#Best Of 2018: Mary Kom, pv sindhu classic year
#Best Of 2018 : मेरी कोम - पी. व्ही, सिंधूच्या आनंदाश्रुत रमले भारतीय... By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 11:41 AM1 / 72018 वर्ष मावळतीकडे झुकलं आहे. 2019चे स्वागत करण्यासाठी सज्ज होत असताना सरत्या वर्षातील काही अविस्मरणीय आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहत आहेत. 2018 हे वर्ष भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी उल्लेखनीय ठरले आहे. खासकरून महिला खेळाडूंनी हे वर्ष गाजवले. हिमा दासचे ऐतिहासिक सुवर्ण, पी. व्ही. सिंधूची विक्रमी भरारी, मनिका बत्रा, एमसी मेरी कोम, विनेश फोगट यांची सुवर्णकागिरी हे सरत्या वर्षाचा आढावा घेताना चटकन डोळ्यासमोर उभे राहत आहे. विक्रमी सहावे जागतिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर मेरी कोमच्या डोळ्यातून वाहणाऱ्या आनंदाश्रुंमध्ये तमाम भारतीय रमले होते. तिचे हे पदक अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले. त्यात वर्षाच्या अखेरच्या स्पर्धेत सिंधूने जेतेपद पटकावून ऐतिहासिक भरारी घेतली. 2 / 7शेतकऱ्याची पोर धावपटू हिमा दासने 20 वर्षांखालील जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली. आशियाई स्पर्धेतही हिमाने आपले नाणे खणखणीत वाजवले. तिने 400 मीटर स्पर्धेत रौप्यपदक जिंकले, तर 4 बाय 400 मीटर मिश्र रिलेतही तिने रौप्यक्रांती घडवली. महिलांच्या 4 बाय 400 मीटर स्पर्धेत मात्र तिने सुवर्णपदक नावावर केले.3 / 7मनिका बत्राने राष्ट्रकुल स्पर्धेत चार पदकांची कमाई करून सर्वांचे लक्ष वेधले. राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनतर्फे देण्यात येणारा 'Breakthrough Table Tennis Star' हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.4 / 7कुस्तीपटू विनेश फोगटने आशियाई स्पर्धेत भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. तिने 50 किलो फ्रिस्टाईल प्रकारात सुवर्णपदक जिंकले आणि अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. विनेशने 2014च्या आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.5 / 7रिक्षाचालकाची मुलगी असलेल्या स्वप्ना बर्मनने हेप्टॅथलॉन प्रकारात सुवर्ण जिंकण्याचा मान पटकावला. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय महिला आहे. तिने 6026 गुणांसह हे पदक जिंकले.6 / 7भारताची दिग्गज बॉक्सर एमसी मेरी कोमसाठी हे वर्ष विशेष राहिले. तिने जागतिक स्पर्धेत सहावे सुवर्णपदक जिंकले. यासह तिने युक्रेनच्या हॅना ओखोटाच्या सहा सुवर्णपदकाच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याशिवाय तिने राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले.7 / 7सात स्पर्धेतील सुवर्णपदकाने दिलेल्या हुलकावणीची वसूली पी.व्ही. सिंधूने वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेच्या जेतेपदाने केली. वर्ल्ड टूर स्पर्धा जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली. आणखी वाचा Subscribe to Notifications