शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

निर्मला सीतारामन : भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री ते जगातील शक्तीशाली महिला, मध्यमवर्ग ते विक्रमी वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2024 3:32 PM

1 / 9
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन. त्या भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत. ५ जुलै २०१९ साली त्यांनी संसदेत पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला. आता उद्या म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होत आहे. निर्मला सीतारामन यांचा अर्थमंत्रीपदापर्यंतचा प्रवास म्हणजे अत्यंत अभ्यास, व्यासंगी आणि निष्णात राजकीय नेतृत्त्वाचही प्रवास आहे(Nirmala Sitharaman : First Female Finance Minister of India).
2 / 9
अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाचा अर्थसंकल्प पूर्ण नसेल. कारण २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. शिवाय निवडणुकापूर्वीचा खर्च भागवण्यासाठी सरकार अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे.
3 / 9
दरम्यान सलग पाच पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या देशाच्या दुसऱ्या अर्थमंत्री असतील. आतापर्यंत हा विक्रम केवळ माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. त्यामुळे यावर्षी त्यांच्या नावे एक नवीन विक्रम नोंदवला जाणार आहे.
4 / 9
देशाच्या अर्थव्यवस्थेचा भार सांभाळणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय नाही. मध्यमवर्गीय घरातच त्यांचा जन्म झाला आणि अत्यंत मध्यमवर्गीय आयुष्य त्याही साधेपणानं जगतात. आपलं उच्चशिक्षण पूर्ण करुन त्यांनी राजकीय वाटचाल आरंभली आणि भारतीय जनता पक्षात काम करत अर्थमंत्रीपदापर्यंत त्यांनी वाटचाल केली.
5 / 9
निर्मला सीतारामन यांचा जन्म १८ ऑगस्ट १९५९ रोजी तामिळनाडूतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील रेल्वे कर्मचारी होते. त्यामुळे वारंवार बदल्या होत होत्या. यामुळे त्यांचे शिक्षणही वेगवेगळ्या शहरातून पूर्ण होत गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथून पूर्ण झाले. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अर्थशास्त्रातून पदवी प्राप्त केली, आणि नंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली येथून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
6 / 9
निर्मला यांनी पीएचडी इंडो-यूरोपियन टेक्सटाइल ट्रेड या विषयात संशोधन करून पूर्ण केले. याच वेळी त्यांची भेट डॉ.परकला प्रभाकर यांच्याशी झाली, आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
7 / 9
शिक्षण घेत असताना आणि घेतल्यानंतरही त्या नोकरी करतच होत्या. जेव्हा त्यांचे पती शिक्षणाकरीता लंडनला स्थायिक झाले, तेव्हा निर्मला देखील त्यांच्यासोबत गेल्या. या काळात त्यांनी होम डेकोरच्या दुकानात सेल्स गर्ल म्हणून काम केले. पुढे त्या लंडनच्या कृषी अभियंता संघटनेतील काम पाहू लागल्या. शिवाय प्राइस वॉटरहाऊस नावाच्या कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम केले. त्यांनतर निर्मला भारतात परतल्या, आणि हैदराबाद येथील सेंटर फॉर पब्लिक पॉलिसीमध्ये उपसंचालकपदातील पदभार संभाळला.
8 / 9
निर्मला सीतारामन यांचे सासू-सासरे काँग्रेस या पक्षात नेते होते. पण या दोघांनी कधीही सून आणि मुलावर आपल्या विचारधारा लादल्या नाही. कॉंग्रेस पक्षातील पार्श्वभूमी असूनही निर्मला यांनी २००८ साली भाजपमध्ये प्रवेश केला. तिथे त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून काम केले. त्यांच्या स्पष्टवक्त्या प्रतिमेमुळे त्यांची लोकप्रियता वाढत गेली, आणि २०१४ साली केंद्रात भाजपचे सरकार आल्यावर मोदी सरकारमध्ये त्यांना मोठी जबाबदारी मिळाली.
9 / 9
२०१६ साली झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात, निर्मला यांना भारताचे वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळायला दिला. शिवाय २०१७ साली भाजपने निर्मला सीतारामन यांच्याकडे संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली होती. तर २०१९ साली त्यांना अर्थमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या नावे अनेक विक्रम आहेत. मुख्य म्हणजे फॉर्च्युनने निर्मला सीतारामन यांना भारतातील सर्वात शक्तीशाली महिला म्हणून स्थान दिले.
टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनBudgetअर्थसंकल्प 2024Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल