शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Raj Thackeray: भाजपासोबत जाणं हा मनसेसाठी 'राज'मार्ग ठरेल?, 'इंजिन'ही धावेल की 'कमळ'च फुलेल?

By अमेय गोगटे | Published: July 21, 2021 9:49 AM

1 / 11
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आधी नाशकात आणि आता पुण्यात ते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. पण, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबतची त्यांची 'भेट' नवी 'गाठ' बांधणारी ठरणार का, याबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
2 / 11
तसं पाहिलं तर, महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर काही महिन्यांतच, बंद दाराआड झालेल्या काही भेटींमुळे भाजपा-मनसे मैत्रीची कुजबूज ऐकू येत होती. पण, आता राज ठाकरे आणि चंद्रकांतदादांमधील रस्त्यावर झालेला सुसंवाद कुठल्या दिशेने जाणार, आत्तापर्यंतच्या बहुतांश निवडणुकांमध्ये 'एकला चालो रे' म्हणणारे राज ठाकरे भाजपाचा हात धरणार का, 'लाव रे तो व्हिडीओ'मध्ये दाखवलेल्या व्हिडीओंचं भाजपा काय करणार, यावरून तर्कवितर्क सुरू झालेत.
3 / 11
'कोरी पाटी' दाखवून राज ठाकरेंनी सत्ता मागून पाहिली, विरोधी पक्षात बसवण्यासाठीही साद घालून पाहिली, पण त्यांच्या पदरी फारसं यश आलं नाही. २००९ मध्ये निवडून आलेले १३ आमदार आणि नाशिक महापालिकेतील सत्ता, या व्यतिरिक्त ठळकपणे दाखवता येईल, अशी कामगिरी मनसेला १५ वर्षांत करता आलेली नाही. सध्याच्या विधानसभेत त्यांचा एक आमदार आहे आणि काही महापालिकांमध्ये मोजके नगरसेवक आहेत. तरीही, राज ठाकरे यांचा करिष्मा आणि 'खळ्ळ-खटॅक' स्टाईलमुळे मनसेनं आपला 'आवाssज' टिकवून ठेवलाय.
4 / 11
सत्ता नसतानाही संघटना टिकवणं आजच्या काळात निश्चितच सोपं नाही. ते मनसेनं आतापर्यंत केलंय, पण आता पक्षाचं 'नवनिर्माण' खूप गरजेचं आहे. महाविकास आघाडीमुळे राजकीय समीकरणं बदलली आहेत. स्वबळावर निवडणूक लढवणं अजिबातच सोपं राहिलेलं नाही. त्यामुळेच राज ठाकरे यावेळी वेगळा विचार करू शकतात, असं जाणकारांना वाटतं.
5 / 11
इतकंच नव्हे तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील एका मोठ्या गटालाही, भाजपामध्ये जाण्याचा पर्याय योग्य वाटतोय. काँग्रेसला एकटं लढायचं असेल, तर त्यांनी तसं सांगावं; आम्ही एकत्रच निवडणुका लढवू, असा पवित्रा शिवसेना-राष्ट्रवादीनं घेतला आहे. काँग्रेस खरंच स्वबळावर रिंगणात उतरली, तर चौरंगी किंवा पंचरंगी निवडणुका होतील आणि त्यात होणारं मतविभाजन निश्चितच मनसेच्या फायद्याचं नसेल, असं गणित ते मांडतात.
6 / 11
त्याच्याऐवजी, स्वतःहून हात पुढे करणाऱ्या भाजपाला 'टाळी' दिल्यास मनसेच्या जागा नक्कीच वाढतील, अशी खात्री काही मनसैनिकांना वाटते. भाजपा सत्तेत नसली, तरी विधानसभेतला सगळ्यात मोठा पक्ष तोच आहे आणि महापालिकांमध्येही त्यांचं संख्याबळ मोठं आहे. केंद्रातील सत्तेचं बळही त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे मनसेच्या 'इंजिना'वर 'कमळ' लावल्यास ते अधिक वेगाने धावू शकेल, याबद्दल बहुतेकांचं एकमत आहे.
7 / 11
त्याचवेळी, काही जणांच्या मनात शंकेची पालही चुकचुकतेय. त्याचं कारण आहे, 'लाव रे तो व्हिडीओ' कॅम्पेन. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केलं होतं. त्यामुळे कट्टर भाजपा समर्थक किंवा मोदी समर्थक राज यांच्यावर नाराज आहेत. ते मनसेच्या पारड्यात मत टाकतील ना, याबद्दल थोडा संभ्रम आहे. त्याचा मनसेला फटका बसू शकतो.
8 / 11
दुसरा मुद्दा आहे तो, मनसेच्या परप्रांतियांबद्दलच्या भूमिकेचा. खास करून मुंबई महापालिकेत हा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो. कारण, कृपाशंकर सिंह यांना भाजपामध्ये घेण्यामागचा भाजपाचा हेतू स्पष्ट आहे. तिथे तडजोड कशी आणि का करायची, असा प्रश्न काहींना पडलाय.
9 / 11
शिवसेनेनं साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्यानं महाराष्ट्रात भाजपा एकटी पडलीय. राज्यात स्वबळावर सत्ता आणणं महाकठीण आहे. अशावेळी त्यांनाही एक साथीदार हवा आहे. राज ठाकरेंनी झेंड्याचा रंग बदलून दिलेला हिंदुत्वाचा नारा त्यांच्या पथ्यावर पडणाराच आहे.
10 / 11
राहता राहिला प्रश्न, 'लाव रे तो व्हिडीओ'मध्ये दाखवलेल्या व्हिडीओंचा. पण, राज ठाकरेंच्या गुजरात दौऱ्याचे, नरेंद्र मोदींच्या 'विकासाच्या मॉडेल'चं कौतुक केल्याचे व्हिडीओही आहेतच. त्यामुळे विरोधकांनी 'ते' व्हिडीओ लावले, तर आपण 'हे' व्हिडीओ लावायचे, की झाली फिट्टमफाट्. आयटी सेल जिंदाबाद!
11 / 11
खरं तर, ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी बऱ्याच जणांनी प्रयत्न केले. 'ठाकरे ब्रँड'चीही चर्चा अलीकडेच झाली. पण, तो योग जुळून येणं जरा कठीणच दिसतंय. त्यामुळे भाजपाला 'ठाकरे के बदले ठाकरे' मिळू शकतात. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपाने सत्तेसाठी मार्ग बदलल्याची बरीच उदाहरणं आहेत. त्यांच्यासाठी हा 'राज'मार्ग तितकासा अवघड नाही, पण मनसेचं 'इंजिन' हा ट्रॅक निवडतं का आणि ते कुठवर जातं, हे लवकरच कळेल. सध्या तरी बऱ्याच महाराष्ट्र सैनिकांना '(भाजपासोबत) जाऊ या ना राजसाहेब' असंच 'मनसे' वाटतंय.
टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे