शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सोनिया गांधींनंतर काँग्रेसची धुरा कोणाकडे जाणार? पक्षासमोर 'हे' पाच पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 10:00 AM

1 / 10
गेल्या दोन निवडणुकांमध्ये दारुण पराभवाचा सामना कराव्या लागणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकारणीची आज बैठक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या देशभरातल्या २३ महत्त्वाच्या नेत्यांनी अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिलं. पक्षाला पूर्णवेळ आणि प्रभावी अध्यक्ष हवा, अशी मागणी या नेत्यांनी पत्रात केली.
2 / 10
काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होईल. ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. सोनिया गांधींच्या अंतरिम अध्यक्षपदाचा वर्षभराचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे त्या आज पायउतार होतील, अशी दाट शक्यता आहे.
3 / 10
एका बाजूला २३ नेते पूर्णवेळ आणि प्रभावी अध्यक्ष द्या, अशी मागणी करत असताना दुसऱ्या बाजूला अनेक मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांनी सोनिया आणि राहुल गांधींच्या नेतृत्त्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
4 / 10
सध्याच्या घडीला काँग्रेस अध्यक्षपदासाठी पाच जणांची नावं चर्चेत आहेत. यातील दोन नावं गांधी घराण्यातीलच आहेत.
5 / 10
राहुल गांधींचं नाव पक्षाच्या अध्यक्षपदासाठी सर्वात आघाडीवर आहे. पक्षाची धुरा गांधी घराण्याकडे राहावी, असं मानणारा एक मोठा वर्ग पक्षात आहे. काँग्रेस कार्यकारणी समितीच्या गेल्या बैठकीतही राहुल यांच्याकडे अध्यक्षपद सोपवण्याची मागणी करण्यात आली होती. राहुल यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यानंतर अध्यक्षपद सोडलं होतं.
6 / 10
प्रियंका गांधींकडे पक्षाचं नेतृत्व देण्यात यावं, असंदेखील पक्षातील काही नेत्यांना वाटतं. गेल्याच वर्षी त्यांच्याकडे उत्तर प्रदेशात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. मात्र गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीकडे पक्षाचं अध्यक्षपद सोपवण्यात यावं, अशी भूमिका खुद्द प्रियंका यांनीच मांडली होती. याशिवाय त्यांच्याकडे राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव नाही.
7 / 10
मुकूल वासनिक यांचं नाव आधीही काँग्रेस अध्यक्षपदासाठी चर्चेत होतं. गेल्या वर्षी राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यावेळीही वासनिक यांच्या नावाची चर्चा होती. वासनिक यांनी केंद्रात मंत्रिपद भूषवलं आहे. मागील लोकसभेत ते काँग्रेसच्या संसदीय दलाचे नेते होते. महाराष्ट्रातून राजकारणाची सुरुवात करणारे वासनिक सध्या काँग्रेसचे महासचिव आहेत.
8 / 10
सोनिया अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यास माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांच्याकडे पक्षाची सूत्रं जाऊ शकतात. ते गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय मानले जातात. याशिवाय ते अखिल भारतीय काँग्रेस समिती, काँग्रेस कार्यकारणी समितीसह काँग्रेसच्या कोअर ग्रुपचा भाग आहेत.
9 / 10
काँग्रेस अध्यक्षपदासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नावाचीही चर्चा आहे. दहा वर्ष पंतप्रधानपदी राहिलेल्या सिंग यांच्याकडे प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. राजकीय डावपेचांची त्यांना चांगली जाण आहे. पक्षात सगळेच त्यांचा आदर करतात. ही बाब त्यांच्या पथ्यावर पडू शकते. मात्र त्यांचं वय अध्यक्षपदाच्या जबाबदारीत अडथळा ठरू शकतं.
10 / 10
लागोपाठ दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागल्यानं काँग्रेसची अवस्था बिकट आहे. गेल्या काही वर्षांत अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम केला आहे. त्यामुळे काँग्रेससमोर फार मोठं आव्हान आहे.
टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीManmohan Singhमनमोहन सिंगMukul Wasnikमुकूल वासनिक