शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शिवरायांची सांकेतिक भाषा, अजितदादांचे डोळे अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची फिरकी...शिवनेरीवर काय घडलं?

By प्रविण मरगळे | Published: February 19, 2021 12:21 PM

1 / 10
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात शिवप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, राज्य सरकारकडून शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), छत्रपती संभाजीराजे भोसले(Chhatrapati Sambhajiraje Bhosale) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
2 / 10
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शिवनेरीवर शिवजन्म सोहळा पार पाडला, यावेळी ढोलताशे आणि शिवरायांच्या जयघोषात गडावरील वातावरण शिवमय झालं होतं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवनेरीवर जन्मसोहळा जल्लोषात साजरा झाला.(Shiv Jayanti Celebration at Shivneri Fort)
3 / 10
मात्र या कार्यक्रमात एका घटनेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं, ज्यावेळी जुन्नरचे स्थानिक आमदार अतुल बेनके यांनी भाषण केले, तेव्हा अजितदादांचे कौतुक करताना त्यांनी शिवाजी महाराजांना ७ भाषा येत होत्या, त्यापैकी एक भाषा म्हणजे ते त्यांच्या डोळ्यांनी मावळ्यांना सांगायचे, सांकेतिक खूण मावळ्यांना शिवाजी महाराजांना काय म्हणायचं ते योग्यपणे कळायचं.
4 / 10
सध्या हीच भाषा उपमुख्यमंत्री अजित पवार वापरतात, अतुल बेनकेंनी असं म्हणताच अजित पवारांनी हात जोडले, त्यानंतर अतुल बेनकेंच्या विधानाचा आधार घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अजित पवार आणि अतुल बेनकेंची चांगलीच फिरकी घेतली.
5 / 10
उद्धव ठाकरे म्हणाले की, दादांना डोळ्याची भाषा येते असं आमदार अतुल बेनके म्हणतात. मला आता ती भाषा शिकावी लागणार आहे का? तर मला दादांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे, अगदी दादांनी गॉगल घातला तरी मी त्यांच्या मनातलं सगळं ओळखून दाखवणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले, मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला
6 / 10
यावेळी उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले की, आपल्या प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती शिवरायांचे अढळ स्थान आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते. सध्या वातावरण चांगले आहे पण तोंडावर मास्क आहे. छत्रपती दैवत का आहे, तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती. कोरोनाशी लढतांना ही प्रेरणा व जिद्द आम्हाला मिळते आहे. आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
7 / 10
तसेच संपूर्ण जगात शिवरायांचे तेज पसरवणार आहे, शिवनेरीवर येण्याचे हे दुसरे वर्ष आहे, हा बहुमान शिवरायांच्या आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाने लाभला आहे. मनात, ह्रदयात शिवरायांचे स्थान आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते. सध्या वातावरण चांगले आहे पण तोंडावर मास्क आहे. कोरोनाशी आपली लढाई सुरू आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
8 / 10
त्याचसोबत छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या त्यात त्यांनी शत्रूला पराभूत केले. त्यांच्या ढाल तलवारी आज नसल्या तरी कोरोना या शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल आहे, हे विसरू नका, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला दिला.
9 / 10
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतलेल्या प्रत्येकाच्या आशा-आकांक्षांच्या स्वप्नपूर्तीची जयंती आहे. छत्रपती शिवरायांसोबत स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या शौर्याची, त्यागाची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष, महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले आणि त्यांना आदर्श मानणारे कोट्यवधी युवक, आजही गावागावात महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवत आहेत असं त्यांनी सांगितले.
10 / 10
तसेच कोरोना नियमांचं पालन करुन शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्याच्या घराघरात, मनामनात साजरा होऊदे, शिवनेरी परिसरातील विकास कामांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी संपूर्ण शिवनेरीचे पावित्र्य, महत्त्व लक्षात घेता विकास कामे दर्जेदार करावीत, तसेच कामे वेळेत सुरू करून वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.
टॅग्स :ShivjayantiशिवजयंतीUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवार