शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नाश्त्यात भरपूर चविष्ट प्रोटीन हवे , करा मुगडाळीचे 7 चविष्ट पदार्थ; डोसा ते सँडविच सबकुछ टेस्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 3:05 PM

1 / 7
मुगडाळीचा पराठा:- मुगडाळीचा पराठा करण्यासाठी पाऊण कप मुगाची डाळ, 3 चमचे तेल, 1 चमचा तिखट, 1 चमचा हळद, चिमूटभर हिंग, 1 चमचा जिरे, 2 कप कणिक आणि मीठ घ्यावं.  15 मिनिटं डाल भिजवावी. नंतर ती निथळून घ्यावी. कढईत एक कप पाणी घालावं. त्यत भिजवलेली मूग डाळ  घालावी. झाकण ठेवून डाळ शिजवावी. डाळीतलं पाणी उडून जाईपर्यंत डाळ शिजवावी. नंतर कढईत तेल गरम करावं. त्यात जिरे घलावेत. शिजवलेली डाळ घालावी. ती परतून त्यात लाल तिखट, हिंग, हळद  घालून 5 मिनिटं ती परतून घ्यावी.  नंतर गॅस बंद करुन डाळीचं मिश्रण गार होवू द्यावं. मिश्रण गार होईपर्यंत कणकेत मीठ घालून पीठ मळून घ्यावं.  पीठ मऊसर मळावं. ते जास्त सैल किंवा घट्ट नसावं. पीठ मळून ते 15 मिनिटं सेट होवू  द्यावं.  पिठाचे दोन छोटे गोळे घेऊन त्यांच्या पाऱ्या लाटून घ्याव्यात. एका पारीवर मुगाच्या डाळीचं मिश्रण पसरवून घालावं. त्यावर दुसरी पारी ठेवून कडा बंद कराव्यात. हलक्या हातानं पराठा लाटावा. तव्यावर तेल लावून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावा.
2 / 7
मुगडाळीचं सॅण्डविच:- मुगडाळीचं सॅण्डविच करण्यासाठी अर्धा कप मूग डाळ दोन तास भिजवावी. डाळ निथळून घ्यावी. कढईत थोडं तेल गरम करावं. त्यात एक इंच दालचिनीचा तुकडा, एक सुकी लाल मिरची, 3-4 लवंगा घालून परतून घ्यावेत. नंतर मोहरी, हिंग, भिजवलेली डाळ आणि मीठ घालावं. पाव ते 1 कप पाणी घालावं. कढईवर झाकण, झाकणावर पाणी ठेवून डाळ दहा मिनिटं शिजवावी. मधून मधून डाळ हलवावी. डाळ कोरडी वाटल्यास त्यात चमच्यानं थोडी पाणी घालावं. डाळ शिजल्यावर हे मिश्रण व्यवस्थित गार होवू द्यावं. यातील सुका मसाला काढून टाकावा. मिश्रण गार झाल्यावर त्यात किसलेलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची-आलं पेस्ट, बारीक चिरलेला कांडा, लिंबाचा रस आणि साखर घालून मिश्रण चांगलं हलवून घ्यावं. ब्रेडच्या स्लाइस घ्याव्यात. त्यावर डाळीचं मिश्रण भरपूर घालावं. त्यावर दुसरा ब्रेड ठेवून थोडा दाबावा. ब्रेडच्या दोन्ही बाजुंनी बटर लावून सॅण्डविच मेकरमधून किंवा तव्यावर तेल घालून ते ग्रील करुन घ्यावं.
3 / 7
मुगाच्या डाळीचा चिला:- मुगाच्या डाळीचा चिला करण्यासाठी 200 ग्रॅम मूग डाळ, 50 ग्रॅम फ्रोझन वाटाणे, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, मीठ, हळद, पाणी, कांदा , कोथिंबीर, पाव चमचा सोडा, 3-4 चमचे तेल, मीठ तर सारणासाठी 4 मोठे चमचे किसलेलं पनीर, 2 हिरव्या मिरच्या, 1 कांदा, 1 लिंबाचा रस, अर्धा चमचा चाट मसाला आणि मीठ घालावं. मुगाची डाळ 2 तास भिजवून घ्यावी. नंतर आलं, लसूण, मिरची, मीठ, हळद , डाळ आणि थोडं पाणी घालून मिश्रण वाटून घ्यावं. मिश्रण सरसरीत असावं. त्यात चिरलेला कांदा, भरडून घेतलेले वाटाणे घालावेत. मिश्रण नीट हलवून फ्रिजमध्ये एक तास ठेवावं. तासाभरानं ते बाहेर काढून त्यात सोडा घालावा. मिश्रण हलवून घ्यावं. तवा गरम करावा. त्यावर थोडं तेल लावावं. त्यावर मुगाच्या डाळीचं मिश्रण घालावं. त्यावर पनीर, हिरव्या मिरच्या, कांदा, चाट मसाला आणि मीठ घातलेलं सारण भुरभुरुन पसरुन घालावं. तव्यावर झाकण ठेवून पॅनकेकप्रमाणे त्याची खालची बाजू सोनेरी रंगावर शेकून घ्यावी. 
4 / 7
मुगडाळीचा उपमा:- मुगडाळीचा उपमा करण्यासाठी 1 कप मुगाची डाळ, 1 कांदा, 2 हिरव्या मिरच्या, मोहरी, 1 चमचा उडदाची डाळ, हिंग, 8-10 कढीपत्त्याची पानं, 2 चमचे खोवलेलं खोबरं, लिंबू, साखर , तेल आणि मीठ घ्यावं. सर्वात आधी 3-4 तास मुगाची डाळ भिजवावी. डाळ निथळून वाटून घ्यावी. इडलीच्या साच्यांना तेल लावून त्यात वाटलेली मुगाची डाळ घालून इडल्या वाफवून घ्याव्यात. इडल्या थंड झाल्यावर त्या बारीक कुस्करुन घ्याव्यात. कढईत् तेल  गरम करावं. त्यात मोहरी, उडदाची डाळ, कढीपत्ता आणि हिंगं घालावा. ते परतल्यावर बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या घालाव्यात. ते परतल्यावर त्यात इडलीचा कुस्कारा घालावा. तो परतून घ्यावा. त्यात मीठ, लिंबू आणि साखर घालावी. उपमा परतून हलकीशी वाफ घ्यावी. हा उपमा गाजर, घेवडा, सिमला मिरच्या या भाज्या घालूनही करता येतो. उपम्यावर वरुन खोवलेलं खोबरं आणि कोथिंबीर घालावी. 
5 / 7
मूंगलेट:- 200 ग्रॅम मुगाची डाळ, डाळ भिजवण्यासाठी पाणी, मीठ, 4 हिरव्या मिरच्या, इच्छा असल्यास सोडा, थोडं तेल, एक बारीक चिरलेला 1 कांदा, 1 टमाटा, 1 सिमला मिरची आणि कोथिंबीर घ्यावी,  मुगाची डाळ अर्धा तास भिजवावी. डाळ निथळून घ्यावी. मिक्सरमधून मुगाची डाळ थोडं पाणी, मीठ, मिरची घालून बारीक वाटावी.  वाऋटलेलं मिश्रण एका भांड्यात काढून घ्यावं. मिश्रण जास्त दाट किंवा पातळ असू नये. पॅनमध्ये थोडं तेल घालून ते गरम करावं. त्यावर मुगडाळीचं मिश्रण पसरुन घालावं. त्याला बुडबुडे आले की बारीक चिरलेला कांदा, टमाटा, मिरची, सिमला मिरची एकत्र करुन ती वरुन भुरभुरुन घालावी. हे मुगडाळीच्या मिश्रणाच्या थरावर हलकेसे दाबून घ्यावेत. मूंगलेट दोन्ही बाजुंनी थोडं तेल लावून सोनेरी रंगावर भाजून घ्यावेत. 
6 / 7
मुगडाळीचे उत्तप्पम:- मुगडाळीचे उत्तप्पम करण्यासाठी 1 कप मुगाची डाळ दोन तास भिजवावी. थोडं पाणी घालून वाटून घ्यावी एका भांड्यात वाटलेल्या डाळीचं मिश्रण काढावं. त्यात  बारीक चिरलेलं गाजर, सिमला  मिरची, हिरवी मिरची मीठ , लाल तिखट, हळद, हिंग, पाव चमचा सोडा आणि थोडं आलं किसून घालावं, मिश्रण थोडं पाणी घालून सरसरीत करावं. पॅनवर तेल घालून पॅन गरम करावा.  त्यावर मुगाच्या डाळीचं मिश्रण पसरुन घालावं. झाकण ठेवावं. खालची बाजू शेकल्यावर उलटवून दुसरी बाजूही सोनेरी रंगावर शेकून घ्यावी. 
7 / 7
मुगडाळीचा डोसा:- मुगडाळीचा डोसा करण्यासाठी अर्धा कप मोड आलेले हिरवे मूग, पाव कप तांदळाचं पीठ, पाव कप रवा, कोथिंबीर, किसलेलं आलं, बारीक चिरलेला कांदा, मिरची , मीठ आणि तेल घ्यावं.  मोड आलेले मूग थोडं पाणी घालून बारीक वाटावेत. त्यात तांदळाचं पीठ, रवा घालावा. आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण सरसरीत करुन घ्यावं. त्यात चिरलेला कांदा, मिरची, किसलेलं आलं आणि मीठ घालून मिश्रण चांगलं मिसळून घ्यावं. तवा तेल लावून् गरम करुन त्यावर डोसे घालून ते दोन्ही बाजुंनी भाजून घ्यावेत.