ऑनलाइन लोकमतअहमदाबाद, दि. 22 - भारताने सलग तिस-यांदा कबड्डी विश्वचषक जिंकत विजयगाथा कायम ठेवली आहे. भारताने 38-29 फरकाने इराणचा पराभव केला . कबड्डी विश्वचषक जिंकण्याचा हॅट्र्टिक साधत भारताने आपणच कबड्डीचे बादशाह असल्याचं दाखवून दिलं आहे. पहिल्या हाफमध्ये 18-13 गुणांसहित आघाडीवर असलेल्या इराणला त्यानंतर आघाडी कायम ठेवता आली नाही. भारताकडून अजय ठाकूरने विजयात महत्वाचा वाटा उचलला. अजय ठाकूरने 16 रेड्समध्ये 12 गुण मिळवले. सुरुवातीला अटीतटीचा वाटणारा सामना भारताने शेवटच्या टप्प्यात मात्र सहज जिंकला. भारत पुन्हा एकदा विजेता ठरला असून इराण उपविजेता झाला आहे. भारताने शुक्रवारी धडाकेबाज विजयाच्या बळावर स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली होती. यजमान भारतीय संघाने दुसऱ्या उपांत्य सामन्यात थायलंडवर ७३-२० ने मात केली होती. दुसरीकडे इराण संघाने सेमीफायनलमध्ये दक्षिण कोरियाचा २८-२२ ने पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. महाराष्ट्रात पहिल्या दोन विश्वचषक कबड्डी स्पर्धा झाल्यानंतर तब्बल नऊ वर्षांनंतर अहमदाबादमध्ये भारतीय संघाने इराणसोबत पंगा घेतला. महाराष्ट्राच्या यजमानपदाखाली २००४ आणि २००७ मध्ये पुरुषांच्या पहिल्या दोन विश्वचषक कबड्डी स्पर्धा रंगल्या होत्या. यामध्ये दोन्ही वेळा इराण आणि भारत हे दोन संघच समोरासमोर दिसले होते. भारताने इराणवर निर्विवाद वर्चस्व मिळवत दोन्हीवेळा विश्वचषकावर कब्जा मिळविला. भारताने ही विजयी गाथा पुन्हा एकदा कायम राखली आहे. भारताने पहिल्या विश्वचषकामध्ये इराणला ५५-२७ अशा मोठ्या फरकाने पराभूत करत पहिल्या विश्वकपावर शिक्कामोर्तब केला होता. त्यानंतर तब्बल तीन वर्षाच्या खंडानंतर मुंबईमध्ये दुसऱ्या विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले. यावेळीही इतर संघाच्या तुलनेत पहिल्या विश्वचषकामध्ये दावेदारी सिद्ध केलेल्या भारत आणि इराक दुसऱ्यांदा समोरा समोर आले. यावेळीही भारताने विजय मिळवत इराणला पराभूत केले. पनवेलच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या विश्वकपच्या अंतिम सामन्यात भारताने इराणला २९ – १९ अशा फरकाने पराभूत केले होते.