शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Australia Open 2024: ४३ वय नसून 'लेव्हल'! भारताचा रोहन 'चॅम्पियन', कोट्यवधींची कमाई; विजयानंतर भावूक

By ओमकार संकपाळ | Published: January 27, 2024 9:30 PM

1 / 14
भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेन यांनी शनिवारी ऐतिहासिक कामगिरी केली. त्यांनी इटालियन जोडी सिमोन बोलेल्ली आणि आंद्रीया व्हॅवासोरी यांचा पराभव करून ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत विजय मिळवला. लक्षणीय बाब म्हणजे वयाच्या ४३ व्या वर्षी ग्रँड स्लॅम जिंकणारा रोहन हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.
2 / 14
ऐतिहासिक विजयानंतर रोहनवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. शनिवारी त्याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या पुरूष दुहेरीच्या फायनल सामन्यात विजय मिळवून ग्रँड स्लॅम जिंकले. रोहन बोपन्ना आणि ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एबडेन या जोडीने तमाम भारतीयांना आनंद साजरा करण्याची संधी दिली.
3 / 14
अंतिम सामन्यात रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेन यांनी सिमोन बोलेल्ली व आंद्रीया व्हॅवासोरी या इटालियन जोडीचा ७-६, ७-५ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
4 / 14
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या शिलेदारांना विजयासाठी फार संघर्ष करावा लागला नाही. अनुभवाच्या जोरावर सुरूवातीपासूनच बोपन्ना आणि एबडेन यांच्या जोडीचे वर्चस्व पाहायला मिळाले. तरीदेखील पहिला सेट ६-६ असा बरोबरीत आला आणि टायब्रेकरमध्ये बोपन्नाने सहकारी एडबेनसह प्रतिस्पर्धींना ७-० असे भिरकावून दिले. बोपन्ना- एबडेन या जोडीने पहिला सेट ७-६ ( ७-०) असा जिंकला.
5 / 14
दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही जोडींकडून दमदार खेळ पाहायला मिळाला. आपापल्या सर्व्हिसमध्ये गेम घेत हा सेट ५-५ असा बरोबरीत आला होता. ११व्या गेममध्ये बोपन्ना आणि एबडेन या जोडीने इटलीच्या खेळाडूंची सर्व्हिस ब्रेक केली आणि ६-५ अशी निर्णायक आघाडी घेतली.
6 / 14
आता त्यांना त्यांच्या सर्व्हिसमध्ये बाजी मारून हे जेतेपद नावावर करायचे होते. बोपन्नाने सर्व अनुभव पणाला लावताना हा गेम जिंकला आणि दुसरा सेट ७-५ असा नावावर करून ग्रँड स्लॅम जेतेपदाचा दुष्काळ वयाच्या ४३ व्या वर्षी संपवला. विजयी फटका अन् बोपन्नाने एकच जल्लोष साजरा केला.
7 / 14
विजयानंतर बोलताना रोहन भावूक झाल्याचे दिसले. त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूंचे आभार मानले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्याने त्याच्या कुटुंबीयांचेही आभार मानले.
8 / 14
रोहन म्हणाला की, माझे वय किती आहे याची सर्वांना कल्पना आहे. पण मी त्यात थोडा बदल केला आहे. मला सांगायला आवडेल की, माझे वय ४३ नसून माझी लेव्हल ४३ वी आहे. टेनिस खेळ हा एक मोठा शिक्षक आहे, ज्याने मला खूप काही शिकवले.
9 / 14
तसेच माझ्या कुटुंबीयांचा पाठिंबा मला इथपर्यंत पोहचवण्यात मदतशीर ठरला. त्यामुळे मी त्यांचे आवर्जुन आभार मानू इच्छितो. माझा सहकारी बेडबेन याचा या यशात मोठा हात आहे. सिमोन बोलेल्ली आणि आंद्रीया व्हॅवासोरी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा... ऑस्ट्रेलियन टेनिस व्यवस्थापनाने एवढी चांगली स्पर्धा आयोजित केल्याबद्दल त्यांचेही धन्यवाद, असेही त्याने सांगितले.
10 / 14
रोहन बोपन्नाने ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी भारताच्या शिलेदाराचे कौतुक केले. विजेतेपद पटकावल्यानंतर चॅम्पियन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडेन यांना म्हणून मोठी रक्कम मिळाली.
11 / 14
ऑस्ट्रेलियन ओपन दुहेरीचे विजेतेपद जिंकल्यानंतर बोपन्ना-एबडेन जोडीला भारतीय चलनानुसार सुमारे ३ कोटी ९८ लाख ९६ हजार रूपये मिळाले. ही रक्कम दोन्ही खेळाडूंमध्ये समान प्रमाणात विभागली जाईल.
12 / 14
एकूणच रोहन बोपन्नाचा हिस्सा सुमारे १ कोटी ९९ लाख ४८ हजार रूपये असेल, पण प्रत्यक्षात भारतीय शिलेदाराच्या हाती वेगळीच रक्कम लागेल.
13 / 14
ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकल्यावरही कर भरावा लागतो. ऑस्ट्रेलियन कायद्यानुसार १,८०,००० डॉलरपेक्षा जास्त पैसे असल्यास ४५% दराने कर भरावा लागतो. म्हणजेच बोपन्नाच्या बक्षीस रकमेतून ८९ लाख ७६ हजार रुपये कर कापला जाईल.
14 / 14
कर भरल्यानंतर बोपन्नाला सुमारे १ कोटी ९ लाख आणि ७१ हजार रूपये मिळतील. विशेष बाब म्हणजे दोन्ही देशांच्या खेळाडूंना दुहेरी कर प्रणालीपासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे बोपन्नाला भारतात या रकमेवर कर भरावा लागणार नाही. म्हणजेच बोपन्नाला १ कोटी १० लाख १० हजार रूपये मिळतील.
टॅग्स :Australian Openऑस्ट्रेलियन ओपनIndiaभारतInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीTennisटेनिस