शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सात दिवसांपासून पाच वर्षे, असा राहिलाय नितीश कुमारांचा मुख्यमंत्रिपदाचा प्रत्येक कार्यकाळ

By बाळकृष्ण परब | Published: November 16, 2020 3:04 PM

1 / 9
जेडीयूचे नेते नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून आज सातव्यांदा शपथ घेणार आहेत. नितीश बाबूंनी यापूर्वी सहा वेळा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. आज आपण घेऊया त्यांच्या प्रत्येक कारकीर्दीचा आढावा
2 / 9
नितीश कुमार यांनी ३ मार्च २००० रोजी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली होती. मात्र पुरेसे बहुमत पाठीशी नसल्याने त्यांचे सरकार अवघ्या ७ दिवसांत पडले होते.
3 / 9
२००५ च्या सुरुवातील बिहारमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे राज्यात पुन्हा विधानसभेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत जनतेने नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या बाजूने स्पष्ट कौल दिला होता. त्यानंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.
4 / 9
२०१० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला प्रचंड बहुमत मिळाले होते. त्यानंतर नितीश कुमार तिसऱ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले. मात्र मधल्या काळात त्यांनी मोदींच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीला विरोध केल्याने भाजपाने सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. मात्र त्यामुळे नितीश कुमार यांच्या खुर्चीवर परिणाम झाला नाही. पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला दारुण पराभव स्वीकारावा लागल्याने नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
5 / 9
२०१४ मध्ये मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर अल्पकाळातच नितीश कुमार यांचे मुख्यमंत्रिपदी पुनरागमन झाले. जीतनराम मांझी यांना राजीनामा देण्यास भाग पाडून २२ फेब्रुवारी २०१५ रोजी नितीश कुमार मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.
6 / 9
२०१५ मध्ये झालेली विधानसभेची निवडणूक नितीश कुमार यांनी आरजेडी आणि काँग्रेससोबत महाआघाडी तयार करून लढवली. या निवडणुकीत महाआघाडीला प्रचंड बहुमत मिळाले. आरजेडी सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र नितीश कुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. पण महाआघाडीसोबतचा घरोबा फार काळ चालला नाही आणि २६ जुलै २०१७ रोजी नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा घेतला.
7 / 9
रातोरात घडलेल्या घटनाक्रमांमध्ये महाआघाडीची साथ सोडल्यानंतर नितीश कुमार यांनी काही तासांतच भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केले होते.
8 / 9
नितीश कुमार हे गेली १५ वर्षे बिहारमध्ये मुख्यमंत्री असले तरी त्यांनी आपल्या राजवटीत सलगपणे एकदाच मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यात २०१४ मध्ये त्यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा जीतनराम मांझी यांच्याकडे सोपवली होती. तर २०१७ मध्ये महाविकास आघाडीसोबतचा घरोबा मोडून पुन्हा एनडीएत आल्याने त्यांचा कार्यकाळ दोन टप्प्यात विभागला गेला होता.
9 / 9
आता आज पुन्हा एकदा नितीश कुमार बिहारचे मुख्यंमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. आता त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा सातवा कार्यकाळ किती दिवस चालेल याचं उत्तर येणार काळच देईल.
टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारChief Ministerमुख्यमंत्रीPoliticsराजकारण