शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुढी पाडवा स्पेशल : झटपट होणाऱ्या आणि टम्म फुगणाऱ्या पुऱ्यांचे ७ प्रकार, गरमागरम पुऱ्यांचा करा बेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2023 3:36 PM

1 / 8
'पुरी' हा गव्हाच्या पिठांपासून झटपट तयार केला जाणारा एक पारंपरिक पदार्थ आहे. सर्वत्र भारतामध्ये पुरी वेगवेगळ्या प्रकारांत बनविली जाते. काही सण - समारंभ, उत्सव असले की, जेवणाच्या ताटात पुरीचे विशेष स्थान असते. 'पुरी' बनवायला अतिशय सोपी व झटपट होणारी अशी रेसिपी आहे. कोणताही सण असल्यावर किंवा कधी कधी नाश्त्यासाठी देखील आपल्याकडे पुरी करण्याची पद्धत आहे. कशी जेवणात चपात्या करायला कंटाळा आला असेल तर पटकन होणारा पदार्थ म्हणजे पुरी. पुरीने जेवणाचा स्वाद अधिक वाढतो आणि करण्यासाठीही या सोप्या आहेत. परंतु नुसती गव्हाच्या पिठाची पुरी करण्यापेक्षा आपण वेगवेगळ्या पद्धतीची आणि चवीची स्वादिष्ट पुरी बनवू शकता. वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची पुरी बनविण्यात येते. गुढी पाडव्याला महाराष्ट्रांत श्रीखंड - पुरी खाण्याची प्रथा आहे. गुढीपाडव्यानिमित्त खास पुरींचे अनेक प्रकार पाहूयात(7 Best Puri Recipes, Easy Puri Recipes To Try At Home).
2 / 8
पुरी हा एक भारतीय पदार्थ आहे. पुरी ही गव्हाच्या पिठापासून तयार केली जाते. पुरी सहसा पनीर मसाला, काजू करी, बटाट्याची पिवळी भाजी, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, खीर यांसोबत सर्व्ह केली जाते. साधी पुरी बनवतांना गव्हाच्या पिठामध्ये मीठ, तेल, आवश्यक तेवढे पाणी घालून पीठ भिजवावे. पीठ चांगले मळून घेतल्यानंतर त्याचे लहान गोळे तयार करुन पुऱ्या लाटून घ्याव्यात. त्यानंतर या पुऱ्या गरम तेलांत मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्याव्यात.
3 / 8
गव्हाच्या पिठामध्ये वाटलेली उडीद डाळ, मसाले घालून जी खमंग खुसखुशीत पुरी तयार केली जाते त्यास 'भेडवी पुरी' असे म्हणतात. ही पुरी बनवतांना त्यात मसाले म्हणून ओवा, लाल तिखट, हळद, मिरचीची पेस्ट, मीठ आणि मोहन घातले जाते. पाण्याने हे पीठ भिजवून अर्धा तास ठेवावे आणि नंतर मध्यम आकाराचे गोळे करून पुऱ्या लाटून घ्यावात. या पुऱ्या गरम तेलात तळून घ्याव्यात. पुऱ्यांचे पीठ अधिक पातळ करु नये अन्यथा तेलात पुरी फुटण्याची शक्यता असते. ही पुरी हिरव्या चटणीसह खायला अधिक स्वादिष्ट लागते.
4 / 8
आपल्याला जर वेगळ्या चवीची पौष्टिक पुरी खायची असेल तर आपण मेथी बाजरा पुरी नक्की बनवू शकता. बाजरीच्या पिठामध्ये थोडेसे गव्हाचे पीठ मिसळून घ्यावे. त्यात मीठ, तेल, हळद, लाल तिखट, ओवा, जिरे, ताजी कापलेली मेथी घालून हे पीठ भिजवून घ्यावे. अर्धा तास हे पीठ तसंच ठेवून द्यावे. त्यानंतर याचे गोळे करून घ्या आणि पुरी लाटून तेलात तळा. गरमागरम टॉमेटो बटाटा रस्सा भाजीसह ही पुरी खाण्यासाठी सर्व्ह करावी.
5 / 8
अनेकांना जेवणामध्ये क्रिस्पी पदार्थ खायला खूपच आवडतात. आपल्याला जर काहीतरी क्रिस्पी, खुसखुशीत खावेसे वाटत असेल तर क्रिस्पी मसाला पुरी हा आपल्यासाठी उत्तम पर्याय आहे. गव्हाचे पीठ, मीठ, लाल मिरची पावडर, ओवा, तेल घालून पीठ थोडे घट्ट भिजवून घ्या. त्यानंतर साधारण अर्धा तास हे पीठ झाकून ठेवा. नंतर या पिठाचे गोळे करून पातळ लाटा आणि मग तेलात तळा. या पुऱ्या कुरकुरीत होतात आणि चवीला अत्यंत सुंदर लागतात. चहा किंवा कॉफीसोबत याचा स्वाद अधिक चविष्ट लागतो.
6 / 8
आपल्याला जर मुलांना काहीतरी पौष्टिक व चमचमीत असे खायला द्यायचे असेल तर बीट व चणाडाळीची पुरी हा एक उत्तम पर्याय आहे. यासाठी रात्रभर चणाडाळ पाण्यात भिजत घाला. बीटचे लहान तुकडे कापून घ्या. सकाळी उठल्यावर बीट आणि चणाडाळ एकत्र उकळवून घ्या. दुसऱ्या परातीमध्ये रवा आणि गव्हाचे पीठ काढून घ्या. त्यात थोडे मीठ, जिरे, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, चिरलेली कोथिंबीर घालावे. त्यानंतर त्यात बिट व चणाडाळ उकळवून घेतलेले पाणी घालून पीठ व्यवस्थित भिजवून घ्या. त्यानंतर अर्ध्या तासाने या पिठाचे लहान गोळे करून पुऱ्या लाटून घ्याव्यात. गरम तेलात पुऱ्या तळून घ्याव्यात. सॉस आणि चटणीसह खायला सर्व्ह कराव्यात.
7 / 8
पालक पाण्यात घालून उकळून घ्या. उकळवून घेतलेली पालकाची पाने एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यावीत. आता या मिक्सरच्या भांड्यात ओवा, हिरव्या मिरची, लसूण, काळी मिरी आणि मीठ घालून पेस्ट तयार करुन घ्यावी. त्यानंतर एका भांड्यात गव्हाचे पीठ, तेल, मीठ घेऊन मग त्यात पालकाची तयार पेस्ट घालावी. आता हे पीठ व्यवस्थित मळून घ्यावे. मळून घेतलेले पीठ १५ मिनिटांसाठी तसेच ठेवून द्यावे. अर्ध्या तासाने या पिठाचे गोळे करून पुऱ्या तयार करून मग तेलात तळून गरमागरम खायला द्याव्यात. चटणी किंवा सॉससह पालक पुरी चवीला अप्रतिम लागते.
8 / 8
पाकातली पुरी हा महाराष्ट्रातील पारंपरिक गोड पदार्थ आहे. दिवाळी किंवा इतर महाराष्ट्रीयन सणाला हा पदार्थ बनवला जातो. खुसखुशीत, चवीला भारी ही रुचकर पुरी करायला सोपी व टिकाऊ अशी ही पुरी प्रवासातही नेऊ शकतो.लहान मुलांना डब्ब्यात द्यायला व आवडणारा गोड पदार्थ म्हणजे पाकातली पुरी. ही पुरी तयार करतांना दह्याचा वापर केला जातो. हे दही वापरताना आंबट दही घ्यावे. तसेच जर दही वापरायचे नसेल तर साध्या पाण्याने पिठ भिजवावे आणि पाकामध्ये लिंबाचा रस घालावा म्हणजे गरजेचा आंबटपणा पुर्‍यांना येतो. या पुऱ्या तूपा ऐवजी तेलात तळल्या तरी चालतात. पण तुपामुळे पुर्‍यांना खुप छान स्वाद येतो. मैदा, रवा समप्रमाणात घेऊन त्यात तूप, दही घालून घट्टसर पीठ मळावे. आता या पिठाच्या पुऱ्या लाटून खमंग तळून घाव्यात. पुऱ्या तळून झाल्यावर शाखेच्या पाकात सोडाव्यात.
टॅग्स :foodअन्नRecipeपाककृती