एका पदावरून तीन पक्षांत रंगणार रस्सीखेच; 'पॉवर'फुल विधानामुळे महाविकास आघाडीत नवा पेच? By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 8:11 PM
1 / 10 काँग्रेस नेते नाना पटोले (nana patole) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राज्याच्या विधानसभा उपाध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांना दिली. 2 / 10 नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांचं नाव निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पटोलेंनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. 3 / 10 नाना पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष गेल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्ष पदावर कोणाची निवड होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 4 / 10 काँग्रेसमधील काही नेते अध्यक्ष पदासाठी उत्सुक असल्याचं समजतं. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका विधानामुळे महाविकास आघाडीत विधानसभा अध्यक्ष पदावरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. 5 / 10 नाना पटोले यांचा राजीनामा हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. त्यांनी पक्षात वेगळी जबाबदारी स्वीकारण्यासाठी राजीनामा दिला. आता त्यांची जागा मोकळी झाली आहे. त्यामुळे आता अध्यक्षपदाबद्दल सगळे पक्ष चर्चा करू शकतात, असं शरद पवार म्हणाले. 6 / 10 काँग्रेसनं विधानसभेचे अध्यक्ष बदलताना आमच्यासोबत चर्चा केली. आता अध्यक्ष निवडताना पुन्हा चर्चा होईल. आता अध्यक्षपद खुलं झालं आहे, असं सूचक विधान पवार यांनी केलं. 7 / 10 राज्यात सत्ता स्थापनेवेळी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळालं. तर राष्ट्रवादीनं अर्थ, गृह, जलसंपदा यांच्यासारखी महत्त्वाची खाती मिळवली. मात्र काँग्रेसला फारशी महत्त्वाची खाती मिळाली नाहीत. त्यातच आता विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडून जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. 8 / 10 शिवसेना विधानसभा अध्यक्षपदासाठी उत्सुक असल्याचं समजतं. काँग्रेसकडून अध्यक्षपद घेऊन त्याबदल्यात त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 9 / 10 नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याचं समजतं. 10 / 10 महाविकास आघाडीचं सरकार स्थिर असताना पटोलेंनी राजीनामा देण्याची गरज नव्हती, असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना वाटत होतं, असं वृत्त एबीपी माझानं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. आणखी वाचा