा शक्तीशाली होता की एकदा इंधन भरले की जगाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर न थांबता जाऊ शकत होता.
6 / 12
बंगालच्या सागरात एकटी विक्रांत पीएनएस गाझीशी लढत होती. अत्यंत चपळाईने या युद्धनौकेने गाझीला समुद्राच्या तळाशी पाठविले. इथेच पाकिस्तान आणि अमेरिकेची पहिली हार झाली होती. अत्यंत अद्ययावत आणि खतरनाक असलेली पाणबुडी भारताने बुडविली होती.
7 / 12
अमेरिकेचा भारताकडे येत असलेला युद्धनौकांचा ताफा विक्रांतच्या तुलनेत कित्येक पटींनी शक्तीशाली होता. अमेरिकेने या पावलामागे बांगलादेशात अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे कारण जरी दिले असले तरी त्यामागचे इप्सित वेगळेच होते, जे कदापीही पूर्ण झाले नाही.
8 / 12
अमेरिकेविरोधात भारताचा कसा निभाव लागेल, या चिंतेत रशिया पडला होता. योगायोग म्हणजे तेव्हाच भारत आणि रशियामध्ये मैत्री आणि सहकार्य करार झाला होता. रशियाला अमेरिकेच्या या पावलाची भनक लागताच मॉस्कोने तात्काळ निर्णय घेतला.
9 / 12
भारतावर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने नौसेनेच्या तीन बटालियनना हल्ल्याच्या तयारीचे आदेश दिले होते. एवढेच नाही तर अमेरिकन एअरक्राफ्ट कॅरिअर यूएसएस एंटरप्राईजला भारतीय शहरांवर हवाई हल्ल्याचे आदेश दिले होते. तसेच पाकिस्तानला भारताविरोधात लढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रेही पुरविण्यात येत होती.
10 / 12
रशियाने तातडीने युएनकडे मदत मागितली. तिकडून काही प्रतिसाद येण्याची वाट न बघता रशियाने मोठा निर्णय घेतला होता. प्रशांत महासागरात तैनात असलेला युद्धानौका आणि पाणबुड्यांच्या ताफ्याला तातडीने, शक्य तेवढ्या लवकर हिंदी महासागरात जाण्याचे आदेश देण्यात आले. अमेरिका याबाबत अनभिज्ञ होता.
11 / 12
पाकिस्तानही अमेरिकेच्या जहाजांची वाट पाहत होता. तोवर त्यांनी शरणागती पत्करण्यासाठी वेळकाढू पणा चालविला होता. रशियाच्या युद्धनौकांनी तेवढ्यातच अमेरिकेच्या युद्धनौकांचा पाठलाग सुरु केला. जोपर्यंत त्या भारतापासून दूर जात नाहीत तोवर त्यांच्या मागावर राहिले.
12 / 12
रशियाने युएनमध्ये भारताला मदत करण्यासाठी दबाव वाढविला. या युद्धावेळी अमेरिकेसह अन्य देश पाकिस्तानच्या समर्थनात उभे ठाकले. अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांत युद्ध थांबविण्याचा प्रस्ताव आणून पाकिस्तानची मदत करण्याचा प्रयत्न चालविला होता. मात्र, रशियाने या प्रस्तावर विटो आणत भारताची मदत केली होती.
टॅग्स :IndiaभारतRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तान