शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

परमबीर सिंगांच्या पत्रामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट?; भाजपच्या बड्या नेत्याचं 'ते' विधान अन् चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 10:38 AM

1 / 12
मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आलेल्या परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यात खळबळ माजली आहे.
2 / 12
अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना (Sachin Vaze) दर महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा सनसनाटी आरोप करणारं पत्र सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) लिहिलं आहे. यामुळे देशमुख अडचणीत आले असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
3 / 12
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र माध्यमांपर्यंत पोहोचलं. हे पत्र सिंग यांनीच लीक केल्याचं बोललं जातं. परमबीर सिंग अजूनही सेवेत आहेत. सेवेत असणारे अधिकारी सहसा थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्याच मंत्र्यांवर इतके गंभीर आरोप करत नाहीत. पण परमबीर सिंग यांनी हे धाडस केलं आहे. यातून अनेक अर्थ निघतात.
4 / 12
परमबीर सिंग यांनी प्रोटोकॉल मोडला आहे. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. पण परमबीर सिंग यांच्या एका पत्रामुळे बरंच काही घडलं आहे. एकाच दगडात अनेक पक्षी मारले गेले आहेत.
5 / 12
मुकेश अंबानींच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करत आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या एनआयएच्या ताब्यात आहेत. वाझे तपास करत असताना परमबीर सिंग त्यांचे बॉस होते. त्यामुळे एनआयए परमबीर सिंग यांची चौकशी करू शकते.
6 / 12
एनआयएकडून मुंबई पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता असताना परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब फोडला. 'अनिल देशमुख यांनी वाझेंना १०० कोटी गोळा करायला सांगितले. त्यामुळेच वाझेंनी देशमुखांवर दबाव आणून मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणाचा तपास स्वत:कडे घेतला असावा. त्यामुळे मी आयुक्त असूनही काहीच करू शकलो नाही,' असं चित्र उभं करण्याचा प्रयत्न सिंग यांनी केला आहे.
7 / 12
परमबीर सिंग यांचं पत्र कोणाला तरी खूश करण्यासाठी असल्याचं सूचक विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. परमबीर सिंह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील असल्याची चर्चा अनेकदा राजकीय आणि पोलीस वर्तुळात होताना दिसते. त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांचं विधान अतिशय सूचक मानलं जात आहे.
8 / 12
विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनात मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करताना ठाकरे सरकारला लक्ष्य केलं. सचिन वाझे आणि शिवसेना यांच्यातील संबंधांचा दाखला देत फडणवीस तुटून पडले. पण त्यांनी वाझे यांचे बॉस असलेल्या परमबीर सिंग यांच्यावर हल्लाबोल करणं टाळलं. फडणवीस मुख्यमंत्री असताना परमबीर ४ वर्षे ठाण्याचे पोलीस आयुक्त होते.
9 / 12
दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा अनिल देशमुखांनी लावून धरला होता. या प्रकरणात भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणला गेल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांच्या आरोपांमुळे भाजप नेत्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.
10 / 12
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनादेखील पत्र लिहिलं आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था अडचणीत आल्याचा मुद्दा सिंग यांनी उपस्थित केल्यानं राज्यपाल कोश्यारी काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
11 / 12
परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर पुढे काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. याविषयी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक सूचक विधान केलं आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली असून सरकारचा कोणताही वचक राहिला नाही, असं पत्र राज्यपालांनी राष्ट्रपतींना पाठवल्यास काय करणार, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.
12 / 12
राज्यपाल कोश्यारींनी कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित करणारं पत्र राष्ट्रपतींना पाठवल्यास आम्ही नक्कीच त्याची पूर्तता करू, असं पाटील म्हणाले. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगAnil Deshmukhअनिल देशमुखUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJayant Patilजयंत पाटीलbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी