Sharad Pawar master plan reached in thane for party meeting jitendra awhad residence
शरद पवारांचा 'मास्टर प्लान', स्वत: पोहोचले मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात; पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी अन्... By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 11:35 AM1 / 9शिवसेनेत उभी फूट पडली, एकनाथ शिंदेंनी फडणवीसांसोबत सरकार स्थापन केलं आणि शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. एका क्षणात राज्यातील राजकीय परिस्थिती पलटली. महाविकास आघाडी सरकारला चितपट करत शिंदेंनी फडणवीसांच्या साथीनं करेक्ट कार्यक्रम केला. मविआला इतका मोठा धक्का बसताना या आघाडीचे शिल्पकार शरद पवार शांत होते. सारं पाहात होते. पण आता त्यांनी शिंदे सरकारला धोपीपछाड देण्यासाठी मास्टर प्लान आखलेला दिसत आहे. 2 / 9राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी स्वत: चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. महत्वाची बाब म्हणजे याची सुरुवात शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून सुरुवात केली आहे. 3 / 9शरद पवार आज ठाणे दौऱ्यावर आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी शरद पवार पोहोचले आहेत आणि ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी बोलावली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्याबाबत ठाण्यात पक्षाला कसं यश मिळवून देता येईल याबाबत शरद पवार पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे. 4 / 9नुकतंच डावखरे आणि गणेश नाईक यांनीही भाजपाची वाट धरल्यामुळे ठाण्यात पक्षाला बळकटी देण्यासाठी शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. डावखरे, नाईकांनी भाजपाची वाट धरल्यानंतर शरद पवारांकडून आता जितेंद्र आव्हाड यांना बळ दिलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर आव्हाडांच्या घरीच पवारांनी पक्षाची बैठक बोलावली आहे. 5 / 9ठाण्यातील पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर दुपारी दोन वाजच्या सुमारास शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचं ठाण्यात जोरदार स्वागत करण्यात आलं होतं. तसंच ठाण्यात शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळालं. ठाण्यावर एकहाती वर्चस्व असणाऱ्या एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यालाच सुरुंग लावून सरकारला हादरा देण्याचा शरद पवारांचा प्लान आहे. 6 / 9राज्यभरातून एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) वाढता पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच आता शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी युती करत शिंदे गटासमोर नवे आव्हान उभे केल्याची चर्चा आहे. 7 / 9यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली असून, शिवसेनेतील बंडखोर आमदारांना टार्गेट करून त्याचा वापर आपल्या फायद्यासाठी करून घेण्याची नवी रणनीति आखल्याचे सांगितले जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे हे प्लॅनिंग शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मदत करण्यासाठी आहे की, डाव उलटवण्यासाठी आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचे सांगितले जात आहे. 8 / 9उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस पुढाकार घेणार आहे. या माध्यमातून स्वपक्षाचा फायदा करून घेण्यासाठीही राष्ट्रवादी काँग्रेसने यासाठी खास रणनीती आखल्याचे सांगितले जात आहे.9 / 9आता शरद पवार ठाण्यात जाऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कोणता कानमंत्र देतात आणि शिंदेंचं वर्चस्व मोडण्यात पक्ष यशस्वी होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तसंच आगामी पालिका निवडणुकीसाठी कोणत्या मुद्द्यांवर पक्ष लक्ष केंद्रीत करणार हे आजच्या बैठकीत चर्चेचा मुद्दा असणार असल्याचंही सांगितलं जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications