अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 19:18 IST
1 / 8अजित पवार सातत्याने सांगत आहेत की, 'लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन चूक केली. पण, साहेबांनी उमेदवार द्यायला नको होता. कुटुंबात अशी लढत व्हायला नको.' याच संदर्भात शरद पवारांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता.2 / 8शरद पवार म्हणाले, 'प्रश्न तो नाही. कुटुंब म्हणून मी याच्यात बघतच नाही. अजित पवार आणि आमचे सगळे सहकारी गेली दहा-पंधरा वर्षे कुठल्या पक्षाच्या नावावर निवडून आले? कोणत्या पक्षाचं नेतृत्व त्यांनी केलं किंवा त्यांना आपल्या बरोबर घेतलं?'3 / 8'आमचा संघर्ष कोणाच्या विरोधात होता, मागच्या निवडणुकीमध्ये? आमचा संघर्ष होता भाजपच्या विरोधात होता मागच्या निवडणुकीमध्ये. त्यांची जी राजकीय विचारसरणी आहे, ती आम्हाला पसंत नाही पहिल्यापासून आणि म्हणून आम्ही त्यांच्याविरोधात गेलो', असे पवार उत्तर देताना बोलले.4 / 8शरद पवार पुढे म्हणाले की, 'त्यांच्या विरोधात आम्ही लोकांना मतं मागितली. लोकांनी ती मतं दिली. नंतर आमच्यातील लोक त्यांच्यात जाऊन बसले. ही लोकांची फसवणूक आहे. आणि आज आमचा जो विरोध आहे, काही कौटुंबिक विरोध म्हणून नाही.'5 / 8'त्यांनी हा पक्ष फोडला नसता. पक्ष बदल केला नसता, त्यांनीच चालवलं असतं. मी काही त्या ठिकाणी चालवायला बसलो नव्हतो. नेतृत्व, अधिकार सगळा त्यांनाच दिला होता. गेल्या २-३ निवडणुका जर बघितल्या तर या सगळ्याचे अधिकार ह्याच लोकांना दिले होते', अशी भूमिका शरद पवारांनी मांडली.6 / 8'जोपर्यंत विचारधारेच्या बाबतीत तडजोड करत नाही, तोपर्यंत. विचारधारेच्या संबधी तडजोड केली. ज्यांच्या विरोधात आम्ही लढलो त्यांच्या पंगतीला जाऊन बसले. तर त्याला विरोध आहे, इथे व्यक्तिगत विरोध नाही. मग हा विरोध करणं गरजेचं आहे, हे मी महाराष्ट्रात सांगतो आणि माझ्या घरच्या मतदारसंघात करायचा नाही?', असे शरद पवार म्हणाले. 7 / 8पुढे बोलताना पवार म्हणाले, 'लोकं काय म्हणतील? लोक हेच म्हणतील की हा संधीसाधूपणा आहे. स्वतःच्या मतदारसंघात नातेवाईक होते म्हणून वेगळी भूमिका आणि आमच्याकडे वेगळी भूमिका. एकदा सूत्रं स्वीकारलं, तत्वं स्वीकारलं त्याच्यात तडजोड... घरचा आणि बाहेरचा असा कधी करायचा नसतो.'8 / 8'माझं अनेकदा असं झालं. माझे एक मेहुणे होते, वारले ते. एन.डी. पाटील. माझी मोठी बहीण त्यांची पत्नी. अतिशय जवळचे घरचे, पण निवडणुकांत आम्ही आम्ही एकमेकांच्या विरोधात लढत होतो. आणि आमची विचारधारा त्यांनी कधी आयुष्यात मानली नाही. त्यांच्या विचारापासून एक तसूभर सुद्धा दूर गेले नाही. याचा अर्थ आमचा व्यक्तिगत सलोखा गेला असं नव्हे', असे उत्तर शरद पवारांनी दिले.