शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नवव्या वर्षी वडिलांच छत्र हरपलं! कुस्ती, वाद, प्रसिद्धी अन् आमदार; वाचा विनेश फोगाटचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 12:40 PM

1 / 10
वादामुळे नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहिलेली माजी कुस्तीपटू विनेश फोगाट पहिल्याच राजकीय 'कुस्ती'त बाजी मारण्यात यशस्वी ठरली. सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करुन विनेशने आमदार होण्याचा मान पटकावला. भारतीय कुस्तीतील हे एक मोठे नाव आता हरयाणा सरकारविरोधात आवाज उठवताना दिसेल.
2 / 10
हरयाणा विधानसभेच्या निवडणुकीत विनेश काँग्रेसच्या तिकिटावर जुलाना या मतदारसंघातून ६,०१५ मतांनी निवडून आली. ३० वर्षीय विनेशसाठी ही निवडणूक म्हणजे 'करा किंवा मरा' अशीच होती. तिच्या विरोधात भाजपने योगेश कुमार यांना मैदानात उतरवले होते.
3 / 10
जुलाना मतदारसंघातील जनतेने अनेक वर्षांपासून काँग्रेसविरोधी उमेदवाराला विजयी केले. २००५ पासून काँग्रेसला या जागेवर विजय मिळवता आला नाही. मात्र, विनेश फोगाटने आखाड्याबाहेरील कुस्तीत बाजी मारली आणि भाजपला मोठा झटका दिला.
4 / 10
कुस्तीतील डावपेच आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंग्याची शान वाढवणाऱ्या विनेशचा इथपर्यंतचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. बालपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर तिने संघर्षाचे पुस्तक उराशी बाळगून असामान्य कामगिरी केली. तिचा हा संघर्ष बॉलिवूड चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर आला.
5 / 10
हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विनेश फोगाट आणि तिचा सहकारी बजरंग पुनिया यांनी काँग्रेसचा 'हात' धरला. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि तत्कालीन भाजप खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांच्यावर विनेशसह तिच्या सहकारी पैलवानांनी गंभीर आरोप केले.
6 / 10
त्यानंतर मोठ्या कालावधीपर्यंत आंदोलन पुकारुन कुस्तीपटूंनी देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे लक्ष वेधले. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींसह इतरही नेत्यांनी पैलवानांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. काँग्रेसमध्ये प्रवेश करताच विनेशने याच घटनांचा दाखला देत सत्ताधारी भाजपवर तोंडसुख घेतले.
7 / 10
मागील दहा वर्षांपासून हरयाणात सत्तेत असलेल्या भाजपला सत्तेतून बेदखल करण्यास काँग्रेसला यावेळी यश येईल अशी चर्चा होती. मात्र, भाजपने विजयाची हॅटट्रिक मारत काँग्रेसच्या तोंडचा घास पळवला.
8 / 10
एकूण ९० जागांपैकी ४८ जागांवर भाजप तर ३६ जागांवर काँग्रेसचा विजय झाला. बहुमताचा आकडा गाठून भाजपने तिसऱ्यांदा हरयाणात विजय संपादन केला.
9 / 10
काँग्रेसचा पराभव झाला असला तरी विनेश फोगाटचा विजय नाना कारणांनी महत्त्वाचा आहे. कारण राजकारणात येण्यापूर्वी तिने कुस्तीतून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले होते. त्यात तिने भाजपविरोधी सातत्याने घेतलेली भूमिका... वयाच्या नवव्या वर्षी वडिलांना गमावल्यानंतर विनेशने कुस्तीला आपलेसे केले. पण, काही कालावधीपूर्वी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये घडलेल्या घटनांनी विनेश व्यथित झाली अन् तिला ओळख देणाऱ्या कुस्तीला रामराम केले.
10 / 10
ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठणाऱ्या विनेशचे १०० ग्रॅम वजन वाढल्याने तिला पदकासाठीच्या लढाईत उतरताच आले नाही. मग मायदेशात परतताच विनेश फोगाटच्या स्वागतासाठी हरयाणातील दिग्गज काँग्रेस नेत्यांनी हजेरी लावली. तेव्हापासून ती राजकीय खेळी करण्यासाठी सज्ज असल्याचे बोलले जात होते. मात्र, कालांतराने विनेश काँग्रेसचा झेंडा हाती घेत राजकारणात एन्ट्री केली.
टॅग्स :Vinesh Phogatविनेश फोगटWrestlingकुस्तीMLAआमदारcongressकाँग्रेसharyana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४