शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Joshimath Sinking News: ४७ वर्षांपूर्वीच दिला होता इशारा! जोशीमठातील ६०३ घरांना मोठे तडे; भुस्खलनाचे कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2023 12:34 PM

1 / 15
जोशीमठ हे उत्तराखंडमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. मात्र सध्या जोशीमठमध्ये होणारे भूस्खलन, भिंतींना गेलेले तडे आणि रस्त्यांना पडलेल्या मोठ-मोठ्या भेगा आणि सुरू असलेल्या आंदोलने देशात चर्चेचा विषय ठरली असल्याचे म्हटले जाते आहे. जोशीमठमधील ९ हून अधिक भागातील ६०३ घरांना मोठे तडे गेले आहेत. (Joshimath Sinking News)
2 / 15
उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये अनेक ठिकाणी जमीन खचत आहे. शेकडो घरांना तडे गेले आहेत. दिवसेंदिवस येथील परिस्थिती बिकट होत चालल्याचे सांगितले जात आहे. यामुळे जोशीमठमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमीन खचण्याचे, घरांना तडे जाण्याचे नेमके कारण काय, हा प्रश्न शेकडो जणांना पडला आहे.
3 / 15
जोशीमठमध्येच एनटीपीसी वीज प्रकल्पाच्या बोगद्याचे काम सुरू आहे. या बोगद्याच्या कामामुळे जोशीमठमध्ये अशा घटना घडत असल्याचे बोलले जात आहे. एनटीपीसीने वीज प्रकल्पात स्फोटके वापरण्याऐवजी टीव्हीएम मशिनचा वापर करण्यात येत आहे. जेणेकरुन स्फोटांमुळे होणारा परिणाम जोशीमठ परिसरावर होऊ नये.
4 / 15
TVM मशिनने बोगदा बांधण्याचे काम सुरू सुरळीतपणे सुरू होते. मात्र, २००९ मध्ये बोगद्याचे ११ कि.मी. काम पूर्ण झाल्यानंतर टीव्हीएम मशीनच भूस्खलनात गाडले गेले. २४ सप्टेंबर २००९ रोजी TVM पहिल्यांदा अडकले. त्यानंतर ६ मार्च २०११ रोजी पुन्हा या मशिनद्वारे काम सुरू झाले. १ फेब्रुवारी २०१२ रोजी पुन्हा काम बंद झाले.
5 / 15
१६ ऑक्टोबर २०१२ रोजी पुन्हा काम सुरू झाले. परंतु २४ ऑक्टोबर २०१२ रोजी ते पुन्हा बंद झाले. यानंतर, TVM मशीनद्वारे २१ जानेवारी २०२० रोजी काम करण्यात आले. आणि बोगद्याचे काम २० मीटरने पुढे गेले. तेव्हापासून तो बंद आहे. एनटीपीसीच्या या प्रकल्पाशिवाय जोशीमठमध्ये हेलांग मारवाडी बायपासलाही विरोध होत आहे.
6 / 15
मिश्रा आयोगाच्या १९७६ च्या अहवालात जोशीमठच्या मुळाशी छेडछाड केल्यास जोशीमठला धोका निर्माण होईल, असे म्हटले होते. या आयोगातर्फे जोशीमठचे सर्वेक्षण करण्यात आले, ज्यामध्ये जोशीमठ हे मोराइन (हिमनगासोबत येणारी माती) वसलेले असल्याचे सांगण्यात आले, जे अत्यंत संवेदनशील मानले जात होते.
7 / 15
मिश्रा आयोगाच्या अहवालात जोशीमठच्या मुळाशी जोडलेल्या खडक आणि दगडांना अजिबात धक्का लागता कामा नये, असे सांगण्यात आले. त्याचबरोबर येथे होत असलेले बांधकाम मर्यादित कार्यक्षेत्रात करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी होऊ शकली नाही.
8 / 15
एकीकडे जोशीमठमध्ये एनटीपीसीच्या ५२० मेगावॅटच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे, तर दुसरीकडे हेलांग मारवाडी बायपासचे बांधकामही सुरू झाले आहे. असे प्रकल्प बंद व्हावेत, यासाठी अनेक मोठी आंदोलनेही करण्यात आली. मात्र सरकारने लक्ष दिले नाही. याच काळात जोशीमठमध्ये नव्याने जमीन खचण्याची घटना सुरू झाली आहे.
9 / 15
१९७० च्या दशकातील चमोलीत झालेल्या बेलाकुची पुरामुळे जोशीमठमध्ये दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. चमोली तेव्हा उत्तर प्रदेशचा भाग होता. जमीन खचण्याच्या घटना समोर आल्यानंतर, यूपी सरकारने गढवालचे आयुक्त मुकेश मिश्रा यांना आयोग स्थापन करून सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले.
10 / 15
१९७५ मध्ये आयुक्त मुकेश मिश्रा यांनी एक आयोग स्थापन केला. याला मिश्रा आयोग म्हणत. यामध्ये भूवैज्ञानिक, अभियंते, प्रशासनातील अनेक अधिकारी सामील होते. एक वर्षानंतर आयोगाने आपला अहवाल सरकारला सादर केला. या अहवालात जोशीमठ हे वालुकामय खडकावर वसलेले असल्याचे म्हटले होते.
11 / 15
जोशीमठच्या पायथ्याशी कोणतेही मोठे काम करता येत नाही. स्फोट, खाणकाम या सर्व बाबींचा उल्लेख या अहवालात करण्यात आला होता. मोठे बांधकाम किंवा खाणकाम करू नये तसेच अलकनंदा नदीच्या काठावर सुरक्षा भिंत बांधावी, येथून वाहणाऱ्या नाल्यांचे संरक्षण करावे, असे सांगण्यात आले, मात्र या अहवालाकडे सरकारने दुर्लक्ष केले, असे सांगितले जात आहे.
12 / 15
दरम्यान, जोशीमठमधील परासारी, रविग्राम, सुनील, वरचा बाजार, नरसिंग मंदिर, मनोहर बाग, सिंहधर, मारवाडी आणि गांधी नगर – या भागात घरांमध्ये केवळ तडे गेलेले नाहीत, तर या भेगा रुंदावत आहेत. अनेक ठिकाणी जमीन खचली असून अनेक ठिकाणी भिंतींमधून अचानक पाणी येत आहे.
13 / 15
भूस्खलन आणि तडे जाण्याच्या घटनांमुळे लोक भयभीत झाले आहेत. अनेकांना तर भीतीमुळे घरे सोडावी लागत आहेत. जोशीमठ-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या मारवाडी परिसरात खड्ड्यांमधून अचानक पाणी वाहू लागले आहे. याशिवाय जोशीमठच्या मुख्य पोस्ट ऑफिसला तडे गेले असून, ते दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे.
14 / 15
ज्योतिर्मठ संकुल आणि लक्ष्मी नारायण मंदिराच्या आजूबाजूच्या इमारतींना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. यानंतर आजूबाजूच्या लोकांनी घरे रिकामी केली आहेत. प्रशासनाने काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. असे असतानाही या कडाक्याच्या थंडीत अनेकांना उघड्यावर राहावे लागत आहे.
15 / 15
जोशीमठच्या लोकांचे म्हणणे आहे की त्यांच्या घरांना तडे जाण्याचे कारण एनटीपीसीच्या तपोवन विष्णुगड जलविद्युत प्रकल्पाचा बोगदा आहे. त्याच्या बांधकामावर बंदी घालण्याची मागणी लोक करत आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आता जोशीमठमध्ये कोणत्याही प्रकारच्या बांधकामांना बंदी घालण्यात आली आहे.
टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड