शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 8:09 PM

1 / 9
महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे अनेक घरे दुभंगली आहेत. खुद्द पवारांच्याच कुटुंबात राजकीय फूट पडली आहे. तेच चित्र आता वेगवेगळ्या मतदारसंघात बघायला मिळत आहे. धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी वडिलांविरोधात दंड थोपटले आहेत. तर आमदार राजेंद्र शिंगणेंविरोधात गायत्री शिंगणेंनी तयारी सुरू केली आहे.
2 / 9
अजित पवारांनी बंड केल्यानंतर राजेंद्र शिंगणेंनी शरद पवारांची साथ सोडली. पण, त्यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा मार्ग निवडला. तेव्हापासूनच गायत्री शिंगणे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्या.
3 / 9
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गायत्री शिंगणे यांनी सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्या करताना दिसत आहेत.
4 / 9
महत्त्वाचे म्हणजे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. आमदार राजेंद्र शिंगणे यांना त्या लक्ष्य करताना दिसत आहेत. 'सिंदखेड राजा मतदारसंघात आता बदल पाहिजे. २५ वर्षात विकास कुठेच दिसत नाही. डॉ. शिंगणे यांनी विकासाची पाच कामे तरी दाखवावीत', असे चॅलेंज त्यांनी केले आहे.
5 / 9
गायत्री शिंगणे पूर्ण ताकदीने राजेंद्र शिंगणे यांच्याविरोधात तयारी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीने आपल्यालाच उमेदवारी मिळणार असा दावाही त्यांनी केला आहे.
6 / 9
माध्यमांशी बोलताना गायत्री शिंगणे म्हणाल्या, 'शरद पवार यांची भेट झाली. त्यांच्याशी चर्चा झाली. कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. मी त्यांच्याकडे तिकिटाची मागणी केली आहे आणि शरद पवार मला तिकीट देतील, असा विश्वास आहे.'
7 / 9
पक्षात फूट पडल्यानंतर साथ सोडून गेलेल्या नेत्यांविरोधात शरद पवारांकडून त्यांच्या घरातीलच व्यक्तींना पुढे आणण्याची रणनीती केली जात आहे. धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम, नरहरी झिरवळ यांच्या विरोधात त्यांचा मुलगा गोकूळ झिरवळ किंवा आता राजेंद्र शिंगणे विरोधात त्यांची पुतणी गायत्री शिंगणे यांना पवारांनी ताकद दिल्याचे म्हटले जात आहे.
8 / 9
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र शिंगणे यांनी शिवसेनेचे शशिकांत खेडेकर यांचा पराभव केला होता. राजेंद्र शिंगणे यांना ८१,७०१ मते मिळाली होती, तर शशिकांत खेडेकर यांना ७२,७६३ मते मिळाली होती. राजेंद्र शिंगणे ८९३८ मतांनी विजयी झाले होते.
9 / 9
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र शिंगणे यांना घरातूनच आव्हान असणार आहे. त्याचबरोबर शिंदेंची शिवसेना आणि भाजपाचे स्थानिक नेते किती मदत करतात, यावर या मतदारसंघातील गणित अवलंबून असणार आहे. पण, सिंदखेड राजा मतदारसंघात काका विरुद्ध पुतणी या लढतीची अधिकृत घोषणा होण्याआधीच जोरात चर्चा सुरू झाली आहे.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारsindkhed-raja-acसिंदखेडराजाAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस