पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणं लिहितं तरी कोण?; अखेर उत्तर मिळालं By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 9:57 AM
1 / 10 पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणं कायमच चर्चेचा विषय ठरतात. त्यांचे समर्थक त्यांच्या वक्तृत्वशैलीचं तोंडभरून कौतुक करतात. तर मोदींच्या भाषणांना, त्यातल्या घोषणांना विरोधक लक्ष्य करतात. 2 / 10 २०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्याआधी त्यांनी देशभरात झंझावाती प्रचार केला. यावेळी त्यांनी शेकडो सभा गाजवल्या. काँग्रेसवर हल्लाबोल करणारी मोदींची भाषणं जनतेला भावली. मतदारांनी भाजपला भरभरून मतदान केलं. 3 / 10 पंतप्रधान मोदींची भाषणं, त्यांची शब्दफेक, शब्दांची निवड, वक्तृत्वशैलीची अनेकदा चर्चा होते. कोरोनामुळे सध्या मोदी अनेक ठिकाणी व्हर्च्युअली भाषण करतात. कधी कधी ते दिवसातून चार-पाच भाषणं करतात. 4 / 10 मोदींनी आतापर्यंत शेकडो भाषणं केली आहेत. विविध कार्यक्रमांमध्ये विविध विषयांवर मोदी भाषणं करतात. मोदींची ही भाषणं नेमकं कोण लिहितं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. 5 / 10 पंतप्रधान मोदींची भाषणं कोण लिहितो, याची माहिती मिळवण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे आरटीआयच्या अंतर्गत एक अर्ज करण्यात आला होता. मोदींची भाषणं कोण तयार करतं, यामध्ये किती जणांचा सहभाग असतो, यावर किती खर्च येतो, असे प्रश्न अर्जातून विचारण्यात आले होते. 6 / 10 पंतप्रधान कार्यालयानं या अर्जाला उत्तर दिलं आहे. मात्र त्यात मोदींची भाषणं तयार करण्यासाठी होणाऱ्या खर्चाची माहिती नाही. 'विविध विषयांवर वेगवेगळ्या स्रोतांमधून माहिती गोळा केली जाते. भाषणांना अंतिम स्वरुप देण्याचं काम खुद्द पंतप्रधान मोदीच करतात,' असं पीएमओनं उत्तरात म्हटलं आहे. 7 / 10 'कार्यक्रमाचं स्वरुप पाहून अनेक व्यक्ती, अधिकारी, विभाग, प्रतिष्ठानं, संघटना मोदींच्या भाषणांसाठी इनपुट्स देतात. या माहितीचा वापर करून मोदी स्वत:च्या भाषणाला अंतिम स्वरुप देतात,' असं पीएमओनं सांगितलं आहे. 8 / 10 जवाहरलाल नेहरूंपासून नरेंद्र मोदींपर्यंत प्रत्येक पंतप्रधानांचं भाषण तयार करण्यात पक्षाचे विभाग, मंत्रालयं, विषयातील तज्ज्ञ, पंतप्रधानांची खासगी टीम यासारख्या विविध घटकांचा सहभाग असतो, अशीदेखील माहिती पीएमओनं दिली आहे. 9 / 10 पंतप्रधान मोदी उत्तम वक्ते आहेत. या बाबतीत त्यांची तुलना माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत केली जाते. 10 / 10 पंतप्रधान मोदींनी विविध व्यासपीठांवर भाषणं केली आहेत. त्यांच्या भाषणांची कायमच चर्चा होते. त्यांचे समर्थक त्यांच्या भाषणांचं कौतुक करतात. तर विरोधक त्यांच्या भाषणांवर शरसंधान साधतात. आणखी वाचा