पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी का महत्वाचा आहे 7 ऑक्टोबरचा दिवस? जाणून घ्या या तारखेचा इतिहास... By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 4:47 PM
1 / 7 नवी दिल्ली: या वर्षीचा 7 ऑक्टोबर हा पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ऐतिहासिक दिवस असणार आहे. पंतप्रधानांनी देवभूमी उत्तराखंडला भेट देण्यासाठी हाच दिवस निवडला आहे. पंतप्रधान मोदी 7 ऑक्टोबर रोजी त्यांच्या घटनात्मक पदाची 20 वर्षे पूर्ण करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दिवशी पंतप्रधान उत्तराखंडच्या दौऱ्यावर असतील आणि या ऐतिहासिक दिवशी ते केदारनाथ धामला जाऊन भगवान शंकराचे आशीर्वाद घेतील. 2 / 7 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केदारनाथ धामवर प्रचंड विश्वास आहे. ऐंशीच्या दशकात नरेंद्र मोदींनी केदारपुरीतील मंदाकिनी नदीच्या डाव्या बाजूला असलेल्या गरुडचट्टी येथे दीड महिना ध्यान केलं होतं. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी 3 मे 2017 रोजी पहिल्यांदा केदारनाथला गेले. स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांनी त्यांच्या कार्यकाळात चार वेळा केदारनाथला भेट दिली. या अगोदर इंदिरा गांधी दोन वेळा पंतप्रधान म्हणून केदार बाबांच्या दर्शनाला पोहोचल्या होत्या. पीएम मोदी ठरवलेल्या कार्यक्रमानुसार, 7 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान उत्तराखंडमधील जॉलीग्रांट विमानतळ टर्मिनलचे आणि ऋषीकेश येथील एम्समधील ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन करतील. 3 / 7 7 ऑक्टोबर 2001 रोजी नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. मुख्यमंत्री ते पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पार करणाऱ्या मोदींनी आतापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. सर्वात जास्त दिवस पंतप्रधानपद भूषवणारे ते पहिले बिगर काँग्रेस नेते आहेत. त्यांच्या आधी हा विक्रम अटलबिहारी वाजपेयींच्या नावावर होता. 7 ऑक्टोबर 2001 रोजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही आणि ते सलग 4 वेळा गुजरातचे मुख्यमंत्री राहिले. 4 / 7 मोदींनी 22 मे 2014 पर्यंत सलग 12 वर्षे 227 दिवस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. संवैधानिक पदावर 20 वर्षे पूर्ण करणाऱ्या पीएम मोदींनी उत्तराखंडला भेट देण्यासाठी हा ऐतिहासिक दिवस निवडला आहे, त्यामुळे त्यांचा प्रदीर्घ राजकीय प्रवास आणि महत्त्वाच्या भूमिकांवरही यावेळी चर्चा व्हायला हवी. 5 / 7 गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. 2001 मध्ये मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्याच वर्षी भुज येथे झालेल्या भयंकर भूकंपामुळे गुजरातला मोठा फटका बसला. मग मोदींच्या 'व्हायब्रंट गुजरात' कार्यक्रमासारखी पावले राज्याच्या पुनर्रचनेत महत्त्वाची होती. गुजरातमध्ये विकासाचा असा टप्पा सुरू झाला, जो देशासाठी एक उदाहरण ठरला. 6 / 7 मोदींच्या गुजरातमधील कामाचा परिणाम असा होता की 2013 पासून त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार बनवण्याची मागणी भाजप आणि देशात सुरू झाली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी मागणी पाहून भाजपने तत्कालीन मुख्यमंत्री मोदींना पंतप्रधानपदाचा चेहरा बनवले. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने विक्रमी जागांसह निवडणूक जिंकली. 26 मे 2014 रोजी मोदी देशाचे 14 वे पंतप्रधान झाले. 7 / 7 केंद्रात सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख सातत्याने वाढत गेला. देशातच नव्हे तर परदेशातही मोदींची लोकप्रियता वाढली. 2019 च्या लोकसभेतही भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत विक्रमी संख्येने जागा जिंकल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा 30 मे 2019 रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. आणखी वाचा