प्रविण दरेकरांच्या ‘त्या’ विधानानं राजकीय चर्चेला उधाण; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत बैठकीत काय घडलं? By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 11:53 AM
1 / 12 राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसांत शरद पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला गेले. 2 / 12 शरद पवार आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू होत्या. महाविकास आघाडी सरकार कितपत टिकेल याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. त्याच शरद पवारांनी राज्याच्या प्रश्नावर पंतप्रधान आणि शहांची घेतलेली भेटीमागेही अनेक अर्थ लावले जात आहे. 3 / 12 शरद पवारांच्या या भेटीनंतर राज्यातील भाजपाचे वरिष्ठ नेते दिल्लीला गेले होते. त्यामुळे या चर्चेला आणखी वाव मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा एकत्र येणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात पडला. परंतु ही चर्चा राष्ट्रवादीचे नेते सातत्याने फेटाळून लावत आहेत. 4 / 12 त्यातच आता आणखी एका भेटीनं राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ही भेट आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची. सह्याद्री अतिथीगृहावर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने या दोन नेत्यांची भेट झाली. 5 / 12 मुंबई जिल्हा बँकेकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चेक देण्यात आला. हा चेक प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट देऊन सुपूर्द केला. मात्र यानंतर उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि प्रविण दरेकर(Pravin Darekar) यांच्यात अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. 6 / 12 उद्धव ठाकरे आणि दरेकर यांच्यात काय चर्चा झाली यावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. प्रविण दरेकर हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि प्रविण दरेकर यांच्या भेटीला विशेष महत्त्व आहे. 7 / 12 त्यातच ही भेट झाल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता. काही चर्चा जाहीरपणे सांगू शकत नाही असं विधान केल्यानं आणखी सस्पेन्स वाढला. महाराष्ट्रातील पूरस्थिती आणि जनतेसमोरील अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचं ते म्हणाले. 8 / 12 राज्यातील पूरग्रस्त भागाला मुंबई सहकारी संस्थांच्या वतीनं दीड कोटींचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सहकारी संस्थांनी त्यांच्याकडून काही योगदान दिलं आहे असं प्रविण दरेकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 9 / 12 तर मी विरोधी पक्षनेता असल्याने स्वभाविक मुख्यमंत्री भेटल्यावर इतर राजकीय विषयांवरही चर्चा होणार. मात्र बंद दाराआड झालेल्या चर्चा जाहीरपणे सांगण्यासारख्या नाहीत. अर्धा तास आमची वैयक्तिक भेट होती असंही प्रविण दरेकरांनी स्पष्टपणे सांगितले. 10 / 12 उद्धव ठाकरे आणि प्रविण दरेकर यांच्या भेटीनं अनेक चर्चा झाल्या. परंतु त्यानिमित्ताने आणखी एक प्रसंग लोकांना आठवत असेल तो म्हणजे. पावसाळी अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री ठाकरे त्यांची गाडी चालवत विधिमंडळाच्या बाहेर निघाले होते. 11 / 12 त्यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी मुख्यमंत्र्यांची कार थांबवली. त्यानंतर मागच्याच कारमध्ये असलेले शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर स्वत:च्या कारमधून उतरले आणि मुख्यमंत्र्यांच्या कारजवळ पोहोचले. 12 / 12 भाजप नेते, मुख्यमंत्री ठाकरे आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यात यावेळी हास्यविनोद रंगला. ही मंडळी तुमची कार अडवत आहेत का, असं नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना हसत हसत विचारलं. त्यावर आम्हाला तसं करण्याची गरज नाही. आम्ही कधीही येऊ शकतो, असं दरेकर यांनी म्हटलं. 'यांना आताच गाडीत टाकू आणि शिवबंधन बांधू,' असं पुढे नार्वेकर यांनी गमतीनं म्हटलं. त्यावर आमचं मूळ तेच आहे. आम्ही कधीही येऊ शकतो, असं दरेकर म्हणाले होते. आणखी वाचा