uddhav thackeray might appoint varun sardesai as yuva sena chief
उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार? खास शिलेदाराकडे जाणार युवासेनेची जबाबदारी; आदित्य पायउतार होण्याच्या तयारीत By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 1:06 PM1 / 12शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कायम सरकारी पदांपासून दूर राहिले. मातोश्रीतून राजकीय सूत्रं सांभाळणाऱ्या बाळासाहेबांनी युती सरकारचा रिमोट कंट्रोल आपल्या हाती ठेवला. मात्र बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेचं राजकारण बदलताना दिसत आहे.2 / 12राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत असलेलं ठाकरे कुटुंब २०१९ पर्यंत स्वत: निवडणुकीपासून दूर राहिलं. २०१९ मध्ये आदित्य ठाकरेंनी मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले.3 / 12२०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडल्या. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं भाजपची साथ सोडत काँग्रेस, राष्ट्रवादीशी घरोबा केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. 4 / 12आतापर्यंत कधीही कोणतीही निवडणूक न लढलेल्या उद्धव ठाकरेंकडे थेट मुख्यमंत्रिपदाची सूत्रं आहेत. त्यानंतर आता पक्षामध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत. पर्यावरण आणि पर्यटनमंत्री असलेल्या आदित्य ठाकरेंकडे युवासेनेचीदेखील जबाबदारी आहे.5 / 12आदित्य ठाकरेंकडे मंत्रिपद असल्यानं त्यांना युवासेनेसाठी फारसा वेळ मिळत नाही. त्यामुळे ते लवकरच युवासेनेचं प्रमुखपद सोडू शकतात. विशेष म्हणजे त्यांची जागा घेणारी व्यक्ती ठाकरे कुटुंबाबाहेरची असू शकते. यासाठी वरुण सरदेसाईंचं नाव आघाडीवर आहे.6 / 12युवासेनेत अनेक वर्षे काम केलेले वरुण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेचं अध्यक्षपद जाऊ शकतं. वरुण हे आदित्य यांचे मावसभाऊ आहेत. युवासेनेचे सचिव म्हणून सध्या ते कार्यकत आहेत.7 / 12पुढील वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. शिवसेनेसाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. त्यासाठी आदित्य ठाकरे कामाला लागले आहेत. त्यातच मंत्रिपदाची जबाबदारीदेखील त्यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांना युवासेनेसाठी पूर्ण वेळ देता येत नाही.8 / 12वरुण सरदेसाईंकडे युवासेनेचं प्रमुखपद गेल्यास ही घटना महत्त्वाची आहे. कारण युवासेनेचं प्रमुखपद आतापर्यंत कधीही ठाकरे कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीला देण्यात आलेलं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या निर्णयामुळे वेगळा पायंडा पडेल.9 / 12सध्या वरुण सरदेसाई विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे युवासेनेची जबाबदारी त्यांच्याकडेच सोपवली जाण्याची शक्यता अधिक वाढली आहे.10 / 12वरुण सरदेसाईंच्या रुपानं युवासेना प्रमुखपद पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबाबाहेर जाईल. मात्र सरदेसाई हे ठाकरे कुटुंबाच्या अतिशय जवळचे आहेत. आदित्य यांचे विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जातात. वरुण यांच्याकडे युवासेनेची जबाबदारी दिली गेल्यास पक्षात एक संदेश जाऊ शकतो.11 / 12ठाकरे आडनाव नसलेल्या व्यक्तीकडे महत्त्वाचं पद गेल्यास पक्षात एक चांगला संदेश जाईल. सरदेसाई यांच्याकडे ठाकरे आडनावाचं वलय नाही. मात्र त्यांनी विद्यापीठांमधील निवडणुकांमध्ये आपली चुणूक दाखवली आहे. पडद्यामागे राहून त्यांनी अनेकदा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलल्या आहेत.12 / 12युवासेनेला बळकटी देण्याचं काम आतापर्यंत सरदेसाई यांनी आदित्य यांच्या नेतृत्त्वाखाली केलं आहे. युवासेनेत ते आदित्य यांच्यासोबत सावलीसारखे असतात. कृष्णा हेगडे, आदित्य शिरोडकर यांना शिवसेनेत आणण्यात सरदेसाईंनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications