शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Google ची मोठी कारवाई! प्ले स्टोरवरून हटवले कर्जाच्या जाळ्यात ओढणारे तब्बल 2000 अ‍ॅप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 12:19 PM

1 / 7
ऑनलाईन कर्ज मिळवण्याचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. मात्र अशातच इन्स्टंट लोन देण्याच्या नावाने लोन ॲपकडून लोकांना जाळ्यात ओढलं जातं. बनावट कर्ज देणाऱ्या म्हणजेच लोन ॲपकडून (Loan Apps) कित्येकांची फसवणूक होत असल्याचं समोर आलं होतं. याच दरम्यान आता गुगलने अशा ॲपवर मोठी कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. गुगल प्ले स्टोरने (Google Play Store) 2000 हून अधिक बनावट लोन ॲप्स प्ले स्टोरवरून हटवत कारवाई केली आहे.
2 / 7
गुगलने या ॲप्सकडून अटी शर्थीचं उल्लंघन होत असल्याचं म्हटलं आहे. ॲपवर केलेल्या कारवाईबाबत माहिती देताना गुगलने म्हटलं आहे की, गुगलकडून दोन हजार बनावट लोन ॲप्स हटवण्यात आले आहेत. या ॲप्सकडून गुगलच्या अटी आणि शर्थींचं उल्लंघन होत असल्याचं आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या ॲप्सकडून माहिती लपवून ग्राहकांची फसवणूक करण्यात येत होती.
3 / 7
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुगलचे एशिया पॅसिफिक क्षेत्राचे वरिष्ठ संचालक आणि ट्रस्ट आणि सेफ्टी हेड सॅकत मित्रा यांनी सांगितलं आहे की, गुगल कंपनी योग्य ऑपरेशनसाठी बनवलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. गुगल नेहमीच युजर्सच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा आणि सायबर गुन्हे रोखण्याचा प्रयत्न करते. गुगल कंपनी आपल्या युजर्सच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारसोबत मिळून उपाययोजना करत आहे.
4 / 7
गुगलने प्ले स्टोर (Google Play Store) वरून तब्बल दोन हजारहून अधिक ॲप्स हटवले आहेत. या ॲप्सवरून ग्राहकांना कर्जाच्या जाळ्यात अडकवलं जात होतं. नियम आणि अटींचे उल्लंघन केल्यामुळे गुगल कंपनीने जानेवारी महिन्यापासून प्ले स्टोअरवरून अनेक ॲप्स काढून टाकले आहेत.
5 / 7
गुगलने असंही म्हटलं आहे की, अनेक ॲप्स त्यांची माहिती लपवतात आणि अपुरी माहिती देत खुलासा करत नाहीत, अशा ॲप्सवरही कारवाई करण्यात आली आहे. माहिती लपवणे हे गुगलच्या धोरणाचं स्पष्ट उल्लंघन मानलं जाईल आणि अशा कर्ज देणाऱ्या या ॲप्सवर पुढेही कारवाई करण्यात येईल.
6 / 7
कोरोनाच्या काळात जगभरासह देशातही आर्थिक संकट निर्माण झालं होतं. या काळात लोकांना पैशाची चणचण होती. त्यामुळे नोंदणी नसणाऱ्या कर्ज देणाऱ्या ॲप्सच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचं दिसून आलं. लोकांना कर्ज दिल्यानंतर हे ॲप त्यांच्याकडून 200 टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारत होते.
7 / 7
ॲप्सच्या कर्जाच्या जाळ्यात अडकून अनेकांनी आत्महत्याही केल्याचं समोर आलं आहे. या ॲप्सच्या विरोधात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, भारतीय रिजर्व्ह बँकेने (RBI) नागरिकांना या अनोंदणीकृत लोन ॲप्सपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. RBIने कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या ग्राहकांना पोलिसांत तक्रार करण्यास सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :googleगुगलMONEYपैसा