piyush goyal replied ncp sharad pawar over rajya sabha ruckus parliament session criticism
“५० वर्षांच्या कारकिर्दीत विरोधकांचे असे कृत्य पाहिलेय का?, शरद पवारांनीच आत्मपरीक्षण करावे!” By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 2:30 PM1 / 12संसदेचे पावसाळी अधिवेशन नियोजित कालावधीच्या दोन दिवस आधीच गुंडाळण्यात आले. विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दु:ख व्यक्त केले. 2 / 12पेगॅसस आणि तीन कृषी कायद्यांसहित वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन विरोधकांनी सभागृहात गदारोळ घालत सरकारला धारेवर धरले. राज्यसभेत पेगॅसस तसेच १२७ व्या घटनादुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान जोरदार गोंधळ झाला.3 / 12याप्रकरणी केंद्र सरकारने अहवाल सादर केला असून सीपीआय(एम)चे खासदार इलामारम करीम यांनी पुरुष मार्शलचा गळा दाबत मारहाण केल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसच्या खासदार फुलो देवी नेताम आणि छाया वर्मा यांनी महिला मार्शलला ओढत नेलं आणि मारहाण केल्याचे अहवालात म्हटले आहे. हा अहवाल राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. 4 / 12राज्यसभेत मार्शलनी धक्काबुक्की केल्याच्या विरोधकांच्या आरोपांना केंद्रीय मंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले. लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सदनांतील १२ महिला मार्शल व १८ पुरुष मार्शल असे एकूण ३० मार्शल राज्यसभेत सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. विरोधकांनी गदारोळ घालून या मार्शलना धक्काबुक्की केली, असा आरोप पीयूष गोयल यांनी केला.5 / 12राज्यसभेतील विरोधकांच्या कृत्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व वरिष्ठ सभागृहातील खासदार शरद पवार यांनी आत्मपरीक्षण करावे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सभापतींच्या हौदात येऊन गोंधळ घालत नाहीत याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक केले होते. पवारांच्या पक्षाचे सदस्य शिस्त पाळत असताना अन्य पक्षांच्या सदस्यांच्या बेशिस्त वर्तनाला पवार पाठिंबा का देत आहेत.6 / 12पवारांनी ५० वर्षांच्या राजकीय आयुष्यात विरोधकांकडून झालेले आक्षेपार्ह कृत्य कधी पाहिले आहे का? संसदेच्या मालमत्तेचे नुकसान झालेले पाहिले का? विरोधकांनी मार्शलना धक्काबुक्की केली, ते टेबलावर उभे राहून गोंधळ घालत होते, हे पवारांनी पाहिले नाही का? नियमपुस्तक फेकले गेले हे दिसले नाही का? विरोधकांच्या कृतीचे पवार समर्थन करतात का? त्यांनी गोंधळ घालणाऱ्या खासदारांचा निषेध का केला नाही, असे प्रश्न पीयूष गोयल यांनी उपस्थित केले आहेत. 7 / 12संसदेतील माझ्या ५५ वर्षांच्या करिअरमध्ये महिला खासदारांवर ज्याप्रकारे हल्ला करण्यात आला तसे कधीच पाहिलेले नाही. सभागृहात बाहेरुन ४० पुरुष आणि महिलांना आणण्यात आले. हे वेदनादायी असून लोकशाहीवर हल्ला आहे. सभागृहात हे योग्य झाले नाही, या शब्दांत शरद पवार यांनी संताप व्यक्त केला होता. 8 / 12दरम्यान, विरोधकांचे आरोप फेटाळण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला केंद्रीय मंत्री गोयल यांच्यासह संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, अनुराग ठाकूर, मुख्तार अब्बास नक्वी, अर्जुन मेघवाल असे सात मंत्री उपस्थित होते.9 / 12लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांनी बेशिस्त खासदारांविरोधात कारवाई करण्यासाठी समिती नेमली होती. तशीच समिती नेमून राज्यसभेत गदारोळ करणाऱ्या खासदारांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना भेटून केल्याचे गोयल यांनी सांगितले. 10 / 12शंभर वेळा असे आक्षेपार्ह वर्तन करू, असे म्हणण्याचे धाडस काँग्रेसचे खासदार प्रतापसिंह बाजवा कसे करू शकतात, या खासदारांवर इतकी कठोर शिक्षा झाली पाहिजे की, त्यांनी संसदेची प्रतिमा मलीन करण्याची कृती करण्याआधी १०० वेळा विचार केला पाहिजे, असे गोयल म्हणाले.11 / 12संसदेच्या बाहेरील मार्शल राज्यसभेत तैनात केल्याचा आरोपही गोयल यांनी फेटाळून लावला. नेमकी कोणी कोणाला धक्काबुक्की केली, याची ध्वनिचित्रफीत लोकांनी पाहावी म्हणजे राज्यसभेत संध्याकाळी नेमके काय घडले, हे समजेल आणि विरोधकांचा दावा बिनबुडाचा असल्याचे वास्तव कळेल, असे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले.12 / 12राज्यसभेत खासदारांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार विरोधकांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन केली. सत्ताधाऱ्यांनीही नायडू यांची भेट घेतली. एक समिती नेमावी आणि राज्यसभेत गदारोळ करणाऱ्या खासदारांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी नायडू यांच्याकडे केल्याचे गोयल यांनी सांगितले. आणखी वाचा Subscribe to Notifications