sur jyotsna national music awards 2021 honor of maithili thakur and lydian nadaswaram
Sur Jyotsna National Music Awards 2021: मैथिली ठाकूर, लिडियन नादस्वरम यांचा सन्मान; 'सूर ज्योत्स्ना' पुरस्कार सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 8:28 AM1 / 6दिल्लीतील कमानी ऑडिटोरियममध्ये उदयोन्मुख गायिका मैथिली ठाकूर व युवा संगीतकार लिडियन नादस्वरम यांना २०२१ च्या आठव्या लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने एका शानदार सोहळ्यात केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.2 / 6एक लाख रुपये रोख, गौरवचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला, आचार्य लोकेश मुनीजी, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रख्यात सरोदवादक अमजद अली खान, पंडित साजन मिश्रा, प्रसिद्ध गायक रुपकुमार राठोड व सोनाली राठोड, पद्मभूषण राजीव सेठी, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू प्रामुख्याने उपस्थित होते. 3 / 6कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा म्हणाले, ज्योत्स्ना दर्डा एक संगीत साधक होत्या. संगीतामध्ये समाजात बदल घडवून आणण्याची क्षमता आहे, यावर ज्योत्स्ना दर्डा यांचा विश्वास होता. सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत अवाॅर्ड देण्यामागे देशातील उदयोन्मुख कलावंतांना समोर आणण्याचे उद्दिष्ट आहे. यावर्षी राजधानी दिल्लीत हा समारोह होत आहे, याचा मला अधिक आनंद आहे. देशाच्या राजधानीत एखाद्या कलावंतांला सन्मान मिळतो, याची दखल देशात घेतली जाते, असेही विजय दर्डा यावेळी म्हणाले.4 / 6माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि लोकमतचे अध्यक्ष विजय दर्डा यांच्यात नवी दिल्ली येथील ८ व्या सूर ज्योत्स्ना पुरस्कार कार्यक्रमात मनमोकळ्या गप्पा रंगल्या.5 / 6यावेळी बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले, कलावंतांना जात, धर्म, प्रांत, भाषा वगैरेचे कोणतेही बंधन नसते. संगीत व खेळाच्या क्षेत्रात जात व धर्म विचारला जात नाही. केवळ कौशल्याच्या भरवशावर जगात आपली वेगळी ओळख निर्माण करता येते. कोरोना काळातही लोकमत परिवाराने पुरस्काराची परंपरा कायम ठेवली, या कार्यक्रमाचे आयोजन केले, उदयोन्मुख कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. राष्ट्रीय स्तरावरील प्रतिभेचा शोध घेण्याचे काम लोकमतने केले, हे खरोखरच स्तुत्य आहे. यासाठी लोकमत परिवार अभिनंदनास पात्र असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.6 / 6जम्मू व काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला म्हणाले, संगीतामध्ये एक वेगळी, माणसाला जिवंत ठेवण्याची शक्ती आहे. कलेच्याप्रति लोकमत परिवाराची आस्था अभिनंदनीय आहे. संगीताने माणुसकी व सर्वधर्मसमभावाची पेरणी व्हावी व या देशात शांतता नांदावी, असे भावनिक आवाहन डॉ. फारुक अब्दुल्ला यांनी केले. यावेळी बोलताना केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी लोकमत परिवाराशी असलेल्या व लोकमतच्या सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. आणखी वाचा Subscribe to Notifications