शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हे आहेत पर्यटकांना खुणावणारे कोकणातील अतिशय सुंदर धबधबे, तुम्हालाही भुरळ पडेल! हजारो लोक येतायत भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 9:16 PM

1 / 6
काेकणातील निसर्ग सौंदर्याची अनेकांना नेहमीच भुरळ घातलेली आहे. त्यामुळेच वर्षानुवर्षे पावसाळी आणि उन्हाळी पर्यटनासाठी असंख्य पर्यटक कोकणातील विविध स्थळांना भेट देऊन आनंद लुटतात. सध्या पावसाळी पर्यटनाला सुरुवात झाली असून, असंख्य ठिकाणचे धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे तो अवर्णनीय आनंद लुटण्यासाठी पर्यटक सुट्टीत मोठ्या प्रमाणात कोकणात येत आहेत. सध्या हे धबधबे पर्यटकांना खुणावत आहेत.
2 / 6
पर्यटकांना खुणावतोय सावडावचा धबधबा - कोकणातील निसर्ग, धबधबे, समुद्र किनारे, किल्ले, विविध धार्मिक स्थळे हे सर्व अद्भुत आणि अद्वितीय असे पाहण्यासारखे दृश्य असंख्य पर्यटक आवर्जून पाहतात. या वर्षात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने जोर धरला आणि खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गापासून जवळच असलेला सावडाव धबधबा पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे. त्यामुळे सुट्टीत पर्यटक या धबधब्याकडे मोठ्या संख्येने येऊ लागले असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यासह राज्य, परराज्यातील पर्यटकांची उच्चांकी गर्दी आता सावडाव येथे दिसू लागली आहे. कणकवलीपासून अवघ्या १६ किमी अंतरावर तर मुंबई-गोवा महामार्गावरून ६ किमी अंतरावर असलेला सावडाव धबधबा अनेकांना आकर्षित करतोय.
3 / 6
चित्ताकर्षक सवतसडा! - पावसाळी हंगामात परशुराम घाट रस्त्याच्या अंतर्गत घळईत घाट चढताना उजवीकडे कोसळणाऱ्या जलप्रपातास म्हणजेच सवतसडा धबधबा. विशेषतः रौद्ररूप धारण करून पावसाळ्यात कोसळणाऱ्या या पांढऱ्या शुभ्र धबधब्याचे दर्शन चित्ताकर्षक ठरते. पावसाळ्यात धबधब्याचा परिसर हिरवाईने नटलेला असतो. चिपळूणपासून सुमारे अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. उंचीवरून कोसळणाऱ्या जलधारांच्या प्रभावामुळे त्याच्या पायथ्याशी डोहासारखा खड्डा तयार झाला आहे. पावसाळ्यात येथे पर्यटकांची खूप गर्दी होते.
4 / 6
पावसाळी पर्यटनात भाव खाऊन जाणारा ‘सवतकडा’ - निसर्गाच्या कुशीत चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला राजापूर तालुक्यातील चुनाकोळवणचा ‘सवतकडा धबधबा’ आता राज्यातील पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूरहून मुंबईकडे जाताना १२.५० किलाेमीटरवर डाव्या बाजूला शिवणे हा रस्ता जातो. तिथून ६.५० किलाेमीटर उजव्या बाजूला ४ किलाेमीटर अंतरावर चुनाकोळवण हे गाव आहे. तेथे गाडी लावून १ किलाेमीटर निसर्गरम्य वातावरणातून चालत गेल्यानंतर हा धबधबा दृष्टीस पडताे. हा संपूर्ण भाग डोंगरदऱ्यांचा असल्याने एकाच ओढ्यावर ३-४ ठिकाणी छोटे-मोठे धबधबे आढळतात.
5 / 6
आंबोली धबधब्याने वर्षा पर्यटन बहरले - आंबोली हे वर्षा पर्यटनासाठी ‘हाॅट स्पाॅट’ मानले जाते. धबधब्यांचा नजराणा तर पर्यटकांना खुणावत असतो. त्यामुळे आंबोली घाटातील धबधब्यांवर आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. उंच उंच धबधब्यांमुळे तर आंबोलीतील वर्षा पर्यटन बहरून जात असते. पर्यटकांना आवर घालताना पोलिसांची दमछाक होत असते. पण आता पर्यटकांसाठी नियमावली तयार करण्यात आली असून, सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पर्यटकांना धबधब्यावर एन्ट्री ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अतिउत्साही पर्यटकांना लगाम लागला आहे.
6 / 6
पर्यटकांना खुणावताे मार्लेश्वरचा धारेश्वर धबधबा - सह्याद्रीच्या कुशीत हिरव्यागार शालूने नटलेल्या उंचच उंच डोंगररांगा आणि समोर फेसाळणारा धारेश्वर धबधबा असे विहंगम नयनरम्य निसर्गाच्या सानिध्यातील संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ म्हणजे मार्लेश्वर. याठिकाणचा उंचावरून काेसळणारा, फेसाळणारा धारेश्वर धबधबा भाविकांसह पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणावा लागेल. येते राज्यभरातून लाखो भाविक, पर्यटक मोठ्या संख्येने दाखल हाेतात. मार्लेश्वर हे पर्यटनस्थळ देवरुख बसस्थानकापासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर आहे. तर कोल्हापूरकडून येताना आंबा घाट कळकदरा येथून खडीकोळवण मार्गे २० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. या पर्यटनस्थळी पायथ्यापर्यंत गाड्या जाण्याची व्यवस्था आहे. तिथून सुमारे ४५० पायऱ्या चढून वर जावे लागते. तिथे गेल्यानंतर गुहेमध्ये स्वयंभू मार्लेश्वराचे देवस्थान आहे.
टॅग्स :konkanकोकणtourismपर्यटनWaterपाणीmonsoonमोसमी पाऊस