शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 2:19 PM

1 / 10
कोकणात मोठा जनाधार असलेल्या शिवसेनेचे यावेळी विधानसभा निवडणुकीत काय होणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. शिवसेनेतील फुटीनंतर शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना याची थेट लढत टळली. पण, विधानसभेला कोकणात अनेक ठिकाणी अशा लढती होणार आहेत.
2 / 10
कोकणातील एका मतदारसंघांकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे, तो म्हणजे रत्नागिरी विधानसभा! राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या उदय सामंतांनी फुटीनंतर एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्यांदाच ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.
3 / 10
शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) त्यांच्याविरोधात भाजपातून आलेल्या बाळासाहेब माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. २०१४ मध्ये भाजप आणि शिवसेना युती तुटली. तेव्हा माने यांनी उदय सामंत यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.
4 / 10
२०१४ च्या निवडणुकीत उदय सामंत यांना ९३,८७६ मते मिळाली होती. तर बाळासाहेब माने यांना ५४,४४९ मते मिळाली होती. उदय सामंतांनी ३९,४२७ मतांनी त्यांचा पराभव केला होता. २०१९ मध्ये उदय सामंत यांना तब्बल १,१८,४८४ मते मिळाली होती. ८७ हजार ३३५ इतके मताधिक्य घेत उदय सामंतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुदेश मयेकर यांचा पराभव केला होता.
5 / 10
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांनी सहज विजय मिळवला होता. पण, गेल्या पाच वर्षात झालेल्या राजकीय फाटाफुटीनंतर कोकणातील समीकरण आणि राजकीय वातावरणही बदलले आहे. लोकसभा निवडणुकीत काहीअंशी ते बघायला मिळाले.
6 / 10
२०१९ च्या निवडणुकीत १,१८,४८४ मते घेणाऱ्या उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला. जितके मताधिक्य सामंत यांना २०१९ मध्ये मिळाले होते, तितके लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाले.
7 / 10
लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली. नारायण राणे हे विजयी झाले. पण, उदय सामंत यांच्या मतदारसंघातून त्यांना मताधिक्य मिळालं नाही. किरण सामंत या मतदारसंघातून इच्छुक होते, पण त्यांना उमेदवारी न दिल्याचाही परिणाम झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले गेले.
8 / 10
२०२४ लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला ७४,७१८ मते मिळाली होती. तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ८४,७५५ मते मिळाली होती.
9 / 10
कमळ विरुद्ध मशाल अशी लढत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात झाली होती. यावेळी रत्नागिरीत दोन्ही शिवसेना आमने-सामने असणार आहेत. उदय सामंत यांचा २००९ पासून या मतदारसंघावर वरचष्मा राहिलेला आहे. पण, शिवसेना फुटीनंतर ही निवडणूक होत असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे.
10 / 10
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सामंतांविरोधात गद्दारी केल्याचा मुद्द्यावरच ठाकरेंच्या शिवसेनेकडून भर दिला जाण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीतही हाच मुद्दा मांडला गेला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही शिवसेना फुटीचा मुद्दा प्रभावी ठरला तर उदय सामंतांना निवडणूक जड जाऊ शकते. त्याचबरोबर रिफायनरी आणि स्थानिक विकास हे मुद्दे असतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठाकरेंनी भाजपातून आलेल्या बाळासाहेब माने यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपाची मते फिरू शकतात. तर दुसरीकडे मानेंना उमेदवारी दिल्याने ठाकरेंच्या शिवसेनेतील नाराजीही उमटू शकते. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतर छोट्या पक्षाची ठाकरेंच्या उमेदवाराला किती साथ मिळते. यावरही निकाल अवलंबून असेल.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024ratnagiri-acरत्नागिरीUday Samantउदय सामंतUddhav Thackerayउद्धव ठाकरे