शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चिंताजनक! २५ वर्षांत भारताच्या नकाशावरून गायब झाले सुंदरबनमधील भंगादुनी बेट, धक्कादायक कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 2:49 PM

1 / 11
पश्चिम बंगालमधील सुंदरबन हा भाग जैवविविधतेसाठी ओळखला जातो. या भागातील त्रिभूज प्रदेशात शेकडो लहानमोठी बेटे आहेत. दरम्यान गेल्या २५ वर्षांमधील यामधील एक महत्त्वाचे बेट भारताच्या नकाशावरून गायब झाल्याचे समोर आले आहे.
2 / 11
सुमारे २५ वर्षांपूर्वी सुंदरबनमध्ये एक बेट होते. त्यावर मोठे जंगल होते. खारफुटीची हजारो झाडे होती. मात्र आता हे बेट जवळपास गायब झाले आहे. १९९१ पासून २०१६ पर्यंत या बेटावरील जमीन बंगालच्या उपसागरामध्ये हळुहळू बुडत गेली. या बेटाचे नाव आहे भंगादुनी बेट.
3 / 11
भंगादुनी बेट सुंदरबनमधील दक्षिण टोकाला स्थित आहे. या बेटाचे सर्वात जुने छायाचित्र सर्वे ऑफ इंडिया कडून तयार करण्यात आले होते. तो नकाशा १:५०,००० स्केलवर तयार करण्यात आला होता.
4 / 11
त्यानंतर लँडसेट-२ सॅटेलाईट ५ डिसेंबर १९७५ रोजी येथून गेला, तेव्हा त्याने या बेटाचा फोटो घेतला होता. १९७५ च्या सर्वे ऑफ इंडियाच्या पिवळ्या रेषेच्या आत हे बेट हळुहळू आक्रसत चालले आहे. हळुहळू समुद्राच्या लाटा आणि सुंदरबनकडून येणाऱ्या लाटांमुळे या बेटावरील मातीची मोठ्या प्रमाणात झीज होत आहे.
5 / 11
त्यानंतर लडसेट-५ हा सॅटेलाईट १८ फेब्रुवारी १९९१ रोजी पुन्हा एकदा या बेटावरून गेला. त्याने पुन्हा एकदा भंगादुनी बेटाचा फोटो घेतला. तेव्हा हे बेट १९७५ मध्ये सेट केलेल्या सर्व्हे ऑफ इंडियाच्या सीमेपासून खूप आत गेले होते. म्हणजेच सातत्याने या बेटाचा जमिनीवरील भाग आक्रसत चालला आहे. समुद्राच्या लाटांमधील मीठ साचत गेल्याने खारफुटीची मुळे खराब होत आहेत.
6 / 11
७ डिसेंबर २०१६ रोजी लँडसेट-८ सुंदरबनच्यावरून गेला. तेव्हा या बेटाची परिस्थिती अजूनच खराब झाल्याचे दिसून आले. या बेटाचे क्षेत्रफळ १९७५ च्या सीमेपासून सुमारे अर्धे झाले आहे. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाचे अधिकारी अनुपम घोष यांनी सांगितले की, सुंदरबन परिसरामधील खारफुटी धोक्यात आहे. जर ती संपूर्णपणे संपुष्टात आली. तर सुंदरबनच्या मागच्या रहिवासी परिसराला त्सुनामी आणि उंच लाटांपासून वाचवता येणार नाही.
7 / 11
सन १९९१ ते २०१६ पर्यंत भंगादुनी बेटाचा २३ चौरस किमी भाग समुद्रामध्ये बुडाला आहे. येथील खारफुटीचे जंगल पूर्णपणे संपुष्टात आले आहे. अशाचप्रकारे खारफुटी नष्ट होत गेली तर त्यामुळे पश्चिम बंगाल, ओदिशा आणि इतर किनारी भागांना धोका निर्माण होऊ शकतो. कारण चांगले खारफुटीचे जंगल समुद्राच्या लाटांच्या तडाख्यापासून निवासी भागाला वाचवत असते.
8 / 11
केवळ भंगादूनी बेटच नाही तर देशाच्या इतर भागामध्येही असेच चित्र आहे. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या सन २०१९ च्या रिपोर्टनुसार देशामध्ये १२ भाग आहेत जिथे सर्वात जास्त खारफुटी दिसून येते. त्यामध्ये आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओदिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, अंदमान-निकोबार, दमण-दीव आणि पुडुच्चेरी यांचा समावेश आहे.
9 / 11
सन २०१७ च्या रिपोर्टच्या तुलनेत सन २०१९ च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, तामिळनाडूमध्ये खारफुटी ४ चौकिमी, पश्चिम बंगालमध्ये २ चौकिमी आणि अंदमान निकोबारमध्ये १ चौकिमीने कमी झाले आहे. मात्र दुसरीकडे गुजरातमध्ये ३७ चौकिमी, महाराष्ट्रामध्ये १६ चौकिमी आणि ओदिशामध्ये ८ चौकिमीने खारफुटीचे क्षेत्र वाढले आहे.
10 / 11
दरम्यान, सुंदरबनच्या खालच्या भागामध्ये एक अजून बेट आहे. ते १९९१ मध्ये खूप मोठे होते. मात्र त्याचे कुठलेही नाव नव्हते. त्याचे फोटो लँडसेट-५ सॅटेलाईटने १८ फेब्रुवारी १९९१ रोजी घेतली होती. या बेटाची अवस्थाही भंगादुनी बेटाप्रमाणे झाली आहे. या बेटाचा आकारसुद्धा वेगाने कमी होत आहे.
11 / 11
या बेटाच्या सीमा जर तुम्ही पाहिल्या तर एक अजून धक्कादायक गोष्ट समोर येते. ती म्हणजे या बेटाने आपली जागा बदलली आहे. ७ डिसेंबर २०१६ रोजी लँडसेट-८ ने पुन्हा या बेटाचा फोटो घेतला तेव्हा ज्या बेटाचे क्षेत्र घटले आहेत, तसेच त्याने आपले स्थानही बदलले आहे. म्हणजेच या बेटाचा खालचा भाग वेगाने तुटत असून तो लाटांबरोबर दुसऱ्या बाजूला जात आहे.
टॅग्स :Indiaभारतwest bengalपश्चिम बंगालEarthपृथ्वी