- माधुरी पेठकर‘नोकरी-व्यवसायातून निवृत्त होणं’ या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही नकारात्मकच आहे. नोकरी संपली, आता काय करायचं? काय उरलय आयुष्यात? असे उदासी आणणारे प्रश्न अनेकांच्या मनात घर करून बसतात. आणि यामुळे निवृत्तीनंतरचं आयुष्य अनेकजण फिकट, करड्या रंगात आणि उदास मूडमध्ये जगतात.एरवी घरातल्या छोट्यातल्या छोट्या कार्यक्रमाचं नियोजन आपण महिनाभर आधी करायला लागतो. पण निवृत्तीनंतरच्या आयुष्याबद्दल अगदी निवृत्त होण्याची वेळ येवून ठेपल्यानंतरही अनेकांना विचार करण्याची फुरसत मिळत नाही. मग काय निवृत्तीनंतर येणारं रिकामेपण अनेकांना नकोनकोसं होवून जातं. वेळेचं, पैशाचं, पुढच्या आयुष्यातल्या जगण्याचं, आनंदी राहण्याचं, स्वत:ला गुंतवण्याचं अगदी कसलंच नियोजन नसल्यानं निवृत्तीनंतर निरस आयुष्य अनेकांच्या वाट्याला येतं.खरंतर नोकरी व्यवसायातल्या निवृत्तीनंतर सर्व काही संपत नाही. उलट निवृत्ती ही संधी असते एक नवीन आयुष्य नवीन पध्दतीनं जगण्याची. एरवी नोकरी व्यवसायामुळे आपला स्वत:चा दिवस आपला असूनही स्वत:चा वाटत नाही. तो कामं आणि जबाबदाऱ्यांमुळे सतत घडयाळीच्या काट्यांशी बांधलेला असतो. निवृत्तीनंतर स्वत:च आयुष्य स्वत:च्या मर्जीप्रमाणं, आपल्या जोडीसारासोबत, कुटुंबासोबत आनंदानं जगण्याची संधी निवृत्तीनंतरचं आयुष्य देत असतं. या संधीचा फायदा जे जे घेतात त्यांना आयुष्यात समाधान म्हणजे नेमकं काय ते निवृत्तीच्या टप्प्यात कळतं. आनंदी आणि समाधानी निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी नियोजनाची तेवढी गरज असते. निवृत्तीनंतरच्या आयुष्याचं नियोजन करताना या 8 गोष्टींचा अवश्य विचार करा. आणि स्वत:चं आयुष्य स्वत:च्या मनाप्रमाणे जगा. 1) निवृत्तीनंतर काय? याचा विचार निवृत्त झाल्यावर न करता निवृत्तीच्या पाच सहा वर्ष आधी म्हणजेच वयाच्या 54-55व्या वर्षापासूनच करायला हवा. यामुळे वेळ, पैसा आणि आपलं पुढचं आयुष्य कुठे आणि कसं गुंतवायचं याचा विचार करायला पुरेसा वेळ मिळतो. नीट नियोजन करायला मिळतं. निवृत्तीनंतरच्या आयुष्यातली घुसमट, तगमग, चिडचिड, निराशा, रिकामेपण या साऱ्या गोष्टी नीट नियोजन केलं तर टाळता येवू शकतात.2) दोघांचं आनंदी आयुष्य:- निवृतीनंतर जोडीदारासोबत जगायला, एकमेकांना भरपूर वेळ द्यायला अवकाश मिळतो. निवृत्तीनंतर दोघंही कसं सुखात जगू शकतो याचा विचार खरंतर एकानेच नाही तर दोघांनी मिळून करायचा. निवृत्तीनंतरच्या आयुष्याच्या कल्पना दोघांनीही एका कागदावर लिहून काढाव्यात. कागदावर लिहिलेलं एकमेकांशी शेअर करावं. त्यातलं काय शक्य काय अशक्य हे दोघांनी ठरवून एका निर्णयाप्रत दोघांनी दोघांच्या सोबतीनं यावं. यामुळे निवृत्तीनंतर आपल्याला कसं जगायचं आहे याबाबत आपला जोडीदारही अनभिज्ञ राहात नाही. जोडीदाराच्या कल्पनाही नियोजनात वापरता येतात. आणि एकमेकांना भरपूर वेळ मिळेल हा सहवासाचा आनंद दोघांनाही घेता येईल. 3) हातातल्या पैशाचं नियोजन:- निवृत्तीनंतर उदास वाटण्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे आटणारा पैसा.म्हणूनच नवृत्तीला डोळ्यासमोर ठेवून पैशाचं नियोजन करावं. निवृत्तीनंतर गुंतवणुकीतून ठराविक पैसा पेन्शनसारखा कसा मिळेल याचा विचार करून आधीपासूनच गुंतणूक करावी. आपलं आणि आपल्या जोडीदाराचं व्यवस्थित भागेल, आपल्या हौसा मौजा पूर्ण करता येतील इतके पैसे आपल्याला निवृत्त्तीनंतर कसे मिळतील याचं नियोजन प्रत्येकानं निवृत्तीच्या वयाच्या दहा बार वर्ष आधीच केलं तर केवळ पैशांची आवड या एका कारणानं निवृत्तीनंतरचं आयुष्य जड वाटत नाही.4) निवृत्ती कधी घ्यावी? सरकारी नोकरी असेल तर व्हॉलेन्टरी रिटायरमेन्ट हा भाग सोडला तर निवृत्त कधी व्हावं हा प्रश्न सहसा पडत नाही. पण खासगी नोकरी करणाऱ्यांना, व्यवसायात असलेल्यांना निवृत्त कधी व्हायचं हे नक्कीच ठरवता येतं. या गोष्टीचा विचारही सर्वात आधी केला तर त्याआधारावर पुढचं नियोजन करणं सोपं जातं.5) निवृत्तीनंतरही गुंतून राहा- निवृत्तीनंतर नुसताच आराम, घरकोंडं व्हायला फारसं अनेकांना आवडत नाही. म्हणूनच निवृत्तीनंतरच्या आयुष्यात आपण स्वत:ला किती आणि कसं गुंतवावं याचा नीट विचार व्हायला हवा. नोकरीत राहून जे करायला जमलं नाही ते करण्याची संधी निवृत्तीनंतरच्या आयुष्यात असते. त्यामुळे आपल्याला काय करायला आवडेल याचा विचार आधीच करून ठेवा. निवृत्तीनंतरही अनेकांना काम करण्याची, पैसे कमावण्याची इच्छा असते. तेव्हा निवृत्तीनंतर आपण कोणतं छोटं मोठं काम करू शकू किंवा पार्ट टाइम जॉब करू शकू याचाही विचार लवकरात लवकर करून ठेवा. म्हणजे निवृत्तीनंत आयुष्य एकदम रिकामं रिकामं वाटणार नाही. वेळही सत्कारणी लागतो आणि हातात थोडा बहोत पैसाही खेळता राहातो.6) नवीन शिकण्याची संधी- नोकरी व्यवसायातली निवृत्ती ही मनाप्रमाणे जगण्याची संधी देते. म्हणून आतापर्यंतच्या आयुष्यात वेळेअभावी जे शिकायचं राहून गेलं आहे ते अवश्य शिकता येतं. अनेकांना कलेची आवड असते. खरंतर निवृत्तीनंतरच्या आयुष्यात खरे रंग भरतात ते छंद आणि कला. त्यामुळे एखादी कला, संगीत यातलं काही शिकता आलं तर अवश्य शिकण्याचं नियोजन करावं. आपण निवृत्त झाल्यानंतर अमूक तमूक करणार आहोत, शिकणार आहोत या विचारानेही एकदम उत्साही वाटायला लागतं. 7) वेळेचं नियोजन करा- निवृत्तीनंतर आता काय अख्खा दिवस मोकळा, नेहेमीची कामं कितीही सावकाशीनं उरकली तरी चालतील असा विचार अनेक करतात. पण या सावकाशीतला आनंद खूपच कमी काळ टिकतो. या सावकाशीमुळेही आपलं आयुष्य निरर्थक वाटू शकतं. आपल्या घरातले इतर सर्व पळत असतात आणि आपण मात्र एकदमच निवांत राहतो याचंही नैराश्य येवू शकतं. शरीर आणि मन ताजं ठेवायचं असेल तर दिवसभराचा वेळ विशिष्ट कामांना ठरवून घ्यावा. वेळेचं हे नियोजन करताना संपूर्ण 24 तासांचं काटेकोर नियोजन न करता स्वत:च्या आवडी निवडींना, आपल्या मित्र मंडळींमध्ये मिसळायला, जोडीदारासोबत राहायला जास्तीत जास्त वेळ शिल्लक ठेवायला हवा हे लक्षात असू द्यावं. निवृत्तीनंतरच्या आयुष्यात स्वत:साठीचा वेळ ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. आणि हा वेळ सत्कारणी लागला तर आपल्याला आणि आपल्यासोबत इतरांनाही आनंद आणि समाधान नक्की मिळतं.8) नातवंडांचं संगोपन- संपूर्ण नियोजनामध्ये हा पर्याय सर्वात शेवटी आहे. एरवी आता झालो निवृत्त म्हणून अनेकजणांवर बळजबरीनंच नातवंडांची जबाबदारी उचलावी लागते.खरंतर या जबाबदारीतही आनंद आहे. पण ही जबाबदारी ऐच्छिक हवी, लादलेली नसावी. निवृत्तीनंतरच्या आयुष्यातला जास्तीत जास्त वेळ जर कोणाला नातवंडांना द्यायचा असेल तर ते जरूर देवू शकतात. मैत्रीच्या पातळीवर येवून नातवंडांचं संगोपन करण्याची उत्तम संधी या काळात मिळू शकते. नातवंडांच्या बालपणात आजी आजोबा आनंदाचे रंग भरू शकतात. निवृत्तीनंतरचं आयुष्य आजी आजोबांना ही संधी देतं.