शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Photos: ‘वंदे भारत स्लीपर’ची पहिली झलक आली! १६० किमी वेग, अत्याधुनिक सोयी, आरामदायी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2024 6:10 PM

1 / 9
First Look Of Vande Bharat Sleeper Train: सन २०१९ मध्ये मेक इन इंडिया अंतर्गत पहिली वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली आणि भारताने एक नवा इतिहास घडविला. सुरुवातीला या ट्रेनचे नाव ट्रेन-१८ असे होते. त्यानंतर ते बदलून वंदे भारत ट्रेन असे करण्यात आले. त्यानंतर काही अंतराने एकामागून एक अनेक वंदे भारत ट्रेन देशभरातील विविध ठिकाणी सुरू करण्यात आल्या.
2 / 9
वंदे भारत ट्रेनच्या धर्तीवर सामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी आणि कमी तिकीट दरात जलदसेवा मिळावी, यासाठी अमृत भारत ट्रेन सुरू करण्यात आली. यानंतर आता गेल्या काही वर्षांचे अथक प्रयत्न आणि संशोधनानंतर देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येण्यास सज्ज झाली आहे.
3 / 9
वंदे भारत स्लीपर ट्रेनसह वंदे भारत मेट्रोवरही मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून, वंदे भारत मेट्रोच्या ट्रायल रन सुरू झाल्या आहेत. बंगळुरूच्या बीईएमएल कारखान्यात वंदे भारत स्लीपर ट्रेनचे पहिले प्रोटोटाइप मॉडल बनून पूर्ण झाले असून, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या ट्रेनची पाहणी केली.
4 / 9
यानंतर या ट्रेनचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. इतकेच नव्हे तर प्रवासी, रेल्वेप्रेमी यांच्याकडून नव्या कोऱ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या ट्रेनची पाहणी करताना अनेक गोष्टी समजून घेतल्या. इतकेच नव्हे तर स्लीपर कोचच्या अप्पर बर्थवर चढण्याचा प्रयत्न करत त्याच्या सोयी, सुलभता कशी आहे, हेही पाहिल्याचे काही व्हिडिओंमधून पाहायला मिळत आहे.
5 / 9
नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत बोलायचे झाल्यास, त्याच्या इंजिनाचा दर्शनी भाग हा साधारण आताच्या वंदे भारत ट्रेनसारखाच दिसत आहे. केशरी, करड्या आणि काळ्या रंगसंगतीत असलेला दर्शनी भाग अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळत आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या इंटेरिअरचा विचार केल्यास प्रत्येक बर्थसाठी काही विशेष सोयी केल्याचे आढळून येत आहे.
6 / 9
यामध्ये रिडिंग लाइट, वॉटर बॉटल होल्डर, काही छोटे सामान ठेवण्याची सोय करण्यात आल्याचे काही फोटोंवरून दिसत आहे. तसेच अनेक ठिकाणी एलईडी लाइट्सचा भरपूर वापर केल्याचे पाहायला मिळत आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनचे तंत्रज्ञान बहुतांशी वंदे भारत ट्रेनसारखेच असणार आहे. ताशी १६० किमी वेगाने धावण्याची क्षमता या ट्रेनची असणार आहे.
7 / 9
वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसला एकूण १६ डब्बे असणार आहेत. यात प्रोटोटाईपमध्ये ११ एससी ३ टिअर कोच, ४ एससी २ टिअर कोच आणि एक एससी फर्स्ट क्लास कोच असणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन जागतिक दर्जाचे बनवण्यात आले आहे. युरोपीय मानकांनुसार ही ट्रेन बनवण्यात आली आहे, असे बीईएमएलकडून सांगितले जात आहे.
8 / 9
लवकरच या प्रोटोटाइप वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी सुरू होणार आहे. पुढील काहीच दिवसांत या ट्रेनच्या अत्यावश्यक सर्व चाचण्या पूर्ण केल्या जाणार आहेत. पुढील तीन महिन्यात यातील पहिली ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे.
9 / 9
भारतात तयार केलेल्या वंदे भारत चेअर कार ट्रेनला विदेशातूनही मागणी असून, आगामी काही वर्षांत वंदे भारत ट्रेन एक्सपोर्ट केल्या जाणार असल्याचे म्हटले जात आहे. यातच नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी कधी पूर्ण होते आणि प्रत्यक्षात ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत कधी येते, कोणत्या मार्गांवर ही ट्रेन पहिल्यांदा धावणार, याची उत्सुकता लागली असून, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव