ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 3 - भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान महेंद्रसिंग धोनी मैदानावर खेळताना चाहते आतुरतेने वाट पाहत असतात ती त्याच्या हेलिकॉप्टर शॉटची. ज्याप्रकारे धोनी हा शॉट खेळतो त्याप्रमाणे इतर कोणाला जमणे अशक्यच आहे. मात्र सध्या चर्चेत असलेल्या धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटामुळे या हेलिकॉप्टर शॉटचं रहस्य उलगडलं आहे. हा शॉट धोनीचा स्वत:चा नसून त्याचा बालपणीचा जिवलग मित्र संतोष लालने त्याला शिकवला आहे. चित्रपटातूनही त्यांच्या मैत्रीची कहाणी सांगण्यात आली आहे. (धोनी चित्रपटाची पहिल्याच दिवशी 21.30 कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई) संतोष लाल आणि महेंद्रसिंग धोनी एकत्र क्रिकेट खेळायचे. क्रिकेट खेळण्याचं दोघांचं वेड सारखंच होतं त्यामुळे त्यांना वेळेचं भानही राहायचं नाही. राज्याबाहेरील क्रिकेट सामने खेळण्यासाठी दोघेही एकत्र प्रवास करायचे. धोनीला संतोषचं बँटिंग कौशल्य प्रचंड आवडायचं.'संतोष आणि धोनी लहानपणापासून चांगले मित्र होते. दोघेही रेल्वेच्या नोकरीत एकत्र लागले होते. संतोष फलंदाज म्हणून अत्यंत आक्रमक होता,' असं धोनी आणि संतोषचा मित्र निशांत सांगतो. पुढे जाऊन धोनी यशस्वी झाला आणि भारतीय संघाच्या कप्तान बनला. मात्र त्यानंतरही त्याने आपल्या मैत्रीत अंतर येऊ दिलं नाही. संतोष त्यावेळी झारखंड संघातून क्रिकेट होता. मात्र स्वादुपिंडाच तीव्र दाह झाल्याने जुलै 2013 मध्ये संतोषचं निधन झालं. त्यावेळीदेखील धोनीने संतोषच्या उपचारासाठी रांचीहून दिल्लीला जाण्याची व्यवस्था केली होती. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती.आज धोनीच्या यशात संतोष लालचाही तितकाच वाटा आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. संतोषची मैत्री आणि पाठिंब्यामुळे धोनीला यश मिळणं सोप्प झालं