माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहाकाळ जागेवर राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आबांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी तब्बल १ लाख १२ हजार ९६३ इतक्या प्रचंड मताधिक्याने विजय नोंदविला.संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा १९ हजार मतांनी पराभव केला. शिवसेनेचे नेते बाळा सावंत यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती.भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बीड लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपानं मुंडे यांची कन्या प्रीतम मुंडे यांना रिंगणात उतरवले. प्रीतम मुंडे यांनी ऐतिहासिक विजयाची नोंद करीत काँग्रेसच्या अशोक पाटील यांचा तब्बल ६ लाख ९६ हजार ३२१ मतांनी पराभव केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सभापती बाबासाहेब कुपेकर यांच्या निधानाने रिक्त झालेल्या जागेवर चंदगड मतदारसंघातून राष्ट्रवादीने कुपेकर यांच्या पत्नी संध्यादेवी कुपेकर यांना तिकीट दिले. संध्यादेवी कुपेकर यांनी शिवसेनेच्या सुनील शिंगे यांचा २४ हजार ८४८ मतांनी पराभव करीत विजय मिळविला.मनसेचे आमदार रमेश वांजळे यांच्या निधनानंतर मनसेऐवजी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढविणा-या रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांचा भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार भीमराव तपकीर यांनी त्यांचा ३ हजार ६२५ मतांनी पराभव केला. मनसेने उमेदवार दिला नाही.