Balasaheb Thackeray Jayanti: When Balasaheb Thackeray Decision to leave Shiv Sena
Balasaheb Thackeray: “शिवसैनिकांनो, आम्ही निरोप घेत आहोत”; बाळासाहेब ठाकरे जेव्हा शिवसेनेला जय महाराष्ट्र करतात तेव्हा… By प्रविण मरगळे | Published: January 22, 2021 8:36 PM1 / 11शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त लाखो शिवसैनिक त्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर येत असतात. यंदा कोरोनाच्या निमित्ताने ही गर्दी कमी असली तरी जयंतीनिमित्त अनेकजण बाळासाहेबांच्या आठवणीला उजाळा देतात. आज आम्ही तुम्हाला बाळासाहेबांच्या आयुष्यातील एक असा प्रसंग सांगणार आहोत, जेव्हा दस्तरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. 2 / 11एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असणारे पक्षाचे पदाधिकारी माधव देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनाप्रमुखांवर घराणेशाहीचे आरोप लावले होते, ही घटना १९९२ रोजीची आहे. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची वैयक्तिक जहागिरी बनली आहे, ते मुलाच्या व पुतण्याच्या तालावर नाचत असून शिवसैनिकांनी निष्ठेने उभी केलेली संघटना मोडून काढत आहेत. शिवसेनेने यापुढे पक्षांतर्गत लोकशाही आणि सामूहिक नेतृत्वाची कास धरायला हवी असं देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत मांडले. 3 / 11माधव देशपांडे यांनी केलेले आरोप बाळासाहेब ठाकरेंवर वैयक्तिक होते, शिवसेना नेते आणि शिवसैनिकांना भडकावून शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वालाच आव्हान देणारी ही भाषा होती, शिवसेनेच्या कोणत्याच सैनिकाने देशपांडे यांच्या निषेधासाठी आंदोलनही केले नाही. पक्षातील हे मौन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जिव्हारी लागलं, आणि १८ जुलै १९९२ रोजी थेट सामना दैनिकात शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांचा आपल्या कुटुंबीयांसह अखेरचा जय महाराष्ट्र असा निरोप देणारा संदेश झळकला. 4 / 11शिवसैनिकांना मातोश्रीचे दरवाजे बंद करून घेतले, शिवसेनाप्रमुखांचा हा संदेश वाचून संपूर्ण राज्यभरात खळबळ माजली, ग्रामीण महाराष्ट्रातून राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मातोश्री बाहेर जमले, बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत नसतील याच कल्पनेने अनेकांच्या डोळ्यात पाणी आले, मात्र राजीनाम्यावर बाळासाहेब ठाकरे ठाम आहेत असा निरोप मातोश्रीमधून शिवसैनिकांना देण्यात येत होता. 5 / 11या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी १९ जुलै १९९२ रोजी बाळासाहेब ठाकरेंनी सामना अग्रलेखातून शिवसैनिकांसाठी मनोगत मांडले, शिवसेनेला २६ वर्ष पूर्ण होऊन २७ वं वर्ष लागलं, या काळात आम्ही काय सोसलं आणि काय भोगलं याची कल्पना नसणाऱ्या काही कुत्तरड्यांचा सुळसुळाट होऊ लागला आहे. नसलेल्या घराणेशाहीवर आरोप करत भुंकत असतात. याकडे आम्ही दुर्लक्ष करत होतो, परंतु सहनशीलतेला काही मर्यादा असतात. 6 / 11आम्ही आमच्या नातेवाईकांची कुठेही वर्णी लावली नाही. ज्याच्या रक्तात कर्तृत्व असतं त्यांना कसल्याची आधाराची गरज नाही, उद्या राज आणि उद्धव स्वत:च्या कर्तृत्वावर उभे राहिले तर त्याला मीही रोखू शकत नाही. परंतु शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, शिवसैनिकांवर आम्ही पुत्रवत प्रेम केले, कुठे आणि कधी घराणेशाही आणली? शिवसेनेचे आम्ही मालक नसून संरक्षक आहोत, जेव्हा आमच्यावर घराणेशाहीचा आरोप होतो, तेव्हा ह्दयाला असंख्य बाण टोचतात. 7 / 11आम्हा ठाकरे कुटुंबीयांना कसलाच सोस नाही, परंतु आमच्या प्रामाणिकपणाला आणि इमानाला हीच किंमत येणार असेल तर केवळ माझे पुत्र आणि पुतण्याच कशाला? माझ्यासकट संपूर्ण ठाकरे कुटुंबच शिवसेनेतून बाहेर पडत आहोत, राज ठाकरे हेदेखील भारतीय विद्यार्थी सेनेचा राजीनामा देत आहेत. शिवसेना ही आमची किंवा कुटुंबीयांना खासगी मालमत्ता नाही. 8 / 11तमाम शिवसैनिकांवर आम्ही आईसारखी माया केली, मुलं आज रूसली आहेत, आम्ही कधी कुणावरही रागावलो नाही, २७ वर्षाचा कालखंड लगेच विसरता येणार नाही, कधी कुणावर संतापलो, रागावलो तर भावना समजून घ्या, निरोप घेताना मनाची जी अवस्था आहे ते व्यक्त करायला शब्दभांडार तोकडे पडेल. 9 / 11मराठी माणसाला चांगले दिवस येवो, जे झाले ते झाले, आम्ही निरोप घेत आहोत, २५ वर्षापूर्वी आम्ही जे विचार तुम्हाला दिले ते तुमच्या बुद्धीवर घासूनपुसून घ्या, तुम्हाला पटले तरच ते स्वीकारा, यापुढे आम्हाला, आमच्या पुत्र-पुतण्याला कोणीही शिवसेनेच्या संदर्भात भेटण्याचा प्रयत्न करू नये, आम्हीच आमचा मार्ग मोकळा केला आहे, सर्वांना आमचा जय महाराष्ट्र ( संदर्भ – शिवसेनेच्या ५० वर्षाची घोडदौड) 10 / 11शिवसेनाप्रमुखांच्या या संदेशानंतर राज्यभरातील शिवसैनिक भावनाविवश झाले होते, २० जुलै १९९२ रोजी शिवसेना भवनाजवळ बाळासाहेब ठाकरेंनी खुल्या व्यासपीठावरून शिवसैनिकांसोबत संवाद भेट घेतली, त्यावेळी सामान्य शिवसैनिक पक्षाच्या नेत्यांवर रागावले होते, नेत्यांना व्यासपीठावर न येऊन देण्याची आक्रमक भूमिका शिवसैनिकांनी घेतली. 11 / 11तेव्हा माझ्या एवढाच त्या नेत्यांनाही मान ठेवायला हवा असा आदेश बाळासाहेब ठाकरेंनी दिला आणि शिवसैनिक थंड झाले, मला जागरूक आणि आक्रमक शिवसैनिक हवेत, शिवसैनिक थंड राहिले तर मी यापुढे नेतृत्व करू शकत नाही. मला विस्तव हवा राख नको, या सभेनंतर तो विषय संपला, त्यानंतर शिवसेनेत इतर नेत्यांना आपली जागा कळाली. आणखी वाचा Subscribe to Notifications