शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Year Ender 2022: फेडररची निवृत्ती, नीरज चोप्रा, मेस्सीचा विक्रम; या खेळाडूंनी 2022 हे वर्ष केलं अविस्मरणीय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 5:25 PM

1 / 10
2022 हे वर्ष क्रीडा विश्वासाठी अविस्मरणीय ठरले आहे. या वर्षात क्रीडा विश्वातील काही दिग्गजांनी जगाला आपली प्रतिभा दाखवून दिली. तर काहींनी आपल्या निवृत्तीच्या घोषणेने चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू आणले. यातीलच एक नाव म्हणजे टेनिसचा सम्राट रॉजर फेडरर. टेनिस विश्वात वर्चस्व गाजवणाऱ्या फेडररने 2022च्या वर्षात निवृत्तीची घोषणा केली.
2 / 10
खरं तर 2022 या वर्षाच्या आठवणींबद्दल भाष्य करायचे झाले तर, क्रीडा विश्वातील अनेक चेहरे समोर येतात. भारतीय महिलांनी देखील आपल्या क्रीडा कौशल्याची जगाला ताकद दाखवून दिली. राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात रौप्य पदक पटकावले.
3 / 10
भारतीय पुरूष क्रिकेट संघाने ऑक्टोबरमध्ये पार पडलेल्या ट्वेंटी-20 विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात विराट कोहलीच्या अविस्मरणीय खेळीच्या जोरावर भारताने विजयी सलामी दिली.
4 / 10
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करून भारतासमोर 160 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अवघ्या 31 धावांवर भारताचे 4 गडी तंबूत परतले होते. मात्र किंग कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी शानदार भागीदारी नोंदवून विजय खेचून आणला. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर कोहलीने 53 चेंडूत 82 धावांची नाबाद खेळी केली होती.
5 / 10
खरं तर भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करून आपल्या अभियानाची सुरूवात केली. भारतीय संघाचा हा विजय 2022 मधील अविस्मरणीय क्षण ठरला आहे. भारताने 4 गडी राखून सामना जिंकला होता. या सामन्यातील हिरो विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
6 / 10
भारतीय महिला संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत उल्लेखणीय कामगिरी केली. मात्र बलाढ्य ऑस्ट्रेलियाने भारतीय महिलांचे सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न हिरावून घेतले आणि भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भारतीय संघाला या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात देखील बलाढ्य कांगारूच्या संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
7 / 10
ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राने डायमंड लीगमध्ये देखील पदक जिंकले. लक्षणीय बाब म्हणजे डायमंड लीगमध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. तर 2022 मध्ये त्याने डायमंड लीगमध्ये पदक जिंकून इतिहास रचला.
8 / 10
टेनिसचा सम्राट म्हणून प्रसिद्ध असलेल्या रॉजर फेडररने वयाच्या 41व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली. फेडररची निवृत्ती हा टेनिस चाहत्यांना एक धक्का मानला जातो. 20 वेळा ग्रँड स्लॅम विजेत्याने 15 सप्टेंबर रोजी त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून या निर्णयाची माहिती दिली होती.
9 / 10
अलीकडेच पार पडलेल्या फिफा विश्वचषक 2022 मध्ये लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाच्या संघाने फ्रान्सचा पराभव करून जेतेपद पटकावले. फुटबॉलचा दिग्गज लिओनेल मेस्सीचे या विजयासह विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
10 / 10
अर्जेंटिनाने शूट आऊटमध्ये फ्रान्सचा 4-2 ने पराभव केला आणि तिसऱ्यांदा या विश्वचषकाचा किताब पटकावला. 18 डिसेंबर 2022 हा दिवस या वर्षातील अविस्मरणीय दिवस ठरला आहे. कारण याच दिवशी कोट्यवधी चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली आणि लिओनेल मेस्सीने विश्वचषक उंचावला.
टॅग्स :flashback 2022फ्लॅशबॅक 2022Virat Kohliविराट कोहलीRoger fedrerरॉजर फेडररLionel Messiलिओनेल मेस्सीNeeraj Chopraनीरज चोप्रा