ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 07 - अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदावरुन चुरसीची लढत होण्याची शक्यता आहे. एकीकडे सतत वादग्रस्त विधान करुन चर्चेत असलेले डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळण्यासाठी आघाडीवर आहेत. तर डेमोक्रॅटिक पक्षाकडून हिलरी क्लिंटन यांनीदेखील संख्याबळाचा आकडा गाठला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाकडून लवकरच त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात येईल. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उमेदवारी घोषित झाल्यास अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुक लढवणा-या हिलरी क्लिंटन पहिल्या महिला ठरणार आहेत. हिलरी क्लिंटन राष्ट्राध्यक्ष झाल्यास अमेरिकेच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळणार आहे. सुरुवातीच्या काळात राजकारणापासून लांब ठेवण्यात आलेल्या महिलांनी वेळोवेळी आपलं अस्तित्व सिद्ध केलं आहे. या निमित्ताने देशाचं नेतृत्व हाती घेणा-या महिलांबद्दल जाणून घेऊया... 1) भारत - इंदिरा गांधी (1917-1984)इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांगलादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता. लालबहादुर शास्त्री यांचा ताश्कंद येथे १९६६ मधे मृत्यू झाल्यानंतर कॉँग्रेस अध्यक्ष कामराज याच्या पाठिंब्याने १८६ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या २४ जानेवारी १९६६ रोजी श्रीमती इंदिरा गांधी प्रधानमंत्री म्हणून विजयी झाल्या. देशाच्या पाचव्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून त्यांनी धुरा हाती घेतली. १४ प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार या त्याच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या.१९७७ साली त्यानी देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८० पर्यंत त्या सत्तेपासून दूर राहिल्या. १९८० च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण यावेळी त्यांना अशांत पंजाबचा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामुळेच त्यांच्या २ सुरक्षारक्षकांकडून त्यांची हत्या झाली. 2) जर्मनी - अँगेला मर्केल जर्मनीच्या 2005मधील निवडणुकीत अँगेला मर्केल यांची सर्वात शक्तिशाली चान्सलर पदावर निवड करण्यात आली. जर्मनीचं चान्सलरपद भुषविणा-या अँगेला मर्केल पहिल्या महिला आहेत. अँगेला मर्केल यांचा पक्ष ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनिअनने 2005मध्ये थोड्या अंतराने निवडणूक जिंकली होती मात्र 2009 मध्ये मर्केल यांची लोकप्रियता इतकी वाढली होती की त्यांनी हे अंतर भरुन काढत मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली. 2015 मध्ये अँगेला मर्केल टाइम्स पर्सन ऑफ द इअर ठरल्या होत्या. युरोपातील शरणार्थीं संकट, ग्रीसमधलं आर्थिक संकट आणि युक्रेनमध्ये रशियाचा हस्तक्षेप अशा कठीण प्रसंगांना मर्केल खंबीरपणे सामोऱ्या गेल्या आहेत. जर्मनीच्या चॅन्सेलरपदी त्यांनी अकरा वर्ष पूर्ण केली असून, युरोपियन युनियनची सूत्रंही त्यांच्याच हाती आहेत. तब्बल २९ वर्षांनंतर एक महिला ‘टाइम्स पर्सन ऑफ द इअर’ ठरल्या. 3) पाकिस्तान - बेनझीर भुट्टो (1953-2007)पाकिस्तानसारख्या कट्टर देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचणारी पहिली महिला. वडील झुल्फीकार अली भुट्टो यांचा राजकीय वारसा त्यांना लाभला होता. 1982 मध्ये बेनझीर या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेतपदी निवडल्या गेल्या. त्यांच्यावर झियांच्या राजवटीची खूपच बंधने होती. झियांच्या पाठीशी अमेरिकेची सत्ता होती, पण झियांची जेव्हा उपयुक्तता संपली तेव्हा त्यांना बाजूला केले गेले. त्यांचा बहावलपूरहून इस्लामाबादला परतत असताना विमानाच्या स्फोटात मृत्यू झाला. त्यानंतर 1988 च्या निवडणुकीत बेनझीर प्रचंड बहुमतांनी निवडून आल्या. एका मुस्लिम राष्ट्राच्या त्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. त्यांचे सरकार लगेचच म्हणजे 1990 मध्ये आर्थिक भ्रष्टाचाराच्या आरोपावरून बडतर्फ करण्यात आले. नवाझ शरीफ यांचे सरकार त्यानंतरच्या निवडणुकीत सत्तेवर आले. त्यांचेही सरकार बडतर्फ करण्यात आले आणि 1993 च्या निवडणुकीत बेनझीर पुन्हा सत्तेवर आल्या. तेही सरकार अल्पायुषी ठरले आणि 1997 च्या निवडणुकीत पाकिस्तान मुस्लिम लीगचे नवाझ शरीफ विजयी झाले. 4) श्रीलंका - सिरिमाओ भंडारनायके - (1916 – 2000)सिरिमाओ भंडारनायके यांचे पती श्रीलंकेचे दुसरे पंतप्रधान सॉलोमन भंडारनायके यांच्या खुनानंतर त्या पंतप्रधान झाल्या. सिरिमाओ भंडारनायके श्रीलंकेच्या तर पहिल्या महिला पंतप्रधान होत्याच मात्र जगात प्रथमच एका महिलेने देशाचं नेतृत्व स्विकारलं होतं. श्रीलंकेच्या तीन वेळा अध्यक्ष 1960-65, 1970-77, 1994-2000 अशी त्यांची कारकिर्द होती. 5) ब्रिटन - मार्गारेट थॅचर - (1925-2013)मार्गारेट थॅचर ब्रिटनच्या पहिला महिला पंतप्रधान. त्यांना आयर्न ले़डी म्हणूनदेखील ओळखलं जात असं. 1979-80 या कालावधीत त्यांच्याकडे देशाची सुत्रे आली. कॉंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या असलेल्या मार्गारेट थॅचर 1979 ते 1990 या काळात पंतप्रधान होत्या. निवडणुकीच्या माध्यमातून सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेल्या युरोपातील पहिल्या महिला. इंदिरा गांधी, सिरिमाओ भंडारनायके आणि मार्गारेट थॅचर या एकाच वेळी आपापल्या देशाच्या सर्वोच्च स्थानी होता. या तिघींचे मैत्रीसंबंध हाही त्यावेळी चर्चेचा विषय असे. मार्गारेट थॅचर (वय 87) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मार्गारेट हिल्डा थॅचर यांचा जन्म लिंकनशायरमधील ग्रॅंथम येथे 13 ऑक्टोबर 1925 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अल्फ्रेड रॉबर्टस व आईचे नाव बिट्रेस होते. वडिलांच्या वर्तणुकीचा मार्गारेट यांच्यावर विशेष प्रभाव होता. 1959 मध्ये मार्गारेट थॅचर उत्तर लंडनमधील फिंचले येथून कॉंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदार झाल्या. नंतर त्या शिक्षणमंत्री होत्या. 1975 मध्ये त्यांनी तेव्हाचे पंतप्रधान एडवर्ड हिथ यांना आव्हान दिले आणि 1979, 1983 व 1987 च्या निवडणुकांत विजय मिळविला. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातच फॉकलंड बेटांच्या मालकीवरून ब्रिटन व अर्जेंटिना यांच्यात युद्ध झाले होते. सरकारी मालकीच्या अनेक उद्योगांचे त्यांच्या काळात खासगीकरण झाले. 6) म्यानमार - आँग सान सू क्यी आँग सान सू क्यी या म्यानमारमधील नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी पक्षाच्या अध्यक्षा व बर्मामधील लोकशाहीवादी चळवळीच्या कार्यरत नेत्या आहेत. त्यांनी आपल्या देशात लोकशाहीव्यवस्था आणण्यासाठी लष्करी राजवटीविरुद्ध सुमारे 25 वर्षे संघर्ष केला. म्यानमारच्या विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांनी ९ जून २०१२ रोजी पहिल्यांदा संसदेत पाऊल ठेवले. निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर म्यानमारच्या अध्यक्षपदी आँग सान सू की यांचा माजी वाहनचालक व अत्यंत विश्वासू तिन यॉ यांची निवड झाली.1962 साली म्यानमारमध्ये लष्करी सत्ता आली. मात्र, 1990 साली सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि त्यात एनएलडीला भरभरुन मतं मिळाली. मात्र, हा जनमत लष्करशाहीने नाकारला आणि निकाल नामंजूर केला.त्यानंतर नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी पक्षाच्या सर्वेसर्वा आणि लोकशाहीवादी नेत्या आँग सान सू की यांना तब्बल 15 वर्षे नजरकैदेत ठेवण्यात आलं. काळांतराने आँग सान सू की यांच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरुन दबाव वाढत गेला आणि अखेर 2010 साली लष्करशाहीने त्यांची सुटका केली. आँग सान सू की या 1991 सालच्या शांततेच्या नोबल पुरस्काराच्याही मानकरी आहेत.