शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगात २० नोव्हेंबर पण भारतात 14 नोव्हेंबरलाच बालदिन का साजरा होतो? जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्व...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 12:22 PM

1 / 5
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जयंतीनिमित्त १४ नोव्हेंबर या दिवशी बालदिन साजरा करण्यात येतो. देशाचे भवितव्य असणाऱ्या लहान मुलांचं कौतूक करण्यासाठी आजच्या दिवशी बालदिन साजरा केला जातो. या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती देखील आहे.
2 / 5
लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं आहेत असं त्याचं मत होत. लहान मुलांवर ते अपार प्रेम करायचे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला. मुलांच्या हक्कांसाठी आणि सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्थेचे उत्तम पुरस्कर्ते होते. त्यांनी प्रत्येक बालकाला देशाचे भविष्य मानले आणि प्रत्येकाचे भरभरून कौतुक केले. त्यांना 'चाचा नेहरू' म्हणून देखील संबोधले जाते. 'मुले ही बागेतील कळ्यांसारखी असतात आणि त्यांचे काळजीपूर्वक आणि प्रेमाने पालनपोषण केले पाहिजे, कारण ते राष्ट्राचे आणि उद्याचे जागरूक नागरिक होणार आहेत,' असे नेहरूंनी त्यांच्या एका प्रसिद्ध भाषणात म्हटले होते.
3 / 5
यापूर्वी,भारतात बालदिन 20 नोव्हेंबर रोजी साजरा केला जात होता. 'जागतिक बालदिन' हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे जागतिक स्तरावर साजरा केला जातो. 1964 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर, भारतीय संसदेने त्यांचा वाढदिवस देशात अधिकृत बालदिन म्हणून साजरा करण्याचा ठराव जारी केला. तेव्हापासून, भारताच्या पहिल्या पंतप्रधानांच्या जयंती स्मरणार्थ भारत बालदिन साजरा करतो. हा दिवस देशात बालदिवस म्हणूनही ओळखला जातो.
4 / 5
जवाहरलाल नेहरूंच्या कार्यकाळात, राष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाच्या अनेक शैक्षणिक संस्था- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIMs) ची स्थापना करण्यात आली.
5 / 5
या दिवसाच्या स्मरणार्थ, मुलांवर खूप प्रेम, भेटवस्तू देऊन त्यांचे लाड केले जातात. देशभरातील शाळा मुलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करतात. शिवाय मुलांना विविध प्रकारच्या भेटवस्तू, पुस्तके आणि कार्डे दिले जातात. खेळ, चर्चासत्रे, नृत्य, संगीत, निबंध, भाषण आणि चित्रकला स्पर्धांचे देखील आयोजन केले जाते.
टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूchildren's dayबालदिन