Last 15 minutes, NCP Jayant patil one call then BJP loss in Sangli Mayor Elections
शेवटची १५ मिनिटं, जयंत पाटलांचा एक फोन अन् भाजपाची दाणादाण; कसा होता राष्ट्रवादीचा गेम? By प्रविण मरगळे | Published: February 24, 2021 4:46 PM1 / 11सांगली-मिरज महापालिका महापौर-उपमहापौर(Sangli Miraj Corporation Mayor Elections) निवडणुकीत भाजपाला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता मिळवली, बहुमत असूनसुद्धा भाजपाला महापौरपदाच्या निवडणुकीत हार मानावी लागली, या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिग्विजय सिंह महापौर तर काँग्रेसचे उमेश पाटील उपमहापौर म्हणून निवडून आले. 2 / 11गेल्या अनेक दिवसांपासून सांगली महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक गाजत होती, यातच भाजपाचे काही नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याने या निवडणुकीला आणखी रंगत प्राप्त झाली, महापौरपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत चुरस होती, निवडीची प्रक्रिया ऑनलाईन सुरू झाली तरीही उमेदवार निश्चित होत नव्हता. 3 / 11अशातच अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(NCP Jayant Patil) यांचा एक फोन आला आणि शेवटच्या क्षणी दिग्विजय सूर्यवंशी यांचे नाव निश्चित करण्यात आले, सकाळपर्यंत मैनुद्दीन बागवान की दिग्विजय सूर्यवंशी हा तिढा सुटलेला नव्हता. 4 / 11केवळ १५ मिनिटं शिल्लक असताना जयंत पाटील यांनी दूरध्वनी करून मैनुद्दीन बागवान आणि उत्तम साखळकर यांना अर्ज मागे घेण्याची सूचना केली, त्यामुळे दिग्विजय सूर्यवंशी यांना महापौरपदाची लॉटरी लागली, या निवडीनंतर कोल्हापूरातील एका हॉटेलमध्ये आघाडीचे नेते आणि नगरसेवक एकत्र आले आणि त्यांनी जल्लोष केला. 5 / 11महापौर निवडणुकीत भाजपाच्या सत्तेला सुरुंग लावण्यात आघाडीला यश आलं, राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी यांनी भाजपाचे धीरज सूर्यवंशी यांचा ३९ विरुद्ध ३६ मतांनी पराभव केला, तर उपमहापौरपदी काँग्रेस उमेश पाटील यांनी भाजपाच्या गजानन मगदुम यांच्यावर मात केली. 6 / 11अवघ्या अडीच वर्षात भाजपाला सांगली-मिरज महापालिकेच्या सत्तेपासून दूर जावं लागलं आहे, काँग्रेसला सोबत घेऊन राष्ट्रवादीने हे सत्तांतर घडवून आणलं, यात सर्वात महत्त्वाची भूमिका राहिली ती जयंत पाटील यांची, जयंत पाटलांच्या योग्य रणनीतीने भाजपाची सत्ता मोडीत काढण्यात यश आलं, 7 / 11महापालिकेत एकूण सदस्यसंख्या ७८ असून यात सहकारी सदस्यांसह भाजपाचं संख्याबळ ४३ इतकं आहे, तर काँग्रेसचे १९ आणि राष्ट्रवादीचे १५ सदस्य आहेत. बहुमत असतानाही भाजपाची सात मतं फुटल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचा विजय सुकर झाला. 8 / 11भाजपाचे ९ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसने फोडून त्यांना अज्ञातस्थळी हलवले होते, त्यापैकी दोघे स्वगृही परतले, मात्र ७ नगरसेवक शेवटपर्यंत नॉट रिचेबल राहिले, ही सात मते फुटल्याने भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला, दरम्यान या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. 9 / 11प्रविण दरेकर म्हणाले की, सामना अग्रलेखातून पुडुचेरीवर लिहिणाऱ्यांनी सांगलीतही लक्ष घातलं असतं तर बरं झालं असतं, फोडाफोडीच्या राजकारणात राष्ट्रवादीचा हात कोणीही धरू शकत नाही, ७ नगरसेवक फुटले म्हणून पक्षवाढीवर काही परिणाम होणार नाही, परंतु हे का घडलं? याबाबत निश्चित चर्चा केली जाईल असं त्यांनी सांगितले. 10 / 11दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे पदवीधर निवडणूक आणि सांगलीची निवडणूक पाहिली तर पश्चिम महाराष्ट्रातून भाजपा हद्दपार झाल्याची टीका केली आहे, भाजपाला आता भविष्यात कधीच अच्छे दिन येणार नाही हे महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडी स्वीकारून दाखवून दिलंय असं विधान राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केले आहे. 11 / 11त्याचसोबत सांगली महापालिकेतील सत्तांतर हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय आहे, भाजपाच्या एकहाती कारभाराला जनता कंटाळली असून विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ते दिसून आलं, राज्यातील इतर महापालिका, नगरपालिका, आणि जिल्हा परिषदेत भाजपाला असाच धोबीपछाड देऊ असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Congress State President Nana Patole) यांनी दिला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications