...अन् बाळासाहेब ठाकरे लुंगी-बनियानवरच राज ठाकरेंना भेटायला घरी पोहोचले! By प्रविण मरगळे | Published: November 17, 2020 3:00 PM
1 / 10 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतदिनानिमित्त राज्यभरातील शिवसैनिक बाळासाहेबांना मानवंदना देत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शिवतीर्थावरील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला भेट देत अभिवादन केले. बाळासाहेब ठाकरे यांना जाऊन आज तब्बल ८ वर्ष झाली, परंतु आजही शिवसैनिकांच्या मनात बाळासाहेब जिवंत असल्याची भावना शिवसैनिक व्यक्त करतात. 2 / 10 बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात खास नातं आहे. शिवसेनेतून बाहेर पडताना राज ठाकरेंनी माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे, त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असं जाहीर केलं, राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली, मात्र थेट बाळासाहेब ठाकरेंवर कधीही राज ठाकरेंनी टीका केली नाही. 3 / 10 बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनावेळीही राज ठाकरेंना गहिवरुन आल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं, आजही अनेकदा राज ठाकरे बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत असतात. लहानपणापासून राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या सावलीत वाढले. त्यामुळे बाळासाहेबांचा प्रभाव राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वावर दिसून येतो. 4 / 10 एका कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरेंबद्दल राज ठाकरेंनी एक आठवणीतला किस्सा सांगितला होता, या मुलाखतीत राज ठाकरेंनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली, आवडता व्यंगचित्रकार कोण, आवडता चित्रपट, शोले सिनेमा पाहिला त्यावेळी बाळासाहेबांची भूमिका काय होती, हेदेखील राज ठाकरेंनी सांगितलं. 5 / 10 या मुलाखतीत अमिताभच्या सिनेमांबद्दल राज ठाकरे म्हणाले की, मी तिसरी-चौथीत असताना शोले सिनेमा लागला होता. तेव्हा मला कांजण्या आल्या होत्या. त्याकाळी माझे वडिल शब्दनिशाद नावाने मार्मिकला परिक्षण लिहायचे. तेव्हा शुक्रवारी चित्रपट पाहायला लागायचा पण काही कारणास्तव तो चित्रपट पाहता आला नाही. 6 / 10 त्यानंतर दोन वर्षानंतर माझ्या अंगावर उकळतं पाण्याचं भांड पडल्याने मी भाजलो होतो. जवळपास ६-७ महिने घरीच होतो. तेव्हा मला भाजल्याचा प्रकार आईने रडत रडत बाळासाहेबांना सांगितला. तेव्हा बाळासाहेब मला टॅक्सीने भेटायला आले होते. मात्र आईने फोन केल्यानंतर बाळासाहेब होते त्याच कपड्यात भेटायला आले. 7 / 10 बाळासाहेब ठाकरे तेव्हा लुंगी आणि बनियानवर मला भेटायला आले होते अशी आठवण मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितली. त्यावेळी बाळासाहेबांनी मला शोले चित्रपटातील डायलॉगची एलपी दिली होती, पुढच्या काळात शोले सिनेमा संपूर्ण पाठ झाला होता. शोले सिनेमा १९७५ मध्ये प्रदर्शित झाला परंतु १९८० साली आईसोबत मी हा सिनेमा थिएटरला पाहिला. 8 / 10 त्याचसोबत 'माझं आधीचं नाव स्वरराज होतं. मात्र बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन मी राज या नावानं व्यंगचित्र काढू लागलो, अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी त्यांच्या दुसऱ्या बारशाची गंमत सांगितली. 'मी पाळण्यात असताना वडिलांनी माझं नाव स्वरराज ठेवलं. वडील संगीतकार असल्यानं मुलगादेखील पुढे जाऊन संगीत क्षेत्रात काहीतरी करेल, या विचारानं वडिलांनी माझं नामकरण केलं. मात्र नंतर मला वेगळेच राग येऊ लागले आणि त्या रागाचं परिवर्तन वेगळ्याच ठिकाणी झालं. मात्र अजूनही स्वरराज हेच नाव माझ्या पासपोर्टवर आहे,' असं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं. 9 / 10 आपल्याला राज ठाकरे हे नाव बाळासाहेबांनी दिलं, अशी आठवण त्यांनी सांगितली होती. 'मी सुरुवातीला स्वरराज ठाकरे नावानं व्यंगचित्रं काढायचो. व्यंगचित्रातील माझ्या कारकिर्दीची सुरुवात त्याच नावानं झाली होती. मात्र सहा-आठ महिन्यांतच मला बाळासाहेबांनी नावात बदल करायला सांगितला. 10 / 10 मी व्यंगचित्राच्या क्षेत्रातील कारकीर्द बाळ ठाकरे नावानं सुरू केली. त्यामुळे तू राज ठाकरे नावानं व्यंगचित्रं काढ, असं बाळासाहेबांनी मला सांगितलं आणि माझं बारसं झालं,' अशी आठवण राज ठाकरेंनी सांगताच उपस्थितांमध्ये हास्याची कारंजी उडाली होती. आणखी वाचा